आमचा खो खो चा सामना मराठी निबंध | Amcha kho kho cha samna essay marathi

 आमचा खो खो चा सामना मराठी निबंध | Amcha kho kho cha samna essay marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आमचा खो खो चा सामना मराठी निबंध बघणार आहोत. ऐन वेळी आलेल्या संकटाला कशाप्रकारे आपण उत्तर देऊनं आपण जिंकू शकतो याचेच वर्णन या निबंधामध्ये करण्यात आले आहे .  या बद्दल आणखी माहिती घेऊया आणि सुरुवात करूया निबंधाला   


माझी दैनंदिन अभ्यासातील प्रगती तशी समाधानकारक आहे; पण खेळाच्या मैदानात मी एकदम तरबेज ! क्रिकेट, व्हॉली-बॉल, खो-खो इत्यादी खेळांत मला विशेष रस आहे. माझी आवड व खेळांतील नैपुण्य यांमुळे गेल्या वर्षीच्या आंतरवर्ग स्पर्धेत मी आमच्या वर्गाच्या क्रिकेट व व्हॉली-बॉल संघांचा कर्णधार होतो; तर खो-खोचा उपकर्णधार होतो. शाळेत मी सर्व खेळ खेळलो आहे. पण गेल्या वर्षीचा आमचा खो-खोचा सामना मी कधीच विसरणार नाही.


गेल्या वर्षी वार्षिक क्रीडास्पर्धेत ८ वी 'अ' विरुद्ध ८ वी 'ब' असा खो-खोचा सामना होता. सामना सुरू होईपर्यंत आम्ही ८ वी 'अ'मधील विद्यार्थी रुबाबात होतो. पण पहिल्या फेरीतच 'ब' संघाने आमच्या तोंडचे पाणी पळवले. तशात आमचा कर्णधार जखमी झाल्यामुळे त्याच्या बदली दुसरा खेळाडू उतरवला. तो अगदीच कमकुवत होता. 'ब'ने दहा विरुद्ध एकोणीस असे गुण मिळवून नऊ गुणांची आघाडी घेतली होती. 


आमचा महत्त्वाचा खेळाडू  जखमी  झाल्याने आम्ही हादरलोच होतो. कर्णधार  जखमी झाल्याने माझ्यावर कर्णधारपदाची जबाबदारी आली. माझ्यावर प्रचंड दडपण आले. मनातल्या मनात मी घाबरलोच होतो. मी कर्णधार असताना अपयश आले, असा ठपका येणार! माझे शत्रु कुत्सितपणे हसत होते! काय करावे, कळतच नव्हते.


अखेरीस मी ठाम निर्णय घेतला. पहिल्या फेरीनंतर पाच मिनिटांची विश्रांती होती. आमच्या संघातील खेळाडूंशी चर्चा केली. प्रथम, प्रतिस्पर्धी संघातील चपळ खेळाडू कोण व कमकुवत कोण, हे सर्वांशी चर्चा करून शोधून काढले. त्यांच्या धावण्यातील वैशिष्ट्ये कोणती, हेही आम्ही निश्चित केले. मग त्या त्या खेळाडूला बाद करण्यासाठी कोणती युक्ती योजायची, हे ठरवून टाकले. 


आमच्यातील कमकुवत खेळाडूंना खांबाजवळची जागा ठरवली आणि त्यांना कोणी शक्यतो खो देऊ नये, असे सर्वानुमते ठरवले. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना बाद करण्यासाठी मी खास युक्ती सांगितली.  प्रतिस्पर्ध्याला बाद करण्यासाठी त्याच्या पायाला स्पर्श करायचा, तसाच प्रयत्न ठेवायचा. माझ्या या युक्तीचा आम्हांला जबरदस्त फायदा झाला. पहिल्या फेरीत आम्ही त्यांचे दहा गडी बाद केले होते; पण या दुसऱ्या फेरीत अठरा बाद केले.


आमची पळण्याची पाळी आली, तेव्हा मी सर्वांना बजावून सांगितले की जास्त पळायचे नाही. बसलेल्या खेळाडूंच्या आसपासच घिरट्या घालायच्या. याचाही आम्हांला फायदा मिळाला. आमचे खेळाडू चटकन बाद होईनात. मी स्वत: तब्बल चार मिनिटे मैदानात टिकून होतो. 


प्रतिस्पर्धांची दमछाक केली. त्यांना आमचे पुरेसे गडी बाद करता येईनात. त्यांना जिंकण्यासाठी आणखी दोन गुण हवे होते. पण मी मैदान जिददीने लढवले. अखेरीस वेळ संपल्याची पंचांची शिट्टी वाजली. आम्हीच जिंकलो होतो. आमच्या वर्गाने एकच जल्लोश केला. मला अक्षरशः उचलूनच घेतले. खरेच, माझ्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद

महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  •  खो-खोचा सामना 
  • ८ वी/अ विरुद्ध ८ वी/ब
  • पहिल्या डावात 'ब' संघ आघाडीवर
  • 'अ' हरणार अशीच चिन्हे
  • 'अ'च्या कर्णधाराचे मार्गदर्शन व कौशल्य
  • अखेरीस 'अ' विजयी
  • विदयार्थ्यांचा जल्लोश 
  • शाबासकी.