कोजागिरीची रात्र मराठी निबंध | Night of Kojagiri Essay In Marathi

 कोजागिरीची रात्र वर्णनात्मक निबंध | Night of Kojagiri Essay In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  कोजागिरीची रात्र मराठी निबंध बघणार आहोत.या लेखामध्ये ऐकून 3 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. अश्विन महिना आला. पावसाळ्याने विराम घेतला. आकाश निरभ्र झाले. प्रतिपदेपासून कलेकलेने वाढत जाणारा चंद्र पौर्णिमेला पूर्ण गोल दिसतो. 


आम्ही गच्चीवर पूर्णाकार चंद्राची शोभा पाहायची, आकाशातील टिप्पूर चांदण्यांची शोभा बघायची, असे ठरविले. मस्त कार्यक्रम करायचा. सगळे नियोजन अगदी छान केले.


कोजागिरीची रात्र म्हणजे धमाल मस्ती आलीच. आम्ही त्या दिवशी 'चंद्र' या विषयावर आधारित गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. निरभ्र आकाशात, चंद्राच्या साक्षीने, चांदण्यांच्या लखलखाटात कार्यक्रमाची सुरुवात झाली. वातावरण धुंद झाले. 


त्यात गीतांतील शब्द मनावर ठसत होते. 'चंद्रावरती दोन गुलाब, चल चल चंद्रा, पसर चांदणे, चंद्र आहे साक्षीला, तोच चंद्रमा नभात, इ.' या भावगीतांपासून बालगीतांपर्यंत सर्व चंद्रावरील गाणी. एरवी गोंगाटात ही गाणी विशेष प्रभावी होत नाहीत; पण कोजागिरीच्या रात्री ! या गाण्यांची गोडी काही वेगळीच ! आम्ही अगदी गीतांच्या शब्दांत, सुरात चिंब झालो.


चंद्रदेखील स्तब्ध होऊन गाण्यांचा आस्वाद घेतोय असेच वाटत होते. हवेत एक मस्त गारवा पसरला होता. सारा आसमंत चांदण्यात न्हाऊन निघाला होता. सगळे फक्त त्या सुंदर वातावरणाशी एकरूप झाले होते. सर्वांच्याच चित्तवृत्ती खुलून गेल्या होत्या. 


ही सारी किमया होती त्या शुभ्र चांदण्यांच्या प्रकाशाची आणि त्या पूर्णगोल चंद्राची. जणू काही सगळे चांदीच्या रसात न्हाऊन निघाले होते. कुसुमाग्रजांनी या पौर्णिमेच्या चंद्राला 'स्वप्नांचा सौदागर' अशी उपाधी का दिली असेल, याची कल्पना आली. सारे वातावरण स्वप्नवत् वाटत होते.


रोजच्या धकाधकीच्या जीवनात कोणाला कोणाशी बोलायलाही वेळ नसतो; तर चंद्र, तारे, आकाशदर्शन दूरच ! पण या निमित्ताने मात्र सगळेजण एकत्र येतात, चंद्राच्या प्रकाशात न्हाऊन निघतात आणि ताजेतवाने होतात. चंद्रप्रकाशात ठेवलेले केशरी दूध पिण्याची मजा काही औरच असते. 


कोजागिरीच्या मध्यरात्री लक्ष्मी आकाशातून पृथ्वीवर अवतरते आणि 'को-जागर्ति', 'कोण जागा आहे?' असे विचारत सर्वत्र फिरते. जो जागा असेल, त्याच्यावर लक्ष्मीचा, संपत्तीचा वर्षाव करते, असे म्हणतात. मला वाटते, त्या एका रात्री अंगावर पडणारा चांदीसारखा, प्रकाशासारख्या किरणांचा वर्षाव म्हणजेच लक्ष्मीने केलेला वर्षाव!


असा हा कोजागिरीच्या रात्रीचा अनुभव शब्दांत सांगण्याचा नसून प्रत्यक्ष अनुभूतीचा आहे. म्हणूनच कोजागिरीच्या रात्री उद्याने खुली असतात. जलाशयात दिसणारे पूर्णचंद्रांचे प्रतिबिंब म्हणजे अक्षरश: नेत्रसुख. सर्वांनी एकत्र येऊन निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गाची मजा लुटावी. यासारखा दुसरा आनंद तो काय असणार ? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


निबंध 2 

 कोजागिरीची रात्र वर्णनात्मक निबंध | Night of Kojagiri Essay In Marathi


दर वर्षी विद्यार्थी सहामाही परीक्षेच्या अभ्यासात दंग असतानाच कोजागिरी पौर्णिमा येते. या वेळी कोजागिरी पौर्णिमा नेमकी शनिवारी आली. म्हणून आम्ही ही पर्वणी साधायचीच असं ठरवलं. पंथरा-वीस जणांचा कंपू तयार झाला. ठरल्याप्रमाणे नऊ-साडेनऊ वाजता सर्वजण रमत गमत समुद्रकिनारी येऊन पोचलो.


ही कोजागिरी पौर्णिमा म्हणजे आश्विन पौर्णिमा! या काळातील वातावरण अतिशय प्रसन्न असते. गोठवणारी थंडी नाही, की उकाडा नाही. त्यामुळे या शीतल वातावरणात फिरायला जाण्यातही मजा असते.


आकाशात पूर्ण चंद्र उगवलेला होता. सगळीकडे रस्त्यावर, घरांवर, झाडे व वेली यांच्यावर, दऱ्याखोऱ्यांमध्ये, गल्लीबोळांमध्ये, निळ्या आकाशातून रुपेरी चांदणे शिंपडले गेले होते. ते चांदणे लेवूनच आम्ही समुद्रकिनारी केव्हा येऊन पोचलो ते समजलेच नाही. 


समुद्र किनाऱ्यावरील विलोभनीय दृश्य पाहून डोळ्यांचे पारणेच फिटले. “पाहे पां पूर्णचंद्राचिये भेटी। समुद्री अपार भरते दाटी।" या ज्ञानेश्वरीतील वचनाची प्रचिती आली. समोर चमचमत्या निळ्या रंगाचे उचंबळणारे पाणी, त्याच पाण्याला क्षितिजापाशी स्पर्शणारे निरभ्र आकाश. 


एका बाजूला गर्द हिरवी वनराई तर एका बाजूला उंच नारळाची झाडे व समोर पसरलेली रुपेरी वाळू. ते दृश्य पाहून आमच्याही मनात चांदणे फुलले. आकाश लक्षावधी तारकांनी फुलून गेलं होतं. टगांचे पडदे सारून दिमाखाने रजनीनाथ निळ्या राजपथावरून भ्रमण करत होते. 


त्यांच्या सभोवतालचे लहान-मोठे तारे शशि-भूपतीचे भालदार-चोपदार वाटत होते व मोठ्या दिमाखाने, मानाने, महोत्सवाने राजाची वरात काढताहेत की काय असे वाटत होते. त्या वरातीसाठी सर्व पृथ्वी, झाडे, लता, वेली रुपेरी साज लेवून सजली होती. चकोर पक्ष्याला या पौर्णिमेची ओढ का वाटते ते आज आम्हाला समजले. 


कवी राजा बढे यांनी आकाशगंगेला कटीची मेखमाला का म्हटले ते ध्यानात आलं. आमच्यापैकी काहीजणांनी समुद्राच्या भरतीच्या लाटा अंगाखांद्यावर खेळवल्या तर, काहीजणांनी नुसतं चांदणंच मनसोक्त अंगावर झेललं. तहान-भूक हरपली होतीच. तरी पण कोणीतरी खाण्याची आठवण केली. 


मग सर्वांनी गोलाकार बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. खाण्याचा बेत पण एकदम फर्मास होता. पांढऱ्याशुभ्र इडल्या व त्यांना लावायला ओल्या नारळाची दह्यातील चटणी आणि स्वीट डिश म्हणून पांढरे व गोल आकाराचे मलई सॅन्डविच ! 


खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना सर्वांच्या आग्रहावरून पूनमने म्हटलेल्या आभाळीचा चांद माझ्या आज अंगणात बाई' या मधुर भावगीताने शांत, गंभीर भाव निर्माण केला. या सर्व गोष्टीत रात्रीचे बारा केव्हा वाजून गेले समजलंच नाही. कोजागिरीच्या रात्री जागरण केल्यावर लक्ष्मी प्रसन्न होते म्हणतात. लक्ष्मी प्रसन्न होईल वा न होईल, पण आमची चित्तवृत्ती मात्र प्रसन्न होती. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 3

 कोजागिरीची रात्र वर्णनात्मक निबंध | Night of Kojagiri Essay In Marathi


खरं तर सहामाही परीक्षा जवळ आल्याने ह्यावर्षी कोजागरी साजरी करायची की नाही? अशी द्विधा मन:स्थिती होती. त्यात जिथे तिथे आडवं येणारं १० वी चं वर्ष! 


पण जशीजशी संध्याकाळ कलंडून रात्र व्हायला सुरुवात झाली, तशी घराघरात शेजारी-पाजारी चुळबुळ सुरू झाली. मी बसलो होतो माझ्या खोलीत इतिहास, नागरिकशास्त्रासारखा रुक्ष विषय घेऊन! तेवढ्यात आईची हाक ऐकू आली. 'ऋशील, खोलीतली मागची खिडकी उघड पटकन !  तिनं हाकांचा सपाटा चालवला.  तेव्हा जरा जडावतच मी उठलो. 


नि खिडकी उघडली. झाडांच्या जाळीतून, पानांच्या नक्षीतून त्यापलीकडच्या मुंजाबाच्या डोंगराच्या पाठीमागून एक रसरशीत, तेज:पुंज, पिवळाधम्मक गरगरीत वाटोळा... चंद्र! नुकता उगवला होता. ते पूर्णबिंब पाहून वाटलं., हा काही ऐन तारुण्यातला एखादा जादूगारच! सारी सृष्टी त्याच्या जादूने भारली होती नि जागृत होऊन स्वागत करीत होती. मी थरारलो. 


खिडकीतून दिसलेले दृश्य डोळ्यात साठवून ठेवावे, मनात भरून घ्यावे अशी ऊर्मी दाटून आली. कुसुमाग्रजांनी चंद्रबिंबाला ‘स्वप्नांचा सौदागर' म्हणून संबोधले आहे. निसर्गकवी ना. धों. महानोर म्हणतात “कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे."


आम्ही ठरवलं...नि बाहेर पडलो. चांदण्यात फिरायला! जवळच्या माणिक डोह धरणावर! ...अर्ध्या तासात खाण्याची तयारी... ती ही बटाटे वडे, भजी, भेळ, पाव घेऊन मित्रमंडळी जमवून आम्ही धरणाच्या भिंतीवर पोहोचलो. एव्हाना चंद्रबिंब ऐन रंगात आले होते.


'रजनी' त्याच्या चांदण्यात चिंब न्हाली होती. भिंतीवरूनच चावंड, जीवधन हे किल्ले, त्यातून जाणारी वळणावळणाची वाट स्पष्ट दिसत होती. धरणाचा जलाशय निश्चल, नि:शब्द होता त्यात चंद्राचे मनोहर प्रतिबिंब पडले होते. मध्येच वाऱ्याची खट्याळ झुळूक ते बिंब परत डोंगरापलीकडे घेऊन जात होती. आम्ही सर्वच जण मंत्रमुग्ध झालो होतो. कुणीच काही बोलत नव्हते. बोललो तर समोरचं दृश्य हालेल की काय असे वाटत होते.


अश्विन महिन्यातल्या या चांदण्याची महती इतर पौर्णिमांपेक्षा काही न्यारीच! अंगअंग, अंतरंग ....उजळून टाकणारी! तनामनाला प्रकाशाकडे नेणारी....दग्धता संपवून शीतलतेकडे नेणारी! प्रेमी जीवांनाही हुरहर लावणारी! किती वाजले कोणास ठाऊक! 


भजी-वड्यांच्या वासाने भूक खवळली होती. सर्वांनी त्याचा फडशा पाडला. तिथेच चूल करून आम्ही दुधाचे पातेले चुलीवर आटवत ठेवले. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे चंद्रप्रकाशात औषधी शक्ती आहे. केशरयुक्त आटीव दुधाचे सर्वांनी प्राशन केले. गप्पांना रंगत येऊ लागली. मध्यरात्र झाल्याचेही कोणाला भान राहिले नाही.


कोजागरीच्या रात्री चांदण्यांचा रुपेरी शालू लेवून देवी लक्ष्मी घराघरात डोकावते. “को जागर्ति?' असा प्रश्न विचारते. म्हणजेच कोण जागे आहे? आपल्या कर्तव्याला कोण जागत आहे? जागृत लोकांना ती भरभरून आशीर्वाद देते, धनधान्य, सुखसमृद्धी देते.


अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे नवान्न प्राशन करण्याचा दिवस! शेतात नवीन पीक येते. ते काढून खाण्यासाठी या दिवसाचा मुहूर्त सांगितला आहे. घरातील ज्येष्ठ पुत्रास वा कन्येस आई औक्षण करते. त्याच्यासाठी नवे कपडे, अत्तर देते. स्वयंपाकात गोड पदार्थ करते. त्याची अश्विनी' साजरी करते. त्याचं व्यक्तिमत्व पौर्णिमेच्या पूर्णचंद्र बिंबासारखं वृद्धिंगत व्हावं, असंच मनात चिंतिते.


ही पौर्णिमा साधारण पावसाळा संपताना येते. निसर्ग बहरलेला असतो. सगळीकडे स्वच्छ हिरवेगार असते. आकाश निरभ्र असते. धूलीकण वाहून गेल्यामुळे चांदणे टिपूर पडते. हवा आल्हाददायक असते. शेतीची सर्व कामे संपल्यामुळे सर्वांना मोकळा वेळही असतो. म्हणूनच जीवनाला नव्या दमाने सामोरे जाण्यापूर्वी आनंदोत्सव म्हणून ही पौर्णिमा साजरी होते. 


हे व्रत म्हणूनही करतात. ह्यात दिवसभर उपवास करून ऐरावतावर बसलेल्या वरुण देवाची, इंद्राची व लक्ष्मीची पूजा करून नारळाचे पाणी व पोहे याचा नैवेद्य देवतांना, पर्वजांना व रात्री दुधाचा नैवेद्य चंद्राला दाखवावा, असा संकेत आहे. असे हे निसर्गपूजेचे व्रत आजही आपण करतो.


हल्ली वर्तमानपत्रात जाहिराती असतात, कोजागरी कवी नायगावकरांबरोबर, हास्यअभिनेता मकरंद अनासपुरे वा 'गंगुबाई' निर्मिती सावंतबरोबर साजरी करा. पण आकाशातील नितळ हसरा चंद्र, त्याचं शीतल चांदणं व मित्रमंडळी असताना आणखी कोणी हवं कशाला? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद