लोकमान्य टिळक मराठी निबंध | Essay on Lokmanya Tilak in Marathi

लोकमान्य टिळक मराठी निबंध | Essay on Lokmanya Tilak in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण लोकमान्य टिळक मराठी निबंध बघणार आहोत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ साली रत्नागिरीजवळच्या चिखली या गावी झाला. भारतीयांमधे ब्रिटीश सत्तेविरुद्ध जागृती आणण्याचे महान कार्य टिळकांनी केले. त्यांनी लोकांच्या मनात स्वातंत्र्याची भावना रुजविली. 


"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' अशी सिंहगर्जना करुन त्यांनी राष्ट्र प्रेमांची ज्योत जागविली. टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असेही म्हंटले जाते. टिळकांनी प्रथम कायद्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला. पुढे ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्यत्व घेतले. 


या व्यासपीठावरून त्यांनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली. भारतातील सामाजिक व राजकीय स्थितीबद्दल त्यांना पूर्ण जाण होती. लोकांना जागृत करण्यासाठी त्यांनी 'केसरी' व 'मराठा' ही दोन वृत्तपत्रे सुरु केली. त्यातून लोकांसमोर आपली परखड मते मांडली. 


भारतीय स्वातंत्र्याची चळवळ तळागाळातील लोकांपर्यंत नेणारे ते पहिले नेते होते. स्वातंत्र्य ही प्रत्येक प्राणीमात्रासाठी आवश्यक गरज आहे असे त्यांचे मत होते. त्यांची चळवळ ही स्वदेशी, बहिष्कार व शिक्षण या त्रिसूत्रीवर आधारित होती. त्यांनी देशासाठी अनेकदा तुरुंगवास भोगला.


बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांचा त्यांनी विरोध केला. तर शिक्षण व विधवा-विवाहाचे ते ठोस पुरस्कर्ते होते. लोकांना एकत्र आणण्याच्या दृष्टिने त्यांनी महाराष्ट्रात गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव आयोजित करण्यास प्रोत्साहन दिले. हे दोन्ही उत्सव आजही भव्य प्रमाणावर साजरे केले जातात.


ब्रिटिश सरकारने टिळकांपासून त्यांच्या सत्तेला असलेला धोका ओळखला होता व म्हणूनच त्यांना अनेकदा तुरुंगात टाकले. मंडाले येथील तुरुंगात असताना टिळकांनी 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहीला. १९१५ साली मंडाले येथून त्यांची सुटका करण्यात आली त्यानंतर त्यांनी पुन्हा सक्रीय राजकारणात उडी घेतली. 


त्यांनीच काँग्रेस मधील जहाल व मवाळ गटांमध्ये समेट घडवून आणला. असेच मुस्लीम लीग सोबत सामंजस्य करारही करवून घेतला. अशा या थोर नेत्याचा मृत्यु १ ऑगस्ट १९२० साली झाला. त्यांच्या मृत्युने देशाचे मोठेच नुकसान झाले. असे म्हणतात की ब्रिटिशांनी त्यांचा मेंदू जपून ठेवावा व त्यावर संशोधन करण्यात यावे अशी विनंती केली होती. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद