जीवनात स्वाध्यायाचे महत्त्व मराठी निबंध | JIVANAT SVADHYACHE MAHTTVA ESSAY IN MARATHI

 जीवनात स्वाध्यायाचे महत्त्व मराठी निबंध | JIVANAT SVADHYACHE MAHTTVA ESSAY IN MARATHI 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जीवनात स्वाध्यायाचे महत्त्व मराठी निबंध बघणार आहोत. 'सत्यं वद, धर्मं चर, स्वाध्यायान्मा प्रमदः' ही उपनिषदाची शिकवण आहे. घासल्यामुळे भांडे स्वच्छ होते, तरीही ते पुन:पुन्हा घासावे लागते. तसेच विद्या व कला ह्यांच्या बाबतीतदेखील आहे. 


मग ती कोणतीही विद्या असो वा कला, दोन्हींसाठी स्वाध्याय आवश्यक असतो. आपली कला फुलवायची असेल, तर प्रत्येक कलाकाराने आपल्या कलेचा रियाज केला पाहिजे. चित्रकाराने रोज चित्र काढलेच पाहिजे, तरच तो कलेत पारंगत होईल. 


कलेला परिपूर्णता येण्यासाठी स्वाध्याय हवाच.राजा म्हटला, की पराक्रम आलाच. शत्रूला जिंकल्यावरही राजाला स्वस्थ बसून चालत नाही. सैन्याला सुटी देऊनही चालत नाही. शत्रू असो व नसो, सैन्य नेहमी सज्ज असलेच पाहिजे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर प्रत्येकाने हे पथ्य पाळले पाहिजे. 


आपले शस्त्र, आपले सैन्य, आपले ज्ञान ह्या साऱ्यांची धार जे कायम ठेवत नाहीत, ते या जगात जगायला अपात्र ठरतात. मानवी जीवनाच्या बाबत विचार करायचा झाल्यास, जीवनात विविध समस्या उत्पन्न होत असतात. त्या समस्यांना तोंड देण्यासाठी समस्यांचा सतत अभ्यास करावा लागतो. 


हा अभ्यास म्हणजेच स्वाध्याय. मनन-चिंतन केल्यामुळे साध्या-साध्या शब्दांचे अनंत अज्ञात अर्थ उमगतात; अर्थांच्या वेगवेगळ्या छटा समोर येतात. स्वाध्यायामुळे ज्ञानसंपन्नता येते. ज्ञानी माणूस आपोआप प्रकट होतो. म्हणूनच रामदास म्हणतात  'अभ्यासे प्रकट व्हावे.' ज्ञानग्रहणाची, उपासनेची उत्कृष्ट पद्धत म्हणजे स्वाध्याय.


आज विद्यार्थ्यांच्यात अध्ययनशीलतेचा अभाव दिसून येतो. शिक्षकदेखील आपले ज्ञान अद्ययावत ठेवत नाहीत, आपल्या विषयाचा सखोल अभ्यास करत नाहीत; त्यामुळे ते आपल्या विषयात पारंगत असत नाहीत. आपले ज्ञान चौफेर असले पाहिजे. 


आपल्या विषयाची तरी निदान संदर्भपुस्तके मिळविली पाहिजेत, ती वाचून त्यांवर चर्चा घडविली पाहिजे; परंतु असे दृश्य दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थीसुद्धा केवळ परीक्षार्थीच बनतात. केवळ पस्तीस टक्के मिळणाऱ्या ज्ञानावर खुश असतात. याचाच अर्थ असा की, पासष्ट टक्के अज्ञान त्यांना चालते.


जग वेगाने धावत आहे; नवनवी शिखरे पादाक्रांत करीत आहे. अशा वेळी आपण मागे राहून चालणार नाही. नवनवे ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यांच्यामुळे ज्ञानाची कवाडे उघडत आहेत. ग्रंथ ही मानवाची अद्भुत निर्मिती आहे. ग्रंथ संस्कार करतात. उपदेश करतात आणि संकटप्रसंगी मार्ग दाखवतात. 


ग्रंथांच्या माध्यमातून आपण मोठमोठ्या विद्वानांशी संवाद साधू शकतो. अशा ग्रंथांना आपण जवळ करत नाही. यासाठी वेळेचे कारण सांगतो. पण हे बरोबर नाही. ग्रंथ एकाच वेळी गुरू, माता-पिता, बंधु-भगिनी, आप्तेष्ट, पत्नी, कन्या, पुत्र या सर्वांची भूमिका बजावतात, 


आपल्याला प्रेमाचा सल्ला देतात आणि आपल्या समस्यांची उकल करतात. तेव्हा मित्रांनो, अशा सामर्थ्यशाली ग्रंथदेवतेची उपासना करा व उन्नतीचा मार्ग प्रशस्त करा. स्वाधायाचे महत्त्व जाणा.पुन्हा उपनिषदातील  'स्वाध्यायान्मा प्रमदः' हे वचन लक्षात ठेवा. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद