आठवड्याचा बाजार मराठी निबंध l Aathavdyacha Bajar Marath Nibandh

आठवड्याचा बाजार मराठी निबंध l Aathavdyacha Bajar Marath Nibandh 


 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आठवड्याचा बाजार मराठी मराठी निबंध बघणार आहोत. डोंगरगाव नावाप्रमाणेच डोंगराचा कुशीत वसलेले छोटेसे गाव. गावातील बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती. शेतीला पूरक असे व्यवसायही तेथे चालतात. 


गावाच्या गरजा भागविण्यासाठी नित्याची दुकाने तेथे नाहीत. काहीही वाणजिनसा घ्यायच्या असतील, तर आठवड्याचा बाजार हाच एकमेव पर्याय आहे. दर सोमवारी हा बाजार भरतो. प्रत्येक शेतकरी आपापल्या शेतातून पिकलेल्या भाज्या, बारीक-सारीक नित्याच्या वस्तू विक्रीसाठी आणतात. 


सगळे काही त्या आठवड्याच्या बाजारातूनच घ्यावे लागते. आजूबाजूच्या गावांतील लोकही तेथेच खरेदीसाठी येतात.बाजारात दुकाने नाहीत, की गाळे नाहीत. विक्री करणाऱ्यांना आधी जाऊन जागा पकडावी लागते. कोणाचीही जागा निश्चित नाही, की राखीव नाही. 


आठवडी बाजाराच्या दिवशी शाळेला सुट्टी. त्यामुळे शाळकरी मुले अभ्यासाची पुस्तके बरोबर घेऊन बाजारात मोक्याची जागा मिळावी म्हणून आधीच जाऊन बसतात. तिथे जागा धरून अभ्यास करत बसायचे आणि आपली जागा निश्चित करण्यासाठी एखादे कांबळे नाहीतर धोतराचा लांब तुकडा पसरायचा. तेवढी जागा त्यांची. 


त्या जागेसाठी ठरलेले भाडे नसावे. विक्रेत्यांचे हातावरचे पोट.सकाळी-सकाळी भाजीच्या टोपल्या आणि तागडी डोक्यावरून घेऊन येणारे शेतकरी पार धपापून गेलेले असतात. काहींना तर डोंगराच्या रस्त्याने यावे लागते. 


बघता-बघता तासाभरात सगळा बाजार फुलून जातो. लाल लाल टोमॅटो, कोवळी हिरवी गवार, भेंडी, पालेभाज्या, कोथिंबीर, मिरच्या, कोबी, काकडी, मुळा, पडवळ अशा सगळ्या ताज्या। ताज्या भाज्या कलात्मक रीतीने मांडल्या जातात. मग त्यांच्या ग्राहकांना खेचून घेण्यासाठी आरोळ्या सुरू होतात. ओरडून-ओरडून त्यांचा घसा फुटेल की काय, असे वाटू लागते.


बाजारात स्त्रिया, पुरुष, मुली खरेदीसाठी येऊ लागतात. मोलभाव करणे सुरू होते. विक्रेते वैतागतात. एवढ्या कष्टाने पिकविलेल्या भाज्या, त्या बाजारापर्यंत आणण्याचे श्रम, याची ग्राहकांना काहीच किंमत नसते. भाव पाडून मागणाऱ्यांचा राग आला, तरी तो मुकाट्याने गिळून टाकावा लागतो. 


भाजीपाल्याव्यतिरिक्त पुस्तकांचे, खेळण्यांचे, बारीकसारीक गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल्स, ..... स्टॉल्स कसले, रस्त्यातच पटकुऱ्यावर मांडलेले तात्पुरते दुकान औटघटकेच्या राज्यासारखे. कोणत्याही वस्तू कोठेही मिळणार. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणसांनी फुललेला बाजार सूर्य मावळायला लागला, की मावळू लागतो. 


त्या काही तासांत माणसांच्या विविध रूपांचे दर्शन घडते. काही जा उगीचच प्रदर्शन पाहायला आल्यासारखे येतात. त्यांनी काही घ्यायचेच असते, असे नाही; पण नुसते चकाट्या पिटतात. 


ग्रामीण भागातील जीवनाचे दर्शन घडविणारा हा आठवड्याचा बाजार खरोखरीच ग्रामीण जीवनातील एक आवश्यक भाग आहे. ऊन, पाऊस, वादळ, वारा यांच्यावर मात करून जीवनसंघर्ष करीत आनंदाने जगणाऱ्या माणसांचे दर्शन येथे घडते.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद