पहिला पाऊस मराठी निबंध | Pahila paus marathi nibandh

 पहिला पाऊस मराठी निबंध | Pahila paus marathi nibandh


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पहिला पाऊस मराठी निबंध बघणार आहोत. जीवनात पहिल्या गोष्टींना खूप महत्त्व असते. जसे पहिल्यांदा शाळेत जाणे, पहिले बक्षीस, पहिली शिक्षा, पहिला मित्र, पहिली नोकरी, पहिले प्रेम वगैरे, तद्वतच 'पहिला पाऊस'ही खूप महत्त्वाचा असतो. 


याचे एक वैशिष्ट्य असते. तो दरवर्षी 'नेमेचि' येत असला तरी त्याचे 'पहिलेपण' दरवर्षी टिकून राहते. त्यामुळे पहिल्या पावसाची खुमारी दरवर्षी आगळीच असते. लहान मुलं या पहिल्या पावसाला.....

“ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा”


असे अमिष दाखवून येण्याच  आमंत्रण देतात. येथील बळीराजा तर चातकाप्रमाणे या पावसाची वाट पाहत असतो. तृषार्त जमिनीला भेगा पडलेल्या असतात. त्याच्या आगमनासाठी ती आसुसलेली असते. एखाद्या प्रेयसीप्रमाणे ती त्याची वाट पाहत असते. त्याच्या विरहाने ती विराण, दुःखी म्लान दिसते.


“ये रे ये रे घना

न्हाऊ घाल पुन्हा पुन्हा "


अशीच साद जणू ती घालत असते. या पहिल्या पावसाची तितक्याच उत्कटतेने वाट पाहत असतात वृक्ष, वेली. त्याच्या अभावी ती निष्पर्ण झाली आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे खालसा झालेल्या व वैभव लयाला गेलेल्या एकेकाळच्या समृद्ध संस्थानिकांसारखी त्यांची आवस्था झालेली असते. 


पावसासाठी ती अशी असुसलेली असतात. जसे खुर्चीसाठी राजकारणी आसुसलेले असतात! वातावरणात विचित्र असा असह्य उकाडा असतो. दिवस कसा कंटाळवाणा होतो. माणसे, प्राणी, वृक्ष सगळेजण हैराण झालेले असतात. चैन अशी कोणालाच पडत नाही. 


सगळेजण त्रस्त असतात. अन् बाहेर आवाज येतो. टप्...टप्टप्! अरे हा आवाज तर पावसाच्या थेंबांचा. अरे पाऊस आला! पाऊस आला! थेंबांचा आवाज वाढत जातो अन इकडे माणसांच्या चेहऱ्यांवरील आनंदही वाढत जातो. वातावरणात लगेच बदल होतो.


वातावरणातला उकाडा जातो अन् एक सुखद थंडावा येतो. धरणी न्हाऊन निघते. पावसाच्या आगमनाने ती तृप्त होते. झाडे, वृक्ष वेली मरगळ झटकून टाकतात. 'पहिला पाऊस' त्यांना मनसोक्त स्नान घालतो. या वात्सल्याने ती भारावून जातात. खट्याळ वाराही या 'पहिल्या पावसाने' पुलकित होऊन आनंदाने शीळ मारतो. सारे वातावरण एका झटक्यात बदलून टाकतो हा आगळा किमयागार - 'पहिला पाऊस'.


“मन चिंब पावसाळी, झाडांत रंग ओले

घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले”


असेच वर्णन या पहिल्या पावसाचे करावे लागेल. पावसामुळे सगळ्यांची अवस्था - “पाऊस येताना थंडगार शिडकावा हिरव्या फांदीवर तजेलदार पानांतला पाऊस गारवा उमलतो अंगभर" अशी झालेली असते.या पहिल्या पासात दार बंद करून, रेनकोट घालून, छत्र्या घेऊन त्याचे स्वागत करणाऱ्या कपाळकरंट्यांचा मला खूप राग येतो.


या पहिल्या पावसात चिंब चिंब भिजूनच त्याचे स्वागत केले पाहिजे. पहिल्या पावसात भिजण्याची मजा काही औरच असते. ती या कपाळकरंट्यांना कशी कळणार ? सारी सृष्टी पहिल्या पावसाचे स्वागत करताना 'हे' मात्र पावसापासून दूर पळतात. 


पहिल्या पावसाप्रमाणे चिरतरूण असलेलीच माणसे (मनाने) या पहिल्या पावसात चिंब भिजू शकतात. जे त्याचे स्वागत करत नाहीत ते मनाने वृद्ध झालेले असतात. 'पहिला पाऊस' नेहमीच तरूण असतो. तर असा हा 'पहिला पाऊस' या पहिल्या पावसाचे वर्णन ना. धों.


महानोर 'डोंगर कठड्यांशी झिंगून काजही काळोख पिणारा' असे करतात. तर एक पाश्चात्य कवी 'पहिल्या पावसा'ला 'My First Love' (माझे पहिले प्रेम) मानतो. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद