समाधान मानणे हाच जीवनातील आनंद मराठी निबंध | samadhan manane hach jivanatil anand essay in marathi

समाधान मानणे हाच जीवनातील आनंद मराठी निबंध | samadhan manane hach jivanatil anand essay in marathi

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण समाधान मानणे हाच जीवनातील आनंद  मराठी निबंध बघणार आहोत. समाधान म्हणजे तृप्ती. ही एक मनाची अवस्था आहे. समाधान मोजण्यासाठी कोणतेही परिमाण नाही. पण तरीही मनुष्य किती आनंदी आहे, यावरून त्याची वृत्ती समजते. 


मनुष्य जेव्हा तुलना, स्पर्धा करू लागतो, तेव्हा तो समाधानी न होता अधिक दु:खी होऊ लागतो. प्रत्येक व्यक्ती भिन्न आहे. प्रत्येकाची आवड भिन्न, प्रकृती भिन्न, प्रवृत्ती भिन्न. मग तुलना कशासाठी? स्पर्धा स्वत:शीच का नाही ? स्वत:शीच संवाद का नाही? 


समाधान हे लोभापासून दूर राहते. लोभ असलेला माणूस कधीच समाधानी नसतो.आपली सर्व संतमंडळी अत्यंत समाधानी होती. 'समाधान' हा त्यांच्या जीवनाचा मंत्र. हेच त्यांच्या जीवनाचे सूत्र होते. त्यामुळे कोणत्याही संतांजवळ भौतिक समृद्धी नव्हती, तरीही ते समाधानी होते. 


जीवनातील आनंद कशात आहे, हे त्यांना चांगले माहीत होते. संत गाडगेबाबा तर फुटक्या गाडग्यात जेवढे बसेल, तेवढेच नि जे मिळेल, त्यातच समाधान मानायचे. त्यांना कोणी पक्वान्ने दिली, तरी ती त्यांनी कधीच खाल्ली नाहीत; तर आपल्या गोरगरीब बांधवांना वाटून टाकली. 


संत तुकारामांना एकदा ऊस मिळाले. ते त्यांनी बाल-गोपालांना वाटून टाकले. घरी येईपर्यंत फक्त एकच उरला. वाटेत सर्व ऊस मुलांनी घेतले; पण ते वाटण्यातच त्यांना समाधान मिळाले. सर्वांनी वाटून खाल्ले, की त्यांना आनंद वाटायचा. 


मला खूप मिळाले पाहिजे, अशी हाव अनेकांना असते. ती गोष्ट मिळेपर्यंत अशी माणसे असमाधानीच असतात. ती मिळाली, की पुन्हा दुसऱ्या, तिसऱ्या गोष्टी मिळविण्याची धडपड सुरू होते. बऱ्याच वेळा हव्या असलेल्या वस्तू मिळवण्याच्या नादात आपण आपला सगळा आनंदच गमावून बसतो, हेच त्यांच्या लक्षात येत नाही. असा मनुष्य कधीच समाधानी असत नाही. 


त्याची हाव वाढतच जाते. मग त्या हव्यासापोटी आपण काय काय गमावले, हेही त्याच्या लक्षात येत नाही. वाईट मार्गांचा अवलंब करण्यासही मागे-पुढे पाहिले जात नाही. समाधान म्हणजेच आनंदी चित्तवृत्ती. राजा मिडास सोन्याची हाव असलेला राजा. हात लावेन, त्याचे सोने होऊ दे', असा आशीर्वाद त्याने मागून घेतला. देव 'तस्थातू' म्हणाला. त्याला तहान लागली. 


त्याने पाण्याला हात लावला. पाण्याचे सोने झाले. त्याला भूक लागली. त्याने अन्नाला हात लावला, तर त्या अन्नाचे झाले सोने. सर्वात लाडकी मुलगी तिला जवळ घेतले, तर तिचा सोन्याचा पुतळा झाला. आता सांगा ह्या हव्यासातून त्याने जीवनातील आनंद मिळविला की गमावला? 


प्रत्येकाला त्याच्या योग्यतेनुसारच काही मिळते, मग हव्यास कशासाठी? या हव्यासापोटी आपण जीवनातील आनंद गमावतो. अधिक मिळविण्याच्या नादात जे मिळाले आहे, त्याचाही आनंद आपल्याला मिळत नाही. मला दोन वेळचे अन्न, राहायला घर, मुले-बाळे, त्यांचे प्रेम मिळाले. मी खूप समाधानी आहे. 


आपल्या मूलभूत गरजा भागणे महत्त्वाचे. मग कष्ट, प्रयत्न करून जे मिळेल, तेसमाधान. कोणत्याही वाईट मार्गाने मिळविलेली कोणतीही गोष्ट कधीच समाधान देत नाही. जीवनातील आनंद हिरावूनच घेतला जातो. म्हणून जे मिळेल, 


जेवढे मिळेल, त्यात समाधान माना; कारण समाधान हे मानण्यावर असते. ते मानायला शिका आणि बघा, जीवनातील खरा आनंद अनुभवायला मिळेल.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद