वीज नसती तर मराठी निबंध | Vij Nasti Tar Nibandh Marathi

 वीज नसती तर मराठी निबंध | Vij Nasti Tar Nibandh Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वीज नसती तर  मराठी निबंध बघणार आहोत. टिव्ही वर रिलायन्स पॉवरची जाहिरात चालू होती. 'पॉवर ऑन तर इंडिया ऑन'. माझ्या मनात आले, खरच आज जर वीज नसती तर? असा विचार मनात यायला आणि लाइट जायला एकच गाठ पडली. अरे बापरे, आता अभ्यास कसा करायचा? परिक्षा तर तोंडावर आल्यात. 


तेवढयात बाबांचा आवाज आला, 'अरे आज टिव्हीवर बजेट दाखवणार होते. लाइट नाहीत, आता कसे कळेल?' मला जाणवले की वीजेमुळे खरोखर आपले जीवन किती सोपे बनले आहे. एडिसन ने वीजेवर चालणाऱ्या बल्बचा शोध लावला आणि मानवाचे सर्व जीवनच बदलून गेले.


वीजेंचे आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे. थोडा वेळ वीज नसली तर आपल्या रोजच्या कामात किती गडबड गोंधळ माजतो. मी बाहेर डोकावले. सर्वत्र मिट्ट काळोख पसरला होता. सर्व व्यवहार ठप्प झाले होते. वीजेच्या नसण्याने सर्व कारखाने, उद्योगधंदे बंद होणार. उत्पादन बंद होणार. 


देशाचे केवढे नुकसान. आज टिव्ही, फ्रीज, मिक्सर, पंखे, कुलर ही सर्व साधने आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहेत. टिव्ही नाही म्हणजे मनोरंजन नाही. मिक्सर नाही म्हणजे स्त्रियांची पंचाइतच.


उन्हाळयाच्या दिवसात पंखे, कुलर बंद म्हणजे उकाड्याने जीवन हैराण व्हायचा. फ्रीज बंद असले तर कुठले आइस्क्रीम आणि कुठले थंड पाणी? कॉम्प्यूटर्स ही बंद. म्हणजे सगळे आयटी क्षेत्र क्षणात बंद होईल. हॉस्पिटल्सची बरीच उपकरणे वीजेवरच चालतात. 


वीज नसेल तर रोग्यांचे किती हाल होतील. अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया पारच पाडता येणार नाहीत. खरे म्हणजे आजकाल सर्वच क्षेत्रात वीजेचा वापर वाढतो आहे. 


पण मागणी तितका पुरवठा होऊ शकत नाही, हीच खरी अडचण आहे. विजेचा तुटवडा जाणवू नये म्हणून सरकारने अनेक प्रकल्प सुरु केले आहेत. पण आपणही यात हातभार लावू शकतो. वीजेचा वापर कमी करु शकतो. बचत करु शकतो. तरच विजेची ही टंचाई काही प्रमाणात दूर होऊ शकेल. 


मग नेहमी नेहमी भार नियमनाला तोंड द्यावे लागणार नाही. तासाभराने लाईट आले आणि सर्वांनाच हायसे वाटले. मी अभ्यासाला लागले. बाबा टिव्ही पाहू लागले आणि आईने मिक्सरवरील तिचे राहीलेले काम हाती घेतले. हे सर्वच आवाज त्या क्षणी तरी मनाला आनंद देणारे वाटले. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद