माझा आवडता छंद मराठी निबंध | Maza Avadta Chand Essay in Marathi

 माझा आवडता छंद मराठी निबंध | Maza Avadta Chand Essay in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता छंद मराठी निबंध बघणार आहोत.या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. तसं म्हटलं तर माझ्या आवडीच्या खूप गोष्टी आहेत. मला निसर्ग आवडतो. रामप्रहरी आकाशात गुलालाची उधळण करणारा सूर्योदय मला आवडतो. 


तसाच संध्याकाळी आकाशात केशराची शेतं पिकविणारा सूर्यास्तही आवडतो. पावसाळ्यात कांडरासारखी फुगून बेभानपणे वाहणारी नदी आवडते, तर शेजारीच उभा राहून खळाळत वाहणाऱ्या नदीकडे पितृवत्सल नजरेने पहाणारा भक्कम कडाही आवडतो. 


निसर्गातली पानं, फुलं, प्राणी सगळं सगळं आवडतं. एखाद्या सापाची लखलखती कांती मला मोहिनी घालते. वाटतं तो तकतकीत साप, शंकराप्रमाणे गळ्याभोवती लपेटून घ्यावा. घनदाट छाया जमिनीवर टाकणारा डेरेदार वृक्ष आवडतो; तशीच झाडाच्या दिशेने वाटचाल करणारी सर्पटोळासारखी दिसणारी हिरवीगार वेलही आवडते.


निसर्गनिर्मित गोष्टीप्रमाणे मानवनिर्मित गोष्टीही आवडतात. किती म्हणून सांगू ? मला एच्. एम्. टी. चं घड्याळ फार आवडायचं. थोडा हट्ट करून मी बाबांकडून एक एच्. एम्. टी.चं घड्याळ वसूल करून घेतलं. दुसऱ्या दिवशी ते मनगटावर बांधून मोठ्या दिमाखात शाळेत गेलो. 


जो भेटेल त्याला अभिमानाने दाखवलं. एक मित्र म्हणाला, 'केवढं मोठं घड्याळ हे ? हे बांधायचं तर मनगट कसं दणकट असायला हवं. तुझं मनगट म्हणजे कोथिंबिरीची काडी !' 'पांढरं कशाला घेतलंस ! सोनेरी घ्यायचं !' दुसऱ्या मित्राचं मत. 'काय तबकडी (डिस्क) आहे रे ! 


आकडे नीट दिसत पण नाहीत.' तिसरा भकला. झालं! त्या घड्याळाबद्दलचं माझं प्रेम, आकर्षण समुद्राला लागणाऱ्या ओहोटीसारखं ओसरू लागलं. दुसऱ्या दिवशी घड्याळ लावताना हात थरथरायला लागला. घड्याळ न बांधताच मी शाळेत गेलो.


या साध्या प्रसंगानं माझ्या मनात विचारांचा कल्लोळ उडाला. माझी आवड ! अरे, पण माझी आवड - माझी आवड ! तिची निवड करायचं स्वातंत्र्य मला आहे का ? आवडीने घेतलेलं घड्याळ मला नावडायला लागलं, का ? तर ते माझ्या मित्रांना आवडलं नाही म्हणून ! 


मग आवड निश्चित कोणाची? माझी की दुसऱ्यांची ? मला अभ्यास करायची मुळीच आवड नाही. तरी मी तो करायचा, का ? तर आई वडिलांना आवडतो म्हणून ! मला नाटकात काम करायला आवडतं, क्रिकेट खेळायला आवडतं. पण मी ते करायचं नाही, का ? तर आईवडिलांना आवडत नाही. 


अरे, मग माझ्या आवडीचं काय ? खरं सांगतो मित्रानो, ‘माझी आवड' 'माझी आवड' असं जे आपण म्हणतो ना, ती आपली आवड नसतेच, ती असते दुसऱ्यांची. कॉलेजमध्ये जाणारी माझी बहीण म्हणते, 'मला नऊवारी साडी नेसायला आवडते. पण मी नेसत नाही. 


कारण ते माझ्या मैत्रिणींना आवडणार नाही. त्या माझी टिंगल करतील.' मग आवड कोणाची ?आता हेच पहा ना ! हा माझा निबंध मला आवडला. असे निबंध लिहिणं ही माझी आवड आहे. पण मास्तरांना आवडेल का ? परीक्षकांना आवडेल का ? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


 निबंध 2


माझा आवडता छंद मराठी निबंध | Maza Avadta Chand Essay in Marathi


जितक्या व्यक्ती तितके छंद असतात. त्याला काही सीमा नाही. नवनवीन छंद पाहावयास मिळतात. जुने तर आहेतच. छंदामुळे जीवनातील आनंद वाढतो. रिकाम्या वेळेचा सदुपयोग होतो. मनोरंजन होते. उत्साह येतो. छंदाला पर्यायी दुसरे काही नाही. 



जीवनातील नीरसपणा, रुक्षपणा घालवून छंदामुळे आपणास जीवनाचा एक नवा अर्थ आणि संदर्भ कळतो. रिकाम्या वेळात आपण आपली छंदाची आवड पूर्ण करतो. याचा मुख्य उद्देश मनोरंजन करून घेणे हा असतो. छंद व्यवसायापेक्षा भिन्न असतो. छंदामध्ये पैसा मिळविणे हा उद्देश नसतो. 



आर्थिक फायदाही छंदात मिळवायचा नसतो. जो व्यवसाय असतो तो छंद नसतो. आणि जो छंद असतो तो व्यवसाय नसतो. परंतु माझा छंद दुसऱ्याचा व्यवसाय असू शकतो. उदा. बागकाम एक छंद असतो तसाच तो उदरनिर्वाहाचा छंद पण असतो. 



एखादी व्यक्ती सकाळ-संध्याकाळ रिकाम्या वेळात बागकाम करून पैसे मिळवू शकते. स्वत:चे मनोरंजन करून घेऊ शकते. तिच्यासाठी हा छंद आहे तर माळ्याचे बागकाम हा व्यवसाय असतो.



माझा आवडता छंद आहे पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह करणे त्यात मला खूप आनंद मिळतो, खूप मनोरंजन होते. हा छंद मला लहानपणापासून आहे. माझ्याजवळ देशविदेशांतील तिकिटांचा एक चांगला मोठा संग्रह आहे. त्यात दुर्मिळ अशी पोस्टाची तिकिटे आहेत. त्याची किंमत हजारो रुपये आहे. परंतु ते मी विकण्यासाठी ठेवलेले नाहीत तर जपून ठेवण्यासाठी ठेवलेले आहेत. 



हळूहळू माझा संग्रह वाढत आहे. आमच्याकडे खूप पत्रे येतात. त्याची तिकिटे मी काढून ठेवतो व माझ्या संग्रहात ती ठेवून देतो. माझे मित्र पण माझ्या छंदात मला सहकार्य करतात. जेव्हा त्यांच्याकडे एखादे वेगळे तिकिट पाकिटाला लावून येते तेव्हा ते तिकिट माझ्यासाठी ते सुरक्षित ठेवून देतात.


माझे मामा ज्या फर्ममध्ये काम करतात तिथे विदेशांतून खूप टपाल येते. ते मला ती तिकिटे आणून देतात. माझ्याजवळ पोस्टाच्या तिकिटांचे किती तरी अल्बम आहेत. किती तरी महत्त्वाची तिकिटे मी बाजारातून व अन्य लोकांकडून विकत घेतली आहेत. 


माझे दोन तीन पत्र मित्र पण आहेत. ते चीन, जपान, जर्मनीत राहतात. त्यांना या छंदात विशेष गोडी वाटते कारण त्यांचाही हाच छंद आहे. त्यांच्याशी होणारी तिकिटांची देवाणघेवाण महत्त्वाची आहे. पोस्टाच्या तिकिटांच्या प्रदर्शनात मी कितीदा तरी भाग घेतला आहे. बरेचदा मला त्यासाठी पुरस्कार आणि प्रमाणपत्रे मिळाली आहेत. 


त्यामुळे माझा उत्साह वाढतो. माझे आईवडीलही माझ्या या छंदामुळे प्रसन्न आहेत. ते अनेक प्रकारे माझ्या छंदाला मदत करतात. गावात नेहमी पोस्टाच्या तिकिटांचे प्रदर्शन भरत असते. त्यात अनेक पोस्टाच्या तिकिटांचे संग्राहक भाग घेतात. 



त्यांना भेटून त्यांच्याशी अनुभवाचे आदान-प्रदान केल्यामुळे गप्पा मारल्यामुळे खूप आनंद होतो आणि माहितीही मिळते. ज्ञानात भर पडते. पोस्टाच्या तिकिटासंबंधीच्या साहित्याचाही माझ्याजवळ चांगला संग्रह आहे. १०/१२ वर्षापासून आवडीने आणि मेहनतीने मी हा संग्रह केला आहे. यावर माझा बराच पैसा खर्च झाला आहे. 


माझ्या मित्रांना माझा व माझ्या संग्रहाचा अभिमान वाटतो तर किती तरी मित्रांना माझा हेवा वाटतो परंतु त्यांच्यामुळेच मला आणखी पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. व्यक्तींच्या स्मारकरूपी पोस्टाच्या तिकिटांचा एक अल्बम माझ्याजवळ आहे. त्यात देश-विदेशांतील प्रसिद्ध व्यक्तीची पोस्टाची तिकिटे आहेत. 



जेव्हा मी ती पाहतो, त्यांचा अभ्यास करतो तेव्हा मला खूप सुख आणि आनंद मिळतो. त्याखेरीज हे ज्ञानाचेही खूप चांगले साधन आहे. जगाचा भूगोल, इतिहास, वनस्पती, जीवजंतू, वैज्ञानिक प्रगती.  ऐतिहासिक स्मारके इ. विषयी जी माहिती मिळते ती अत्यंत दुर्मिळ आहे. यांच्याचमुळे माझे सामान्य ज्ञान चांगले आहे व म्हणूनच मी 'क्विझ कॉन्टेस्ट' मधे खूप बक्षिसे जिंकली आहेत. 



विविध रंग, आकृत्या आणि चित्रे असलेली ही पोस्टाची तिकिटे म्हणजे माझा अमूल्य खजिना आहे. माझ्या या छंदाचा मला अभिमान वाटतो, समाधान वाटते आणि सुख मिळते. माझा रिकामा वेळ मी यातच घालवितो. माझा सारा पॉकेटमनी मी यातच खर्च करतो. या छंदाने माझ्या जीवनाला एका नवा अर्थ दिलेला आहे. 


परंतु याचा असा अर्थ नाही की मी माझ्या इतर कर्तव्यांच्या बाबतीत बेफिकीर आहे. उलट मी ती कर्तव्ये आणखी आवडीने पार पाडतो. माझे आईवडील तर माझे कौतुक करतातच. माझे शिक्षक, मुख्याध्यापक पण माझे कौतुक करतात. माझ्या शाळेतही एकदा माझ्या तिकिटांचे प्रदर्शन भरले होते. सर्वांना ते आवडले होते.  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद