केल्याने देशाटन किंवा भटके बना मराठी निबंध | Be Traveler Essay In Marathi

केल्याने देशाटन किंवा भटके बना मराठी निबंध | Be Traveler Essay In Marathi

केल्याने देशाटन किंवा भटके बना मराठी निबंध | Be Traveler Essay In Marathi :या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. "प्रवास करा, प्रवास करा, प्रवास करा" असा आग्रह भारत सरकार नभोवाणीवरून, दूरचित्रवाणीवरून करीत असते. 


त्यामागचा हेतू काय? यापासून सरकारला धनप्राप्ती होते, परदेशी पाहुणे आले तर परदेशी चलन मिळते. हे सरकारच्या दृष्टिकोनातून प्रवासाचे फायदे असले तरी आपल्या दृष्टिकोनातूनही प्रवासाचे फायदे असतात. केल्याने देशाटन मनुजा येते शहाणपण फार' असे आपल्या पूर्वसुरींनी सांगितलेले आहेच.


अलीकडे आपल्या लोकांमध्ये प्रवासाची आवड बरीच वाढीस लागलेली दिसते. शहराशहरांतून अनेक प्रवासमंडळे निघाली आहेत. विविध ठिकाणी त्यांच्या सहली निघत असतात आणि अनेक हौशी प्रवासी त्यांत सहभागीही होत असतात. शाळा-कॉलेजांतील विदयार्थ्यांच्यात तर सहल म्हणजे आनंदाची पर्वणीच. अशा सहलींतून खरोखरच काय साधते?



पूर्वी माणसे प्रवासाला निघत ती पुण्यसंपादनासाठी. 'जन्मास यावे नि काशीस जावे' अशी त्यांची मनीषा असे. साधारण उतारवयात, संसाराची जबाबदारी संपल्यावर ही माणसे यात्रा करण्यास निघत. त्यामागचा त्यांच्या कल्पनेतील हेतू एकच असे आणि तो म्हणजे जन्मभर झालेल्या चुकांचे परिमार्जन करणे आणि मुक्तीची अपेक्षा करणे.



आजच्या प्रवासात 'पुण्यसंपादन' हा हेतू नसतोच असे नाही, पण तो एकमेव हेतू नसतो. नवनवीन ठिकाणे पाहणे; निसर्गाची किमया जवळून निरखणे आणि मानवनिर्मित आश्चर्ये न्याहाळणे असे विविध हेतू त्यामागे असतात. पर्वतशिखरावरून दिसणारी दृश्ये, खळखळ वाहणारे झरे, भव्य, अजस्र आकाराचे दगडधोंडे, उंच कडे आणि अशा उंच कड्यांच्या कुशीत असलेल्या दऱ्या ही सारी निसर्गाची किमया माणसाला तोंडात बोट घालायला लावते. 



त्याचप्रमाणे मनुष्यनिर्मित भव्य म्युझियम्स, प्रचंड धरणे, विदयुन्निमितिगृहे, प्लॅनेटोरियम, अणुभट्टी, सागरसम्राट अशी एक ना दोन, अनेक आश्चर्ये पाहताना माणूस अवाक् होतो. आधुनिक युगातील हे चमत्कार पाहण्यासाठी देशाटन करण्याची नितांत आवश्यकता आहे हे खरेच.


केवळ 'नेत्ररुख' हाच काही या देशाटनामागचा लाभ नाही. अशा त-हेच्या सहली, असे प्रवास मानवी मनालाही अतिशय पुष्टीदायक ठरतात. अशा प्रवासांतून मनावरचे अनेक गंड गळून पडतात. सागराची विशालता पाहिल्यावर मानवी मनातील गर्वाचा फुगा फुटतो. हिमालयाच्या भव्यतेत सामाविलेली छोटीशी आनंदी तृणपुष्पे पाहून मानवी मनाचा ताठा गळून जातो, हेही नसे थोडके.



 प्राचीन काळात सागराची वेस ओलांडणे भारतीयांना निषिद्ध वाटत होते. तेव्हाचा माणूस संकुचित कूपमंडुक वृत्तीचा होता. शुद्धीकरण, प्रायश्चित्त अशा भोवऱ्यात तो गुरफटलेला होता. माणसाने जेव्हा आपल्या भोवतालचे हे तट तोडले तेव्हा त्याला आनंदाच्या दाही दिशा खुल्या झाल्या; 


विशाल अनुभवाचे भांडार खुले झाले, माणसा-माणसांमध्ये जवळीक निर्माण झाली. देशाटन करताना मानवाला उमगले की वर्ण, रूप वेगळे असले तरी सर्व मानवाच्या मनातील भावनांचा प्रवाह एकच आहे. देशाटनाचे हे लाभ नक्कीच अगणित आहेत; अमोल आहेत.


‘चराति चरतो भगः।' असा संदेश उगाचच नाही आपले पूर्वज देत. नव्या नव्या भूमीचे दर्शन घेण्यासाठी झपाटलेल्या भटक्यांच्या प्रयत्नांतूनच नव्या जगाचा शोध लागला. या साहसात संकटांना तोंड दयावे लागते आणि त्यावर मात करताना साहसवृत्तीला आव्हान मिळते.


घरकोंबडा माणस दूरवस्थेला जातो, तर मोकळ्या वातावरणात विहार करणाऱ्या वैनतेयाला कार्याचे गगन तोकडे पडते. आजवरची माणसाची भटकंती मर्यादित जगाची आहे; पण उदयाची भटकंती ही तर अनंत अंतराळाची असणार आहे.

वरील निबंध केल्याने देशाटन किंवा भटके बना मराठी निबंध | Be Traveler Essay In Marathi :  हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 2


केल्याने देशाटन किंवा भटके बना मराठी निबंध | Be Traveler Essay In Marathi


देशाटन म्हणजे आपल्याच संपूर्ण देशात भ्रमण करून त्यापासून आनंद मिळविणे. आनंदाबरोबरच ज्ञान मिळविण्याचे हे एक उत्तम साधन आहे. सामान्यपणे सर्व स्त्री-पुरुष, तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी देशाटनाचे खूप महत्त्व आहे. 


भूगोल, इतिहास, संस्कृती, सभ्यता, राष्ट्रीय एकात्मता भाषा आणि बोलीचा परस्परसंबंध यासाठी व्यावहारिक शिक्षणाचे हे एकमेव उत्तम साधन आहे. देशाटन आणि प्रवासात आपण विविध ऐतिहासिक, भौगोलिक, नैसर्गिक, धार्मिक स्थळे, स्मारके पाहतो. 


प्रसिद्ध इमारती, नद्या, पर्वत इत्यादी चे अध्ययन करतो. देशातील निरनिराळ्या लोकांच्या, संप्रदायांच्या संपर्कात येतो. आपल्या रोजच्या रूटीनमध्ये थोडासा बदल झाल्यामुळे आपणास स्फूर्ती येते. 


नवी जीवनदृष्टी येते. प्रवासाशिवाय इतर असे कोणतेही उत्तम साधन नाही. जे भावनात्मक आणि राष्ट्रीय ऐक्याला बळ देऊ शकेल, देशदर्शन व पर्यटन राष्ट्रभक्ती आणि ऐक्याच्या भावनेची निर्मिती करतात. तिला विकसित करून बलवान बनवितात. 


जेव्हा आपण एखाद्या रमणीय, प्राचीन महत्त्वाच्या, ऐतिहासिक स्थळाला, भवनाला, केंद्राला, तीर्थस्थळाला भेट देतो तेव्हा आपणास अपार आनंद व समाधान मिळते. राष्ट्राबद्दल स्तुती आणि भक्तिभावनेने आपले मन भरून येते.


देशाटनामुळे आपले संशोधन, साहसी, प्रवास,
ज्ञानप्राप्ती इत्यादी आंतरिक जिज्ञासांची तृप्ती होऊन आपला दृष्टिकोन विशाल बनतो. यामुळे आपल्या ज्ञान क्षितिजाचा विस्तार होऊ लागतो. साहसी, संशोधन करू इच्छिणाऱ्या तरुणांसमोर देशाटन अनेक आव्हाने ठेवते. देशाटनामुळे आत्मविश्वास वाढतो. 



बौद्धिक व शारीरिक शक्तींना बल प्राप्त होते. आत्मिक क्षमता प्रखर होतात. देशाटनामुळे पर्वत शिखरावर चढण्याची, सागरावर विजय प्राप्त करण्याची जंगलात. हिंस्र प्राण्यांशी सामना करण्याची संधी मिळते. निरनिराळ्या शहरांत जाऊन तेथील ऐतिहासिक धार्मिक स्थळे पाहणे, डोंगराळ, पर्वतीय प्रदेशात जाणे हे फारच रोमांचक आहे. यांचा आपल्या जीवनावर कायमचा प्रभाव पडतो जो अत्यंत लाभदायक आहे.


प्रशिक्षण व शैक्षणिक संस्था वेळोवेळी आपल्या प्रशिक्षणार्थीना, सहलीला घेऊन जातात. कधी ते ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात तर कधी पर्वतमय प्रदेशांना. एकामुळे ऐतिहासिक ज्ञान आणि माहिती मिळते तर दुसरीमुळे निसर्गाच्या जवळ जाऊन निसर्गाला जाणून घेण्याची संधी मिळते. 


प्रसिद्ध जलाशये, धरणे, अणुशक्ती केंद्रे, उर्जा केंद्रे, बंदरे, कारखाने आदी. पाहिल्यामुळे देशाची आर्थिक शक्ती, स्त्रोत, संसाधने याबद्दलची माहिती मिळते. अशा प्रकारे अन्य संस्कृती, भाषा, आचार-विचार, धर्म संप्रदायाच्या लोकांना भेटल्यामुळे आपणास देशाची विशालता, विविधता आणि संपन्नतेचे ज्ञान होते. आणि हे तर सर्वांना माहीतच आहे की ज्ञानात अमर्याद शक्ती आहे. 



जेव्हा आपण आग्ऱ्याचा ताजमहाल पाहतो, अजिंठ्याच्या लेण्या पाहतो किंवा हिमालयात जातो तेव्हा आपणास आश्चर्य वाटते. प्रशंसा व आनंदाने आपले मन भरून येते. देशाचा विशालपणा, संपन्नता आणि विविधता यांच्यातील ऐक्य पाहून आपल्याला अभिमान वाटतो.


देशाटन हेच भारताचे खरे दर्शन घेण्याचे उत्तम साधन आहे. याच्या साह्यानेच आपणास भारत किती महान, किती विशाल, वैभवसंपन्न, वैचित्र्यपूर्ण, नावीन्यपूर्ण व समृद्ध आहे ते कळू शकते. प्रवासात आपण नवनव्या लोकांना भेटतो. 


त्यांच्याशी विचारांची देवाणघेवाण करतो, नवनवीन पदार्थांची चव घेतो, नव्या भाषा बोली भाषा ऐकतो, प्रवासाचे अनुभव, आठवणी, ज्ञान, आपल्या कायम मनात राहते. पुस्तकांतून मिळणारे ज्ञान इतके चिरस्थायी व मनोरंजक असत नाही. 



प्रवासातून मिळणारे अनुभव ताजे आपले स्वत:चे असतात. ते व्यावहारिकही असतात. पुस्तकी ज्ञान आणि अनुभवांचा शिळेपणा त्यात नसतो. स्वानुभवाचे सहसा आपणास विस्मरण होत नाही.


देशाटनाच्या प्रवासाची तयारी करणेसुद्धा रोमांचक व आनंददायक आहे. प्रवासाची योजना करणे, तयारी करणे एक कला आहे, एक तंत्र आहे. अंदाजपत्रक बनविणे, वस्तूंची यादी तयार करणे कोणत्या मार्गाने जावयाचे, रस्त्यात कुठे व किती वेळ थांबावयाचे, मुक्कामाची सोय करणे इत्यादी साठी कौशल्य व निपुणता असणे अपेक्षित आहे.



तुम्ही कमीत कमी वेळात, साधनांत व खर्चात जास्तीत जास्त आनंद मिळवू इच्छिता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या बुद्धिकौशल्याचा उपयोग करून घ्यावा लागतो. एखाद्या वेळी दु:ख अडचणी, इत्यादी ला तोंड द्यावे लागते. अशा वेळी तुमची क्षमता दाखविण्याची संधी तुम्हाला मिळते. इतरांसह प्रवास करण्यामुळे ऐक्याला बळ मिळते. 



परस्पर प्रेम, मिळून मिसळून राहणे, सहिष्णुता इत्यादी सामाजिक गुणांचा विकास होतो. त्यामुळे संघाप्रती आपलेपणा, एकमेकांवर अवलंबून राहण्याची वृत्ती, सहकार्य इत्यादी चे प्रशिक्षण मिळते व समरसता वाढते. 



प्रवासी दलाचे विविध सदस्य, विविध कार्ये, क्षेत्रे यात दक्ष असलेले असतात आणि ते कार्य विभाजनाद्वारे प्रवासाची योजना व सफलता मोठ्या कौशल्याने मिळवितात. खरोखरच प्रवासाखेरीज शिक्षण, प्रशिक्षण अपूर्ण आहे. प्रवासामुळे शरीर, मनबुद्धीसाठी एक खास टॉनिक आहे. 



जितका प्रवास करेल तितकाच सावध, शिक्षित व व्यावहारिक असतो. प्रवास आपणास अधिक कुशल, प्रखर, बुद्धिमान आणि व्यवहार, कुशल बनवितो. शिक्षण ज्ञानार्जन, अनुभव, आनंद, सावधपणा, काळजी घेणे इत्यादी दृष्टिकोनांतून देशाटन करणे अतुलनीय आहे. 



प्रवासामुळे आपला विचार आणि दृष्टिकोन विशाल, मानवतावादी, उदार बनतो. आज वाहतुकीची जलद साधने. रेल्वे, मोटारी, विमाने, जहाजे इत्यादी मुळे प्रवास करणे, सोपे, गतिमान, व्यापक आणि स्वस्त झाले आहे. आपण सायकल किंवा मोटारसायकलनेही संपूर्ण देशाचा प्रवास करू शकतो. 



पायी प्रवास करण्यात एक वेगळाच आनंद, आकर्षण आहे. आपण आपल्या आवश्यकतेनुसार, आवडीनुसार, साधनानुसार प्रवासाचे माध्यम आणि प्रकार निवडू शकतो. पवर्तमय प्रदेशात गिर्यारोहणाचा रोमांचक आनंददायी अनुभव घेऊ शकतो. 


त्यामुळे आपले साहस, आत्मबल, आत्मसंयम, सखोल विचार करण्याची वृत्ती, अडचणींचा यशस्वीपणे सामना करणे, धैर्य, सहनशीलता, वेळेवर योग्य निर्णय घेणे इ. क्षमतांचा प्रादुर्भाव व विकास होतो. तरुण लोक व विद्यार्थ्यांनी जेव्हा संधी मिळेल तेव्हा गट करून प्रवासाला गेले पाहिजे. 



कधी एकटेही जावे. आई-वडील, नातेवाईक यांच्यासोबत पण प्रवासाला जावे. जितका अधिक प्रवास तितका अधिक अनुभव, कौशल्य व क्षमता प्राप्त होते. फक्त दृढ इच्छाशक्ती व मनोबलाची आवश्यकता आहे. जिथे इच्छा असते तिथे एक नाही अनेक मार्ग असतात.  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद