अस्पृश्यता एक कलंक या विषयावर मराठी निबंध | Asprushyata Ek Kalank In Marathi Nibandh

 अस्पृश्यता एक कलंक या विषयावर मराठी निबंध | Asprushyata Ek Kalank In Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण अस्पृश्यता एक कलंक या विषयावर  मराठी निबंध बघणार आहोत. मानवतेवरील एक कलंक अस्पृश्यता-मानवतेवरील एक कलंकच ! समाजाला लागलेली जणू कीडच 'धारयते इति धर्मः' आधार देतो तो धर्म महाभारतात व्यासांनी धर्माची सुंदर व्याख्या केली आहे. 'सदाचार' हा धर्माचा आधार आहे.... 


सामान्यत: सर्व लोक धर्म म्हणजे कर्मकांड कर्मठ आचरण मानून गल्लत करतात. भारतात प्राचीन काळी मनूने आपल्या ग्रंथात जातींचा जन्म कसा झाला याबाबत लिहून ठेवल्याचे आढळते. त्याच्या मते, ब्रह्माच्या विविध अवयवांतून विविध जातीतील लोकांची निर्मिती होते. निर्मिती ही देवांच्या पायांच्या अंगठ्यातून झाल्याचे वर्णन मनुस्मृती ग्रंथात केले आहे.


 त्यामुळे त्या काळातील लोक क्षुद्रांना हीनतेची वागणूक देत. यातूनच अस्पृश्य शब्द उदयास आला. जो स्पृश्य नाही म्हणजे स्पर्श करण्यास योग्य नाही. तोच पुढे अस्पृश्य म्हणून गणला जाऊन त्याच्या कडून गुलामगिरी करवून घेत असत. 


पण पुढे १९ व्या शतकात राजा राममोहन राय, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, शाह महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या थोर समाजसुधारकांनी विविध सामाजिक सस्था व समाजाच्या माध्यमातून जसे ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, थिओसॉफिकल सोसायटी इत्यादीच्या माध्यमातून सामाजिक जागृती व प्रबोधन घडवून आणले व त्याचेच फलित आजच्या समाजात लोक मानवता धर्माचे पालन करीत असल्याचे दिसत आहेत.


असे असले तरी समाजात काही ठिकाणी जात ही माणसाची पात्रता ठरवू लागली. परिणामी लायकी कार्यक्षमता नसलेले उच्चपदस्थ झाले, मग राष्ट्राला योग्य दिशा कशी मिळणार? खरेच 'जी कधीही जात नाही ती जाते.' असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही. परमेश्वराने जग निर्माण करताना याचा विचारही केला नसेल की काय कोण जाणे पण 


आज समाजातील लोक परस्परात भेदाभेद हेवेदावे करताना दिसत आहेत. माणुसकी हा धर्म विसरून लोक मत्सरीपणाने, ईय॑ने अन्यायकारक रूढीचालीरीती आजही पाळत आहेत.


मानवता धर्माचे ब्रीद आचार्य विनोबा भावे सोप्यासुंदर शब्दांत सांगतात, 'माणसाने माणसाशी माणसासारखे' वागणे म्हणजे मानवता दुसऱ्याच्या सुखाने आनंदी व दुःखाने दुःखी होणे ही खरी मानवतेची कसोटी. पण माणूस नेमका इथे घसरतो कारण मत्सर त्याला ग्रासतो असतो..


इंग्लंडमधील उच्चभू उदारमतवादी लोक ज्याप्रमाणे कनिष्ठ लोकांवर दया दाखविण्याचा विचार मांडतात. त्याचप्रमाणे भारतातील उच्चवर्णीय ब्राह्मण अस्पृश्यता निवारणाकडे दया दाखविण्याच्या दृष्टिकोनातून पाहत होते. 


म. फुलेंनी यास 'भूतदया' नाव देऊन त्यांनी समाजाला संदेश दिला की जर खऱ्या अर्थाने हे नाहीसे करायचे असेल तर मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे.


 आपल्या समाजात घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या थोर महात्म्याला ही अस्पृश्य कुळात जन्माला आल्याने त्याकाळात यातना सोसाव्या लागल्या त्यावर मात करून त्यांनी 'Who were the Shudras?' या ग्रंथात अस्पृश्य कोण आहेत. अशा त्यांना पडलेल्या प्रश्नाचे समाजापुढे स्पष्टीकरण केले आहे.



त्याकाळी अस्पृश्यांना घृणास्पद वागणूक मिळत असे. त्यांना मंदिर प्रवेश नाकारला जाई इतर लोकांप्रमाणे आचरण करण्याचीही मनाई होती. जाती या कर्मावर न ठरता धर्मावर ठरली जाई धर्मग्रंथाच्या प्रभावामुळे बुद्धिवादाचा विकास खंडीत झाला होता. 


अनेक समाजसुधारकांनी 'अस्पृश्यता नष्ट झाल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही' हे ठामपणे सांगून लोकजागृती करण्याचे कार्य केले त्यांकरिता अस्पृश्यांना आरक्षणाची तरतूद राज्यघटनेत डॉ. आंबेडकरांनी केली. 



यामागचा मूळ उद्देश हाच की शेकडो वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या अज्ञानी समाजाला इतर वर्गातील लोकांबरोबर काळाच्या प्रगतीबरोबरच पुढे येऊन मागील शेकडो वर्षांतील तोटा कमी वेळात भरून काढणे हा होता. त्यांनी भोगलेल्या यातनांचे वर्णन शब्दातही करता न येण्यासारखे असल्याने झालेली जखम लवकरात लवकर भरून निघावी, त्याचे व्रणही न राहावेत हाच हेतू समाजसुधारकांचा होता.



पण आजही ती जखम जरी बरी झाली असली तरी त्याचे अंतरंगातील व्रण अजूनही ओले असल्याचे दुःख होत आहे.ते या कारणामुळेच की आजही अस्पृश्यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन फारसा सुधारला नाही. समाजाने आपपर भाव न मानता समता स्वीकारली पाहिजे.

"एक देव, एक देस, एक आशा

एक जाती एक जात एक भाषा" 


अशी एकत्वाची शिकवण भारतीय संस्कृती देते. तिचे आचरण सर्वसामान्य जीवनात करणे ही काळाची गरज व तिचे भान समाजाने ठेवले पाहिजे.

मनुष्याने बुद्धीच्या जोरावर जीवसृष्टीत श्रेष्ठ स्थान मिळवले असले तरी अजूनही मनुष्यप्राण्यात पशुत्व शिल्लक असल्याचे दिसते. एकाच ईश्वराची लेकरे असे म्हणत असतानाच आपापसात झगडत असतात. जर असे नसते तर आपल्यातीलच काही लोकांना अस्पृश्य लेखून त्यांना गावकुसाबाहेर ठेवले असते का? त्यांना जगण्याचा मूलभूत हक्कच नाकारण्यात येतो. त्यांची सावलीसुद्धा त्याज्य ठरविली जाते. 



अज्ञान व अंधश्रद्धा यांनी पोखरलेले यांचे जीवन कसपटासमान असते ही विषमतेची दूरी बुजविण्यासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ही त्यांच्या काळातील चातुर्वर्ण्याचे स्तोम कमी करण्यासाठी प्रयत्न केले. सर्व जातीजमातींच्या लोकांना आपल्यासोबत घेतले ते एकच जाणत होते की 'मी माणूस आणि ती ही माणसेच!' त्याच प्रमाणे संत तुकाराम, एकनाथ तसेच महात्मा गांधींनी अस्पृश्यांना 'हरिजन' म्हणजे 'ईश्वराचे लेकरू' संबोधले आहे.


आजच्या विज्ञानयुगात माणसाने 'वसुधैव कुटुंबकम'चे स्वप्न साकार करून मानवधर्माचे पालन केले पाहिजे. मनातील भ्रामक पिंजरे तोडून अस्पृश्यांना लागलेला कलंक धुऊन काढला पाहिजे. 


मला जसे स्वातंत्र्य आहे तसे इतरांचे स्वातंत्र्यही आहे हे मान्य करून जातिभेद न मानता समता स्वीकारली पाहिजे. तरच आकाशाच्या एकाच छताखाली अवघी मानवजात सुखेनैव नांदेल तरच अस्पृश्यता मानवतेवरील कलंक राहणार नाही. त्याचे समूळ उच्चाटन होईल.


यासाठी ज्ञानेश्वरांनी व्यक्त केलेल्या - 'भूतां परस्परे जडो मैत्र जीवाचे ।' या मानवधर्माचे आचरण करण्याची गरज आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .धन्‍यवाद