माझी आई मराठी निबंध | Majhi aai Nibandh Marathi/Marathi

 माझी आई मराठी निबंध | Majhi aai Nibandh Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी आई  मराठी निबंध बघणार आहोत. “प्रेम स्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई बोलावू तुज आता मी कोणत्या उपाई” कवी माधव जूलियन उगीच म्हणाले नाहीत. आई म्हणजे प्रेमाचा सागर, वात्सल्याचा आगर आहे. 


'आ' म्हणजे आत्मा 'ई' म्हणजे ईश्वर. 'आत्मा' आणि 'ईश्वर' याचे संम्मेलन म्हणजे आई. आई व्यक्ती नसून देवाचे अस्तित्व पटवून देणारे दैवत आहे. वात्सल्य आणि त्याग याचा संगम जिथे होतो तेथे आई हे माऊली दैवत निर्माण होते. साने गुरूजी यांच्या शब्दात सांगावयाचे झाले तर माझ्या हृदयात जपण्यासारख दोन अक्षरी म्हणजे 'आई'.


आई बाळावर अनेक रूपाने संस्कार करीत असते. लहानपणी चिऊकाऊंची गोष्टी मधून शब्दांचा साठा वाढविते तर पराक्रमाच्या शौर्याच्या कथा सांगून वीरवृत्ती, साहस, धैर्य वाढवत असते. आई म्हणजे लहानमुलांचा शब्दकोशच असतो. कामाच्या निमित्ताने ती इकडे तिकडे फिरत असते. परंतु सारे लक्ष बाळात असते. ज्याप्रमाणे 'घार हिंडे आकाशी । चित्त तिचे पिल्लापाशी'.


मनरूपी सुमनाला प्रसन्नता देणारी, टिपूर चांदण्याची अनुभूती देऊन जाणारी म्हणजे आई. आई म्हणजे शुद्ध गंगेचे उदक होय. चंद्राच्या आगमनाने जसे समुद्राचे हृदय उचंबळून यावे तसे बाळाला आईच्या दर्शनाने अंतःकरणातल्या मानसलाटा भावनांचे किनारे हेलावून सोडतात.


आईचा प्रत्येक शब्द म्हणजे संस्काराचा सार असतो, प्रेमाचा वर्षाव असतो. आईची हाक म्हणजे कारूण्याची लाट असते. आईचा बोल म्हणजे वाऱ्याचा झोल असतो. तिच्या हातचा घास म्हणजे अमृताची आस असते. कर्तव्यात कसूर झाली की तिच्या हातचा मार म्हणजे कतव्याचे खरेखुरे सार असते. 


स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना 'आई' म्हणजे देहातील प्राण वाटते. तर फ. मुं. शिंदे यांना “आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं.” असे वाटते. आईचे महात्म्य वर्णन करताना ते म्हणतात - “आई खरच काय असते


लेकराची माय असते, वासराची गाय असते,

दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते.”


अशा या मार्मिक शब्दांतून आईची थोरवी वर्णन करतात. तर विनोबा निष्काम कर्मयोगाचे उदाहरण म्हणजे 'आई' असे वर्णन करतात. घराला घरपण हे आईमुळेच, घरात चैतन्य निर्माण करण्याचे सामर्थ्य आई मध्येच असते. म्हणून तर शिंदे म्हणतात -

" आई असते जन्माची शिदोरी

ती सरतही नाही उरतही नाही.”

ते सार्थच वाटते.

संत तुकारामांच्या शब्दात सांगावयाचे झाले तर

“संसाराचे सार काय तर ममताळू माय

वात्सल्य पावित्र्य, दातृत्व आदि गुणांचा संगम म्हणजे 'आई'.'


श्रीराम लंकेत ज्यावेळी पोहोचले त्यावेळी त्यांना मातृभूमीची म्हणजे मातेची प्रकर्षाने आठवण झाली तेव्हा ते म्हणून गेले - 'जननी जन्मभूमीश्च - स्वर्गदपि गरीयसि' आईची महती वर्णन करताना असे म्हणावे लागेल. शिवरायांचे स्वराज्य कोणामुळे तर जिजाऊ मुळेच. 


साने गुरूजींचा आदर्श हा त्याच्या आईमुळेच. महात्मा गांधींनी सहनशीलतेचा गुण घेतला तो आईकडूनच. यामुळेच सर्व गुणांचे सार ही आई असे म्हटले जाते. आपल्या बाळाने चुका केल्या तर त्या चुकांची जाणीव करविताना उग्र बनणारी ग्रीष्मऋतुंची आई! 


कौतुकाने वात्सल्याची वृष्टी करणारी आई ही वर्षाराणीची आई! प्रथमदर्शनातूनच मनात प्रसन्नतेचा डोलारा फुलविणारी आई ही वसंत ऋतुची आई! नीति शिक्षण देत देत जीवनातील अस्तित्वांची जाणिव करून देताना गोठवून टाकणारी आई हेमंताची! मनातील चांदणी रात्र सुगंधाने भरवून टाकणारी आई - शरदाची! शीतल वागणूक देणारी आई शिशिराची ! साने गुरूजींना सर्वेसर्वांच्या रूपात भेटणारी आई ही शामची आई! म्हणूनच तर ते म्हणाले -

“आई माझा गुरू, आई माझा कल्पतरू

आई तुला कसा मी विसरू !”मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद