वृक्षांचे मानवी जीवनातील स्थान मराठी निंबध | Vrukshanche Manvi Jivanatil Stjan Marathi Nibandh

 वृक्षांचे मानवी जीवनातील स्थान मराठी निंबध | Vrukshanche Manvi Jivanatil Stjan Marathi Nibandh


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वृक्षांचे मानवी जीवनातील स्थान मराठी निबंध बघणार आहोत. भारत! सर्वार्थानं महान, संपन्न राष्ट्र. सुजलाम सुफलाम्. ज्ञानदेव, तुकोबाराय, गाडगेबाबा... ज्यांनी वृक्षात 'नारायण' पाहिला. वृक्ष संवर्धनाचे, वृक्षपूजेचे महत्त्व शतकांपासून लोकांना शिकवले, 


अशी संपन्न संतपरंपरा लाभलेले सजग, सुशिक्षित राष्ट्र! भरपूर मोठा दंतुर किनारा, सह्याद्री अरवली विंध्य ह्या पर्वतरांगा, भव्य हिमालय, सपाट भूप्रदेशाचा विदर्भ - मराठवाडा, मोठमोठ्या नद्या, त्यांचे त्रिभुज प्रदेश, मान्सून हवामान या नि अशा भौगोलिक वैशिष्ट्यामळे, वैविध्यामुळे भारतात सदाहरित वने ते खुरट्या वनस्पतींपर्यंत सारी वनसृष्टी आढळते. 


पर्यावरणाशी तादात्म्य पावलेली अनुकूलन साधणारी जंगले-वने भारतात भरपूर आहेत. ...आणि मी... महाराष्ट्रीयन. नटलेल्या वन्यजीवसृष्टीचा मित्र. तिचा अभिमान बाळगणारा, तिला जपू पाहणारा, सुटीत उत्साहाने बाबांबरोबर डोंगर कडे कपारीत भटकंती करणारा निसर्गप्रेमी! 



कोकणात मी आंबा, फणस, नारळी, पोफळी, पळस, साग, जांभूळ, मोहाच्या घनदाट वनराजीतून तर कधी बोरी करवंदीच्या गर्द जाळीतून खूप भटकलोय. रानजाई, रानकेळी, कर्दळीनी माझं मन मोहून टाकलंय. समर्थ रामदासांच्या शब्दांत... सह्याद्री मंडळी लक्ष लक्ष वनस्पती.


कांटी रामकांटी फुलेकाटी नेपती सहमुळी करमाटी सावी चिलारी सागरगोटी हिवर खैर खरमाटी... अशा शेकडो चित्रविचित्र वनस्पती येथे सापडतात. एका वनस्पतीची पाच पाने मुखात घातल्यास भूक लागत नाही. एकीची मुळी हातात घेता प्रवासाचे कष्ट हरपतात. 


एकीचे निष्ठेने सप्ताहभर सेवन केल्यास वार्धक्यातही तारुण्यप्राप्ती होते. एकीचे कांडके अंधारात उजेड दाखवते. काही दिव्यौषधी जखमा सांधतात. अशा वृक्षराजीत ऋषीमुनींनी निर्मळ तपोवने स्थापली. वनस्पतींना अभय मिळाले. 'दया रक्षित:' हा तिथला परवलीचा शब्द असे. 


पर्यावरणाचे तोल राखणारे, खऱ्या अर्थाने 'इको फ्रेंडली असे ते दिवस होते. वृक्षसुद्धा सन्मानाने आश्रमातील, गुरुकुलातील सदस्यांपैकीच मानले जात. सखे, सोबती, सोयरेच होते ते. चौदा वर्षांच्या वनवासात रामचंद्राला वृक्षांनीच आश्रय दिला. अन्न, वस्त्र निवाऱ्यासकट! 


सीताहरण झाल्यानंतर विरहाने व्याकूळ झालेल्या श्रीरामाला सीतेचा पत्ता सांगणारे वृक्षच होते. आश्रम सोडून जाताना शकुंतलेला निरोप देणाऱ्या लता वेली माना टाकून रडल्या, हे खरं आहे म्हणतात. उष्माघाताने बेशुद्ध झालेल्या सत्यवानाला जेव्हा महत्प्रयासाने सावित्रीने वडाच्या झाडाखाली आणले, तेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा करून वडाच्या पानांनी सत्यवानाचे प्राण वाचवले. 


तेव्हापासून वटपौर्णिमेला स्त्रिया वडाची पूजा करतात. राक्षसाला मारून टाकल्यावर गणपतीच्या अंगाची लाही लाही झाली. दुर्वांच्या पाण्याच्या अभिषेकाने त्याला शीतलता आली म्हणून गणपतीला दुर्वा आवडतात असे कित्येक पौराणिक, धार्मिक दाखले देऊन आपल्या पूर्वजांनी वड, आपटा, शंकराचा बेल, शुभशकुनी आंबा, मुंजाबाचा पिंपळ, दत्ताचा उंबर, गौरीला पत्री, साऱ्याच झाडांना पवित्र ठरवून कायमचं संरक्षित केलं.


अडुळसा, ब्राह्मी, शंखपुष्पी, जटामांसी, अर्जुन, गुळवेल, शतावरी, तुळस, पुदिना इत्यादी वनस्पतींचे औषधी गुणधर्म मुलांनाही माहीत आहेत. आजीच्या बटव्यातली वेखंड, जायफळ, मुरुडशेंग, आंबेहळद, चंदन, रक्तरोहिडा वेळोवेळी उपयुक्त ठरतात. 


अंगाची काहिली करणाऱ्या ग्रीष्मात वाळा घातलेलं माठातलं पाणी, पावसाळ्यात घसा शेकवणारा गवती चहा, निलगिरीची पाने उकळून घेतलेली वाफ. सांधेदुखीसाठी आरामदायी निर्गुडी, कीटकनाशक म्हणून धान्याच्या कोठीत टाकलेला कडुलिंबाचा पाला, हिंगाचा खडा, शरीरातले निघून गेलेले पाणी भरून काढणारे व दुसऱ्याच्या उपयोगात जीवन खर्च करणारे नारळ तर कल्पवृक्षच. 



झाडांवर येणारी निरनिराळी सुगंधी रंगीबेरंगी, सुबक फुलं रुग्णालयांतील रुग्णांसही उल्हासित करतात. मनुष्याला सुखी करणाऱ्या वृक्षाचा मंत्र एकच...


सैवितव्यो महावृक्षः फलच्छाया समान्वितः । 

यदि देवात्फलं नास्ति छाया केन निवार्यते ।। 


रामदास स्वामी म्हणतात 'सुखा लागी अरण्य सेवीत जावे.' प्रत्येक ऋतूत वेगळं सौंदर्य खुलवणारे हे वृक्ष जीवन कसं जगावं हे ही शिकवतात. अचलता, दृढता हे घट्ट मुळांकडून, स्वकष्टार्जित फळाफुलांचं दान दुसऱ्याच्या ओंजळीत टाकण्याचं औदार्य खोडांकडून! त्यागाच्या भावनेनं 


स्वत: उन्हात उभं राहणं, हवेतील प्रदूषके शोषून हवेत प्राणवायूचं प्रमाण वाढवणं, अन्न- वस्त्र-निवारा... मागेल ते पुरवणं, वाऱ्यावर आनंदानं डोलणं आणि जीवनकार्य संपुष्टात आल्यावर त्याच वाऱ्यावर भिरभिरत पिवळ्या रंगानं पानांचं मातीशी मिळणं - पुन: नव्या चैतन्यानं हिरव्या रंगानं जन्म घेण्यासाठी....! आपली सारी कर्तव्ये बिनबोभाट करण्यासाठी.


भूमी सस्यश्यामला ठेवणाऱ्या वृक्षांचं संरक्षण व संवर्धन करणं, हे माणसाचं आद्य कर्तव्य नाही का? निसर्ग मानवाला भरभरून ही वनसंपत्ती देतो आहे. वनांशी दोस्ती करण्यात, सोयरीक करण्यातच त्याच्या सुखाचे निधान आहे.


एकीकडे, 'एक मूल, एक झाड.' 'झाडे जगवा, पर्यावरण वाचवा.' 'झाडे लावा, पाऊस मिळवा' अशा शासकीय पाट्या आपण जागोजागी पाहातो. वनमहोत्सव हा राष्ट्रीय सण साजरा करतो. सामाजिक वनीकरण, परसदार योजना, किसान रोपवाटिका मोहिमेखाली वृक्षारोपण झपाट्याने वाढतेय. 


तर... दुसरीकडे चंदन तस्करी, जळणासाठी वृक्षचोरी, रस्तारुंदीकरणासाठी वृक्षतोड ह्या गोष्टी सुरूच आहेत.
म्हणूनच गरज आहे प्रबोधनाची! अजुनही वेळ गेलेली नाही. आम्ही उद्याचे सुजाण नागरीक शपथ घेऊन उत्साहाने म्हणू, चला... पुनः एकदा वने राने उभारूनी समृद्ध करूया शपथ घेऊनी भू-मातेची वनदेवता नटवू या! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद