विदूषकाचे मनोगत मराठी निबंध | vidushaka che manogat marathi nibandh

विदूषकाचे मनोगत मराठी निबंध | vidushaka che manogat marathi nibandh


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण विदूषकाचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत.   गेल्या उन्हाळ्यातील गोष्ट. आम्ही 'रॉयल सर्कस' बघायला गेलो होतो. तीन तासांच्या करमणुकीनंतर का कोणास ठाऊक , मला एका विदूषकाला प्रत्यक्ष भेटण्याची तीव्र इच्छा झाली. 


मी मागे वळलो. सर्वांत जास्त हसविणारा बुटका विदूषक समोर होतो. गप्पा सुरू झाल्या तो बोलत होता. “मित्रा, मी एक विदूषक सर्कशीचा आत्मा , सर्वांना हसविणारा , व्यथांना लपविणारा. सर्वांची मनं जिंकणारा, गमत्या. चित्र विचित्र पोशाखाचा, रंगबिरंगी मुखवट्याचा, मिष्किल डोळ्यांचा, वात्रट, खोडकर , खो-खो हसणारा. असा मी विदूषक. तुलाही खुप आवडतो ना मी?'


"मित्रा हे हसणं फार महाग असतं रे ! त्यामागे कितीतरी माझ्या व्यथा दडलेल्या असतात रे! पोटाची खळगी भरण्यासाठी, कुटुंबाच्या पालनपोषणासाठी मी येथे राबत असतो. सारं अंग ठणकत , पण तरी चेहऱ्यावर हास्याचे फवारे घेऊन मला रिंगणात यावं लागतं प्रसंगावधान , कौशल्य ठेवून नवनवीन खेळ करावे लागतात ठिगळांच्या पोशाखात नशिबाची ठिगळे झाकू पाहतो. माझ्या दुःखांना उसनी तिलांजली मी देतो. तुमच्यासाठी हसतो आणि हसवितो.'


“पाच-सहा दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. घोड्यावर गमतीदार उड्या मारताना गुडघ्यात लचक भरली होती. पाय खूप दुखत होता. दूरवरच्या गावी कुटुंब राहत होतं. आई, भाऊ, पत्नी यांची सारखी आठवण येत होती. मनाच्या व्यथा ओल्या जखमेसारख्या भळभळ वाहात होत्या. शहरात प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ.कुलकर्णी आल्याचे समजले. वेळ काढून डॉक्टरांकडे पोहोचलो. परिचय न देता प्रथम तक्रार मांडली की डॉक्टर , माझ्या मनाला खूप यातना होत आहेत. सारखे विचार येतात. घरच्यांची खूप आठवण येते. झोप लागत नाही. मन नाराज असते वगैरे वगैरे. डॉक्टरांनी  सर्व ऐकून घेतले व उत्तर दिले , “गावात रॉयल सर्कस आली आहे, ती बघून या. त्यातील विदूषक कमालीचा आहे. इतका हसवितो की सारे दुःख तुम्ही विसरून जाल."


"बघ मित्रा! काय हा विरोधाभास! मी निमूटपणे उभा राहिलो व डॉक्टरांच्या जवळ जाऊन पुटपुटलो, “डॉक्टर , मीच तो विदूषक'! डॉक्टर आ ऽ वासून माझ्या तोंडाकडे बघत राहिले. हेच मूर्तिमंत , जिवंत सत्य आहे मित्रा... आयुष्य , नियती, भाग्य कोणाच्या ताटात कधी काय वाढेल, हे परमेश्वरालाच ठाऊक!“वि.स.खांडेकरांनी म्हटले ना - विनोद हे जीवनवृक्षाचे फूल असले तर अश्रू हे त्या वृक्षाचे फळ आहे. मलाही भावना आहेत. मलाही मन आहे. विनोदासारखी गारवा देणारी फुकंर मी मारतो तुम्हाला प्रसन्न करतो. मग माझे दुःख , माझ्या व्यथा कमी करण्यासाठी तुम्ही माझे मित्र बनणार नाही का?


 आईवडिलांच्या कुशीत बागडणारा मी लाडका पोर ..... आता ते आनंदी क्षण स्मृतीच्या मुठीत बांधलेले. सारे विखुरलेले..... ते बागडणे, नाचणे, ते झोके , मित्र, तांबूस संध्याकाळ , पक्ष्यांचे थवे सारं काही आजही स्वप्नात येतं. मी भूतकाळात जगू लागतो. अचानक सर्कशीच्या खेळासाठी बँड वाजू लागतो. आठवणींच्या पाशातून मला रिंगणात ओढले जाते. परत मी हसतो, हसवितो. अभिवादन करतो. खेळ संपतो हसत हसत प्रेक्षक परततात. मी तंबूत परततो. नकली मुखवटा उतरवितो. बिछान्यावर अंग टाकतो परत व्यथा जाग्या होतात , हास्य झोपी जाते.लाखो प्रेक्षक घरी जातात. मला विसरूनही जातात. वाटत मित्रा, कुणी तरी यावं, मला बोलवलं, प्रेमानं जवळ घ्यावं, माझं सुख दुःख विचारावं मित्रा! आज तुला भेटून मन खूप खूप हलके झाले रे! मरेपर्यंत मी तुला विसरणार नाही ..... कोठेही गेलो तरी!...  बोलण्याचा आवाज बंद झालो.मी भानावर आलो. विदूषक गप्प झाला होता. त्याची व्यथा अजूनही त्याच्या मुक्या ओठांतून बोलत होती.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद