विद्यार्थी व चित्रपट मराठी निबंध | Vidyarthi Aani Chitrpat Marathi Nibandh

 विद्यार्थी व चित्रपट मराठी निबंध | Vidyarthi Aani Chitrpat Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण विद्यार्थी व चित्रपट मराठी निबंध बघणार आहोत. 'दोन व्यक्तींनी एकाच वेळी खिडकीतून पाहिले. एकाने जमीन पाहिली व दुसऱ्याने चकाकणारे तारे' असे खलील जिब्रान यांनी म्हटले आहे. अशीच अवस्था चित्रपट बघणाऱ्यांची आहे. 


नजरेला जे दिसते त्यापेक्षा नजरेला काय कळते हे महत्त्वाचे आहे.प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतातच. आजच्या विज्ञानयुगात नवनवीन साधने, तंत्र, नवे शोध उपलब्ध आहेत. त्यांचे फायदे जसे आहेत. तसेच तोटेही आहेत.


चित्रपट बघून त्यातून काय घ्यायचे हा विवेक आपण बाळगायला हवा. चित्रपटासंबंधी विद्यार्थ्यांची मनस्वी ओढ अशी जबरदस्त झाली आहे की बहुतांशी विद्यार्थी स्वतःचे कर्तव्य , ध्येय, वास्तवता विसरतात.तीन तासाच्या कल्पनाविश्वातच आयुष्याचा आनंद शोधतात.


चित्रपट अस्तित्वात आले ते लोकशिक्षणाचे प्रभावी साधन म्हणून ! पौराणिक, सामाजिक, कौटुंबिक कथा, समस्या त्यांतून मांडल्या गेल्या. तेंव्हाचे निर्माते, दिग्दर्शक आदर्शवादी होते.आताचे स्वरूप बदलत चालले आहे. 


प्रेक्षकांना खेचणारे प्रवाह पतित करणारे दरोडे, बलात्कार, खून, वासना, अत्याचार यांचा मसाला भरून रंगविलेले चित्रपट येत आहेत.कोवळी मने चुरडली जात आहेत.संस्काराचा वृक्ष उन्मळून पडत आहे. नायक-नायिका, खलनायक यांचे अनुकरण होत आहे.


शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या देशामध्ये समाजप्रबोधन व लोकशिक्षण यासाठी चित्रपटाचा उपयोग होऊ शकतो. तसा तो करणे आवश्यकही आहे. पण ही नाण्याची दुसरी बाजू झाली.स्वतःच्या खडतर जीवनाचा आपल्याला तात्पुरता विसर पाडणाऱ्या चित्रपटामुळे आपण स्वप्नरंजक होण्याची शक्यता असते. 


असे चित्रपट विशेषतः युवकयुवंतीवर विपरित परिणाम करतात.त्यामुळे काल्पनिक चित्रपटातील कथा , प्रसंग यांची सांगड ते वास्तव आयुष्याशी घालू पाहतात.इथेच नेमकी गल्लत होते. चित्रपटांची मोहिनी आणि चित्रपटात दाखविण्यात येणारा कृत्रिम झगमगाट म्हणजे कोवळ्या तरूणपिढीला दाखविले गेलेले प्रलोभनच होय.


चित्रपटाच्या कुशीतून जन्मलेले 'फॅशन' हे नवे बाळ ! याचं बारसं प्रत्येक जण हवं तसं करतात. खरं तर माणसाच्या 'दिसण्या पेक्षा त्याचं ‘असणं' महत्त्वाचं! पणआजकाल अंतरंगापेक्षा बहिरंगापर्यंत नजर फेकली जात आहे. क्रियाशीलता कमी होऊन वेळेचा अपव्यय होत आहे. 


चित्रपटांमुळे मुले क्रीडांगणाला दुरावली. व्यायाम , खेळ, वाचन ही त्रिसूत्री सोडून हल्ली सिनेमागृहाबरोबरच वेळी-अवेळी, दिवसा किंवा रात्री दूरदर्शनवर दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटात तरुण पिढी गुंतत चालली आहे.शारीरिक व मानसिक विकासाच्या दृष्टीने हे हानिकारक आहे.


मुलांनी कोणते चित्रपट बघायचे याबाबत पालकही जागरूक हवेत.वाचन , व्याख्याने , परिसंवाद यामुळे विद्यार्थी प्रगल्भ होतो.पण चित्रपटांनी मुलांना पांगळे केले आहे. चांगले छंद, व्यक्तिमत्त्व विकास, ज्ञानार्जन यांत घालवायचा वेळ मुले चित्रपट पाहण्यात घालवीत आहेत.


आजचे चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या अधिक लाभप्रद होण्याच्या प्रयत्नात आहेत. सेन्सॉर बोर्डच्या कात्रीला धार राहिलेली नाही. बीभत्स नृत्ये कोवळ्या युवा पिढीला वेडीवाकडी नाचवीत आहेत. ताल सुटला आहे. संस्काराची गळचेपी सुरू झाली आहे. 


हाणामारी, खून , बलात्कार यांनी रसरसलेले चित्रपट बघण्याकडे तरुण पिढीचा कल आहे. कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून बघावे असे 'बागबान' सारखे थोडेच चित्रपट आहेत. चित्रपट हा समाजाचा आरसा असतो , संस्कृतीचे दर्शन असते. 


चित्रपट म्हणजे प्रणय , विरह, अत्याचार , खून यांचे दर्शन नव्हे. प्रत्येक कथेत कुठेतरी अर्धसत्य दडलेलं असतं. खरं तर काय घ्यावं हेच महत्त्वाचं. नाही तर चित्रपटाचा भस्मासुर आपल्याला भस्म केल्याशिवाय राहणार नाही


कुटुंबनियोजन , निरक्षरता या समस्येवर अनेक चित्रपट निघालेत 'अंगुठाछाप' सारख्या चित्रपटाने निरक्षरतेच्या प्रश्नावर प्रकाश टाकला. मदर इंडियाने' आई प्रसंगी कुपुत्राला गोळीही घालू शकते हे दाखविले. चित्रपट बघतांना 'नीर-क्षीर विवेक' बाळगून चांगले ते घ्यावे हे केले तरच चांगले विद्यार्थ्यांनी मनोरंजनाआधी अभ्यासाला प्राधान्य दिले पाहिजे. निखळ मनोरंजन मनाला फुलविते , प्रसन्न करते तर बीभत्स प्रदर्शन मनाला कीड लावते.


राजा हरिश्चंद्र, भक्त प्रल्हाद, गांधी असे छान चित्रपटही आहेत. नवे ते हवे हा मानवी स्वभाव आहे. पण काही मर्यादा जाणून घेतल्या तर 'मोर नाचतो म्हणून लांडोरीने नाचू नये' याची जाणीव होईल. आज भरमसाट पैसा ओतून चित्रपट-निर्माते चित्रपट काढतात. 


गर्दी खेचणारे चित्रपट त्यांना हवे आहेत.पण तरूणांनी पाऊल उचलतांना वाट कोठे जाते? हा क्षणभर विचार करावा. मनोरंजनासाठी संस्कृतीची सभ्यतेची होळी मात्र होऊ देता कामा नये. आपली ध्येये महत्त्वाची आहेत ; हे न विसरता मनोरंजनाची गोडी जरूर चाखावी पण त्यांच व्यसन होऊ देता कामा नये. नाही तर आजच्या चित्रपटरूपी आरसेमहालाच्या लोभस काचा संस्काराला रक्तबंबाळ करून सोडतील.मला वाटतं


चित्रपटाचं तारू, क्षितिजाशी भिडे प्रवाहाची धार वळे, उगमाच्या कडे पिकोनिया भोवताल अत्याचार जन्मती नाही सोसवत कळा, बावरली माती.... आजच्या चित्रपटातील बीभत्सपणा किळस आणणारा आहे. कमीत कमी कपड्यातील देहप्रदर्शन, बीभत्स गाणी गल्लीबोळात संस्कृतीची धिंड काढीत आहेत. 


सभ्यता, शालीनता यांच्यावर प्रहार सुरू झाला आहे. मुलींना भर रस्त्यात छेडण्याचे प्रकार खूप वाढले आहेत. दारू, गर्द यांच्या विळख्यात तरुण पिढी जखडली जात आहेत. चित्रपटसृष्टीतील चमकदमक, पैसा यांच्या मोहजालात फसून 'मॉडेलिंग' च्या नावाखाली युवतींची फसवणूक होत आहे. 


वस्तुतः प्रत्येक कथेत घेण्यासारखा बोध असतोच त्या कडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.कथा मांडतांना पैशांच्या तराजूचा भारी पल्ला गाठण्यासाठी संस्कृतीला मातीत मोल करू पाहणारे चित्रपटव्यावसायिक का बरे असे करीत आहेत? कारण असे चित्रपट बघण्यासाठी गर्दी करणारेही आपणच आहोत. 


माझ्या शब्दात"बाजार सभ्यतेचा भरला खरा, संस्कृती विक्रीत निघाली ज्ञान-रंजनाच्या नावाखाली विकृतीची वरात निघाली" मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद