दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध | Dushkalgrast Shetkryach Manogat Marathi nibandh

 दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध | Dushkalgrast Shetkryach Manogat Marathi nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. समस्त भारतवासियांना माझा नमस्कार. नाही ओळखलेत मला? अहो, मी तुमचा अन्नदाता. तुमचे उदरभरण करणारा; पण स्वत: मात्र अर्धपोटी राहणारा भारतीय शेतकरी. ]


भारतवर्ष म्हणजे कृषिप्रधान देश. ७५% बांधव खेड्यात राहून शेती करतात. त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे.


मित्रांनो, हे कलियुग आहे. अत्याचार वाढत आहे. निसर्गदेखील लहरी बनला आहे. वरुणराजाला प्रसन्न ठेवण्याचा आम्ही सतत प्रयत्न करतो; पण तोही अधून-मधून रुसतो. सारी शेती पावसावर अवलंबून. पाऊस खूप पडला, तरी ओला दुष्काळ आणि नाहीच पडला, 


तर कोरडा दुष्काळ. अशा नैसर्गिक संकटांना सतत सामोरे जावे लागते. सकाळपासून रात्रीपर्यंत कष्ट आणि कष्टंच. कष्ट करण्याचे काही नाही वाटत; पण कष्ट करूनही त्याचे फळ मिळत नाही. अठरा विश्वे दारिद्र्य पाचवीला पुजलेले, त्यामुळे सोसावा लागणारा अपमान, मानहानी!


आम्ही शेतकरी म्हणजे कर्जात जन्म घेतो, कर्ज फेडण्यातच सर्व आयुष्य खर्च करतो आणि कर्जबाजारी म्हणूनच मृत्यू पावतो. आधुनिक शेती, सरकारी योजना, सरकारी मदत केवळ कागदोपत्री. आम्हाला त्याचा काय फायदा? नवीन अवजारे खरेदी करायची, तर पैशाचा प्रश्न. कर्ज घ्यावे, तर भरमसाठ व्याज. 


वर्षाखेरीज गोळाबेरीज शून्य ! अहो, पाण्याची समस्या तर फारच बिकट आहे. पावसावर सारी भिस्त. पेरण्या झाल्या आणि पावसाने दडी मारली, बीजातून बाहेर आलेले अंकुर पाण्याअभावी जळून गेले. आमच्या आशादेखील त्या अंकुरांप्रमाणेच जळून गेल्या. खायचे काय? जगायचे कसे? हा प्रश्न. हा जीवनसंघर्ष नित्याचाच!


माझ्या शेतात एक विहीर आहे; पण उन्हाळ्यातच ती आटून जाते. पाण्याचा अभाव असल्याने शेती हा व्यवसाय म्हणून करणे अगदी कठीण होऊ लागले आहे. श्रम, सेवा आणि त्याग ही मूल्ये जोपासूनही आम्हाला मात्र जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. 


आता बघा ना, आमचे राहणीमान किती सामान्य, साधे आहे, गरजादेखील किती कमी आहेत; पण त्याही पूर्ण होऊ शकत नाहीत.दुष्काळ पडणे, हे तर आता आमच्यासाठी नित्याचेच आहे. शेती पिकण्याचे स्वप्न पूर्ण होत नाहीच; पण साधे पिण्याच्या पाण्याचेही हाल होतात. 


कोसो मैलांवरून हंडे वाहन आमच्या माना मोडून जातात. खांद्याचे काटे ढिले होतात. पिण्याच्या पाण्याचे हाल कसे सहन करणार? पाणी म्हणजेच जीवन. पाण्याअभावी आमचे जीवन धोक्यात येते. सतत दुष्काळाची टांगती तलवार. सारे भविष्यच अंधारात. सगळ्यात मोठे दु:ख म्हणजे कच्च्या-बच्च्यांचे हाल डोळ्यांनी पाहणे. त्यांचा काय गुन्हा? तर ते आमच्या पोटी जन्माला आले.


दुष्काळग्रस्त म्हणून सरकार मदत देण्याची घोषणा करते. पण प्रत्यक्षात हातात काय येते? सगळे निधी आमच्यापर्यंत येईपर्यंतच गोठून जातात. फसवणूक! घोर फसवणूक. सामान्य जनतेला वाटते, शेतकरी उगीचच कांगावा करतात. सरकारकडून कितीतरी मदत मिळते. पण खऱ्या गोष्टी सामान्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. 


दुष्काळ जाहीर होतो, काही दुष्काळी कामे काढली जातात; पण त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत नाही. बी-बियाणे, अवजारे, खते यांसाठी घेतलेले कर्ज फेडता येत नाही. हातात काहीच येत नाही. सारे हातातून निसटून जाते. मग शेतकऱ्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा कोणता पर्याय उरतो का, सांगा? जिवंत मरणे झेलण्यापेक्षा कायमची सुटका बरी ! याला तुम्ही भेकडपणा म्हणाल. म्हणतात ना, जावे त्याच्या वंशा!


अहो, मागच्या वर्षी आमचा बैल गेला. दुष्काळात माणसांना खायला नाही, तर जनावरांना कोठून मिळणार? दुष्काळामुळे हिरवी पाती उगवणार कुठून ? पिण्यासाठी पाणी नाही, खाण्यासाठी अन्न नाही. जीवनावश्यक गरजांमध्ये प्रथम क्रमांकावरच्या गरजा म्हणजे अन्न, पाणी. त्यासाठी काही तरतूद नाही. 


सगळे जीवनच भकास. मंडळी, बैल गेला, तर माझ्या जवान पोरांनी बैलाच्या जागी स्वत:ला जुंपून घेतले नि शेत नांगरले. एवढे परिश्रम करून हाती काय लागले? पावसाने आशा दाखवली. जेमतेम आठवडाभर पडला. आम्ही बी पेरले. पेरणी झाली म्हणून सुखावलो. 


मोत्याचे दाणे उगवणार, या आशेने आनंदी होतो. पण कुठचे काय? पावसाने हुलकावणी दिली. सारे पीक जळून गेले. नव्हे; आमच्या आशाच जळून गेल्या.मंडळी म्हणतात ना, सुख सांगावे जना, दु:ख सांगावे मना. पण मनाला सांगून काय फायदा? आमचे आक्रंदणारे मन समजणार कोणाला नि कसे? म्हणून मनोगतातून आमची व्यथा मांडली. तुम्ही सारे आमच्या पाठीमागे उभे रहा. 


आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला दूर करण्यासाठी प्रार्थना करा. मी तुमचाच अन्नदाता आहे. मला खायला मिळाले, तरच मी जगेन आणि जगलो, तरच धान्य पिकवीन. तेव्हा दुष्काळाच्या काळात आम्हाला समजून घ्या आणि मदतीचा हात पुढे करा. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद