मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण निबंध मराठी | Women Education Essay in Marathi

 मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण निबंध मराठी | Women Education Essay in Marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण मराठी निबंध बघणार आहोत.  परवाच एका मासिकात 'स्त्री सक्षमीकरण' नावाच्या लेखात लेखाशेजारी एक आगळं वेगळं चित्र काढलेलं पाहिलं. एका पाळण्यात चक्क पृथ्वीचा आख्खा गोल होता नी त्या पाळण्याची दोरी एका सशक्त महिलेच्या हाती! 


जसा जसा खोलात विचार करू लागलो, तशी तशी त्या चित्राची संकल्पना मला समजत गेली. खरंच, स्त्री ही अनंत काळची विश्वाची माता आहे आणि ती सक्षम असली की जगरहाटी उत्तम चालणार ह्यात शंकाच नाही, असंच तर त्या चित्रकाराला म्हणायचं नसेल ना?


अतिप्राचीन भारतीय संस्कृती मातृप्रधान होती. इतिहासात स्वत:ची सबलता, कर्तृत्व स्त्रियांनी स्वहस्ते सिद्ध केलंय. शककर्ता सातवाहन राजा अभिमानाने स्वतःला 'गौतमीपुत्र' म्हणून संबोधत असे. पुढे ही संस्कृती नामशेष झाली. खियांना दुय्यम स्थान मिळता मिळता, गुलामगिरीचे जोखडच त्यांच्यावर पडले. 


अवहेलना, निरक्षरता, सतीची पद्धत बालविवाह अशा सामाजिक लाजिरवाण्या जोखडांनी स्त्री चैतन्यहीन झाली. गलित गात्र झाली व घराच्या चार भितीत जीवन कंठू लागली. गेल्या शतकात स्त्रीला शिक्षणाची दारं उघडी झाली. म. फुले, महर्षी कर्वे प्रभृतींच्या प्रयत्नांमुळे ती शिकली. बाहेर पडू लागली. 


स्वत:चं कार्य, भेटणारी माणसं नवी क्षितिज नवे प्रश्न हाताळू लागली. मी म्हणजे केरवारा, स्वयंपाकपार्ण चूलमूल नसून एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे हे कळून आता ती घर सांभाळून मुलीबरोबर संगणकही शिकू लागली. अर्थार्जन करून कुटुंबाचं back bone बनली. 


मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडे डोळसपणे लक्ष देऊ लागली, स्वत: शिक्षित असल्यामुळे. मी तर आज पहिल्या नंबराने पास होतो, नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त मार्क्स मिळवतो, त्याचं सारं श्रेय अर्थात माझ्या जागरूक मातेलाच देतो. आईला कबूल करतो, 'प्रगतीच्या वाटेवर मी मागे वळून पाहिलं, तर माइलस्टोनवर एकेका मला तुझंच नाव दिसलं!'


गेल्या पन्नास साठ वर्षांतील भारतीय शिक्षित महिलेची कारकीर्द नव्या पिढीला किती उपयुक्त ठरतेय. हे आपण जागोजागी पाहतो. नवा बालचमू व यवापिढी सशक्त करण्याचे काम महिला करतेय व पर्यायाने देश घडवतेय. शासनही महिलांना तीस टक्के आरक्षण देऊन शिक्षणासाठी प्रोत्साहित करत आहे व त्यांच्या एक लाख चाळीस हजार पर्यंतच्या वार्षिक उत्पन्नाला कर सवलत देत आहे. 


शाळांमध्ये महिला शिक्षकांची संख्या तुलनेने खूपच जास्त आहे. भ्रताराची सेवा, तोचि आम्हां देव भ्रतार स्वयंमेव परब्रह्म ॥ असं पूर्वी समजणारी स्त्री आज कुठल्याही क्षेत्रात कमी नाही. शिक्षणासाठी लागणारी उत्सुकता, चिकाटी, संयम, अथक परिश्रमाची तयारी उजळणीचा प्रामाणिकपणा, चिवटपणा, लवचिकता हे गुण तिच्यात आहेत.


ताणतणाव सहन करण्याची ताकदही निसर्गाने स्त्रीला जास्त दिलीय, त्यामुळे अतिजबाबदारीची कामेही स्त्रिया लीलया करून जातात. व्यावसायिक शिक्षणाने तर स्त्रीला अंतर्बाह्य बदलले आहे. त्या हॉटेल मॅनेजमेंट, हॉस्पिटल मॅनेजमेंट, सौंदर्यशास्त्र ही शिकतात व कॉर्पोरेट विभागात मॅनेजरही असतात. 


वैद्यकीय क्षेत्र असो, कलेचे, अंतराळ भ्रमण शिक्षणाचे, पर्यटनाचे, खेळांचे, पोलिसांचे, पाककौशल्याचे वा शेतीचे क्षेत्र असो स्त्रिया सर्वत्र पुरुषांच्या बरोबरीने आघाडीवर दिसतात. मुंबईत स्त्री गच्च भरलेली लोकल रेल्वे चालवते. अंजू जॉर्ज खेळात नवे विक्रम नोंदवते, सुनिता विल्यम्स न डगमगता सहा महिने अंतराळात राहते, किरण बेदी दिल्ली पोलीस आयुक्त होतात, 


वीणा पाटील केसरी टूर्सच्या संचालक, स्मिता तळवलकर एक स्वतंत्र सिनेनिर्माती, लतादीदी जगविख्यात गायिका, शांता शेळके श्रेष्ठ कवयित्री, वागविलासिनी सरोजिनी वैद्य, इंफोसिसच्या सुधा मूर्ती अशी कितीतरी नावं विकासाचा प्रगतीपथ उजळून टाकणारी आहेत. 


थोर लेखिका लक्ष्मीबाई टिळक, पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी ह्यांची नावं घेतल्याशिवाय तर ही मालिका अपूर्णच राहील. आजच्या मुलामुलींची ही खरी आदर्श स्थाने. जणू एक एक दीपस्तंभ. देशाच्या प्रगतीचे पाइकच. 


खानदेशातल्या प्रतिभाताई पाटील जेव्हा भारताच्या पहिल्या नागरिकाचा मान पटकावतात, राष्ट्रपतिपद विभूषित करतात, तेव्हा मात्र ऊर अभिमानाने भरून येतो. डोळ्यात आनंदाश्रु जमा होतात.  आपल्या करिअरचा विचार करणारी स्त्री, आर्थिक बाजूंनी भक्कम असणारी, आपल्या जबाबदाऱ्या जाणणारी, कुटुंबाची काळजी घेत, स्वउत्कर्ष साधणारी स्त्री खऱ्या अर्थाने आज करिअर वूमन' ठरली आहे. 


लक्ष्मी व सरस्वती दोघीनाही तिने प्रसन्न करून घेतले आहे. _एक शिक्षित स्त्री सासरचे व माहेरचे अशी दोन कुटुंबे सावरते. एक शिक्षित आई कुटुंबाचा उद्धार करते, हेही सर्वज्ञात आहे. कुटुंब म्हणजे विद्यापीठ मानलं तर आई जगातील सर्वात श्रेष्ठगुरू आहे. जन्मापासून शिकवणारी, संस्कारांमध्ये मनं भिजवणारी गुरू. सानेगुरुजी, छत्रपती शिवाजी महाराज ही त्याची बोलकी उदाहरणे. 


स्त्री, कुटुंबाला आरोग्यविषयक धडे देते. स्वच्छता, उपचार, प्रतिबंधात्मक उपाय ह्यांकडे बारकाईने लक्ष देते. जन्मभरासाठी संस्कारांची शिदोरी बांधून देते. घरातील सर्वांच्या मानसिकतेकडे लक्ष देते. साक्षरता, सुसंगती, सुसंस्कारासाठी आग्रह धरते. 


हे सारं करताना स्त्री घराची चौकटही सांभाळते. डोईवरचा पदर ढळू न देता मानमर्यादा सतशीलतेचे दाखले पुढच्या पिढीकडे सुपूर्द करते. जिच्या व्यक्तिमत्वावर पूर्ण कुटुंबसंस्था स्थिरपणे उभी असते, ती स्त्री... कधी मुलगी, कधी पत्नी, तर कधी माता असते. तिला सामाजिक बांधिलकीचे भान असते. 


अन्याय, भ्रष्टाचार ती खपवून घेत नाही. हुंडापद्धती, देवदासी अशा गैररुढींविरुद्ध आजची प्रगती स्त्री बंड पुकारते. समाज जागवते. पुत्रांमध्ये देशाभिमान, राष्ट्रनिष्ठा रुजविते. कचरा कुंडीत टाकलेल्या कुण्या अनाथ बालकाला पदराखाली घेऊन त्याचेही पालनपोषण करते. 


देवालयात देवापाशी सर्वांसाठी सुख मागते. जे करते, ते मनापासून करते. आयुष्य पणाला लावून करते म्हणूनच, आम्ही... उद्याच्या सुजाण नागरिकांनी या स्त्रीशक्तीला उत्साहाचे टॉनिक देऊन समाज चैतन्यशील ठेवण्याचे ठरवूयात. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद