मावळतीचा सूर्य मराठी निबंध | MAVATICHA SURAY ESSAY IN MARATHI

  मावळतीचा सूर्य मराठी निबंध | MAVATICHA SURAY ESSAY IN MARATHI 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मावळतीचा सूर्य मराठी निबंध बघणार आहोत. निसर्गाने मानवावर खूप मोठे उपकार केलेले आहेत. आपल्या सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी व बलशाली तारा म्हणजे सूर्य. हा सूर्य नियमित उगवतो. 


तो सारी सृष्टी तेजाने उजळून टाकतो, प्रकाश देतो, उष्णता देतो; पण कधीही त्याने आपल्या या कार्यात कुचराई केलेली नाही, की आपल्या या प्रकाशाचे-उष्णतेचे बिल पाठविलेले नाही. असा हा सूर्य आपल्या सर्वांचा मित्र आहे. अगदी खरा मित्र. तुम्ही त्याच्याशी कसेही वागा, तो


आपल्या वागण्यात कधीच बदल करीत नाही. सूर्य दररोज न चुकता उगवतो आणि मावळतो. सूर्य तोच; पण उगवत्या सूर्याला सारे वंदन करतात, आणि अर्घ्य देतात. त्याची सोन्याची पाऊले माझ्या घरात येऊ देत, अशी प्रार्थना करतात. सूर्यप्रकाशात वनस्पती आणि झाडे आपले अन्न तयार करतात. म्हणूनच उगवत्या सूर्याला मान अधिक मिळतो.


"जो तो वंदन करी उगवत्या

जो तो पाठ फिरवी मावळत्या" 


अशी जगाची रीत आहे; अशी मानवी प्रवृत्ती आहे. पण हा सूर्य त्याबाबत कधीच खंत करीत नाही. त्याची वृत्तीच परोपकारी असते. जेव्हा सूर्य अस्ताला जातो, तेव्हा तो लाल, सोनेरी गोळा दिसतो. हळूहळू तो पश्चिमेकडे जाऊ लागतो. तो जेव्हा मावळतो, तेव्हा तो अगदी संथपणे खाली खाली जातो. 


त्यापूर्वी आकाशात संधिप्रकाश दिसू लागतो. तो अप्रतिम दिसतो. क्षितिजावर हळूहळू काळोख पसरू लागतो. परंतु त्यापूर्वी लाल रंगाची छटा, त्यात सोनेरी रंग मिसळतो, तो संमिश्र प्रकाश फारच सुंदर दिसतो. ____ एकाच वेळी सूर्यास्त आणि चंद्रोदय खरोखरीच अवर्णनीय ! हे दृश्य पाहताना व्यवहारात नित्य घडणाऱ्या गोष्टींची जाणीव होते. 


वास्तवात असेच घडत असते. कोणीतरी निवृत्त होतो; तर त्या जागी कोणाची तरी नियुक्ती होते किंवा राजकारणातही कोणत्यातरी पक्षाचा अस्त आणि त्याच वेळी कोणत्या तरी नवीन पक्षाचा उदय होतो. बुडत्याला वाचविणारा कोणी नसतो. 


त्याला राम राम म्हणून निरोप दिला जातो. हे सत्य समोर येते, ते मावळतीचा सूर्य पाहून. मावळतीचा सूर्य जाणीव करून देतो, ती मानवी प्रवृत्तीची. मनुष्य अत्यंत स्वार्थी आहे. आपल्या स्वार्थासाठी तो तोंडपुजेपणा करतो. ‘असतील शिते, तर जमतील भुते' याचा प्रत्यय तर येतच असतो. असे असले, तरी सूर्य मात्र समदर्शी आहे. 


निंदा करा की वंदन करा, त्याला काहीच फरक पडत नाही. तो मावळतीला जातो इथून; पण तो कुठेतरी कार्यरत असतोच. म्हणून तर एका देशात रात्र असेल, तेव्हा दुसऱ्या देशात दिवस असतो. सूर्य तोच असतो; म्हणूनच मला हा मावळतीचा सूर्य न बोलता त्याच्या कृतीतून बरेच काही शिकविणारा गुरूच वाटतो. पडत्या काळातच माणसाची खरी परीक्षा होते.


"मावळत्या दिनकरा. 

अर्घ्य तुज देउनी दोन्ही करा." 

मी तुझे वंदन करतो. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद