हुंडा प्रथा एक गंभीर समस्या मराठी निबंध | Dowry Is A Serious Problem Essay Marathi

 हुंडा प्रथा एक गंभीर समस्या मराठी निबंध | Dowry Is A Serious Problem Essay Marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण हुंडा प्रथा एक गंभीर समस्या मराठी निबंध बघणार आहोत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सातत्याने आपल्या देशाची प्रगती होत आहे. विज्ञान आणि उद्योगाच्या क्षेत्रात आपण विकसित राष्ट्रांशी टक्कर देत आहोत. 


अवकाशातही आपण स्थिर झालो आहोत. तर दुसरीकडे हुंडा प्रथेसारखी वाईट सामाजिक रुढीही फळत, फुलत चालली आहे. हुंडा प्रथा आपल्या सभ्य समाजाच्या मस्तकावरील कलंक आहे. हुंडानामक दानवाने न जाणो किती तरी भोळ्या निष्पाप कळ्यांना आपल्या पायाने तुडविले आहे, तुडवीत आहे आणि आणखी किती तरी कळ्या तुडविल्या जातील. 


हुंड्यामुळे अनेक मातापित्याचे सुख चैन हिरावून घेतले आहे. असंख्य स्त्रिया हुंड्याच्या वेदीवर बळी गेल्या आहेत. हुंडा प्रथेचे स्वरूप इतके भयावह झाले आहे की जगातील सर्व प्रसार माध्यमे भारताला याबाबत दोष देतात. हुंडा प्रथा किती प्राचीन आहे हे सांगता येणे कठीण आहे. 


हुंडा प्रथेचे उल्लेख ऋग्वेद आणि अथर्ववेदात सापडतात. असे समजले जाते की या शब्दाची उत्पत्ती दाय' या शब्दापासून झाली आहे. दाय म्हणजे दान, बक्षीस इत्यादी प्राचीन काळात विवाहाच्या वेळी कन्येच्या मातापित्याकडून वरपक्षाला वस्त्रे, प्रावरणे, अलंकार, भांडी इत्यादी वस्तू देणगीच्या रूपात दिल्या जात. 


हे एक प्रकारचे दान होते. ज्याने नंतर हुंड्याचे रूप धारण केले. प्राचीन काळात हुंडा ही एक सात्त्विक प्रथा होती. पित्याच्या घरून पतिगृहात प्रवेश करताच मुलीला पित्याचे घर परके होत असे. परक्याचे धन मानल्या जाणाऱ्या मुलीचा पितृगृहातील अधिकार समाप्त होई. 


पित्याच्या संपत्तीवर फक्त मुलांचाच अधिकार असे. म्हणून पिता आपल्या ऐपतीनुसार काही वस्तू हुंड्याच्या रूपात मुलीची पाठवणी करताना मुलीस देत असे. प्राचीन काळात विद्यार्थी गुरुकुलात राहून शिक्षण घेत असत. शिक्षण संपल्यानंतर जेव्हा हे तरुण विद्यार्थी गृहस्थाश्रमात प्रवेश करीत तेव्हा त्यांच्याकडे धन नसे. 


त्यामुळे वधूपिता मुलीला घरगुती उपयोगाच्या वस्तु देत असे. कन्या पतिगृही लक्ष्मी बनावी यासाठी तिला सगळ्या वस्तू देऊन पाठविले जाई. रिकाम्या हाताने पतिगृही प्रवेश करणे अपशकुन समजला जाई. प्राथमिक अवस्थेत हा सगळ व्यवहार स्वेच्छेचा व उपयोगी होता म्हणून तो चालू राहिला.


आधुनिक काळात स्नेह दर्शविणारी ही चांगली प्रथा एक कुप्रथा बनली आहे. मुलीची किंमत शील, सौंदर्याने केली जात नसून हुंड्याने केली जाते. हुंड्यात मिळालेल्या रकमेवरून तिच्या कुटुंबाची किंमत ठरते. वराची बोली लावली जाते. मुलीचा कुरूपपणा, कुसंस्कार हुंड्याआड लपविले जातात. 


समाजाची ज्याला मान्यता असते ते दोष गुण बनतात. म्हणूनच हुंड्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळाली आहे. हुंड्याच्या प्रथेला वर पक्षाच्या लोभी प्रवृत्तीमुळे चालना मिळाली. वधूपक्षही यात मागे नाही. तोही वर पक्ष मागेल तो हुंडा देतो. त्यांचे पाहून गरिबांनाही हुंड्याची सोय करणे आवश्यक झाले. 


गरीब लोक ही झोळी नोटांनी भरू शकत नसल्ले त्यांच्या मुलींवर अविवाहित राहाण्याची पाळी आली. शिकलेल्या मुलीचे अशिक्षित मुलाशी लग्न करून दिले जाते कारण त्याला कमी हुंडा द्यावा लागतो. हुंडा प्रथेने विजोड विवाहाच्या विकृतीला जन्म दिला. त्यामुळे आपला समाज वैवाहिक विकृतींचे संग्रहालय बनत चालला आहे.


हुंड्याची प्रथा जगातील इतर देशांतही आहे. भारतात जसे त्याचे विकृत रूप दिसते तसे इतरत्र कुठेही दिसत नाही. हुंड्याच्या प्रथेमुळे अनेक विवाहित स्त्रियांचा अनन्वित छळ होतो. हुंडा न दिल्यामुळे किती तरी नवविवाहिता जाळून घेऊन आत्महत्या करतात किंवा जाळून मारल्या जातात. हुंडा कमी दिल्यामुळे जन्मभर मुलीला सासरच्या लोकांचे


तिच्या आई बापाला मारलेले टोमणे सहन करावे लागतात. तिच्या आईबापाला तिच्या सासरी मानाची वागणूक मिळत नाही कारण ते गरीब असतात. परिणामी त्या नववधूच्या मनावर खूप ताण पडतो. जीवनाची सुरवातच जर तणावाने झाली असेल तर त्या नववधूचा सहजपणे विकास होणे कठीण होऊन बसते. 


हीच नववधू पुढे चालून नव्या पिढीस जन्म देते. अशा परिस्थितीत नव्या पिढीकडून काही आशा करणे व्यर्थ आहे. भारतात अनेक धर्म आणि अनेक मते असलेले लोक राहतात. भाषा संस्कृतीचेही वैविध्य दिसते. या सर्वांचे आपापसांत मतभेद आहेत. 


कधी त्याची परिसीमा होऊन स्फोट होतो. यामुळे राष्ट्र प्रगती करू शकत नाही. परंतु हुंड्याच्या प्रश्नावर मात्र आपण सर्व एक आहोत. आपल्या शास्त्रानुसार विवाह हे एक धार्मिक कृत्य तद्वतच एक पवित्र बंधन मानले जाते. दोन आत्म्यांचे हे मिलन असते. 


विवाह ही एक सामाजिक जबाबदारी मानली गेली आहे. विवाहबंधन समानता आणि परस्पर क्विासाच्या आधारावरच यशस्वी होऊ शकते. यशस्वी विवाहामुळे यशस्वी घर निर्माण होऊ शकते. आणि यशस्वी घर यशस्वी राष्ट्राची निर्मिती करते. 


म्हणून जर भारताला विकसित राष्ट्रांच्या श्रेणीत उभे राहावयाचे असेल, त्याची गेलेली प्रतिष्ठा परत मिळवावयाची असेल तर हुंडा प्रथेपासून मुक्ती मिळालीच पाहिजे. भारत सरकारने १९६९ मध्ये हुंडारूपी राक्षसाच्या विनाशासाठी हुंडाबंदीचा कायदा केला. या कायद्यानुसार हुंडा घेणे वा देणे हा गुन्हा आहे. 


याचे उल्लंघन करणारास दंड केला जाणार आहे. परंतु हुंड्याचे लोभी लांडगे या कायद्याची पर्वा करीत नाहीत. म्हणून फक्त कायदा करून उपयोग नसतो. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला दंड देण्यात प्रसार माध्यमे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.


हुंडा प्रथा हा एक सामाजिक महारोग आहे. या समस्येचा संबंध मुळात तरुणतरुणींशी आहे. म्हणून ही समस्या तेच सोडवू शकतात. जर तरुण वर्गाने शपथ घेतली की. 'आम्ही हुंडा घेणार नाही व देऊ देणार नाही.' तर या समस्येपासून समाजाला मुक्ती मिळेल. मुलींनाही पुढे यावे लागेल. 


हुंडा लोभी लोकांना बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. प्रेमविवाह पण ही समस्या सोडविण्यास सहायक ठरू शकतील. तरुणांनी आंतरजातीय विवाह करावेत म्हणजे हुंडा मागितला जाणार नाही. चांगला जीवन-सहचर मिळेल व राष्ट्रीय ऐक्याला बळ मिळेल. 


हुंडा घेणाऱ्यावर व देणाऱ्यावर समाजाने बहिष्कार टाकावा. हुंडा मागणाऱ्यांना समाजाने गुन्हेगाराप्रमाणे वेगळे ठेवावे. यामुळे ही प्रथा नष्ट होऊ शकेल. स्त्री शिक्षण ही प्रथा समाप्त करण्यात सहायक ठरू शकेल. शिकलेल्या व स्वावलंबी स्त्रीवर अत्याचार करण्यापूर्वी तिच्या सासरच्या लोकांना तिचे उत्पन्न हातचे जाईल अशी भी ती वाटते. म्हणून आपल्या पायावर उभे राहून स्त्रियांनी हुंडा प्रथा नष्ट करण्यास सहकार्य केले पाहिजे.


आधुनिक भारतात पित्याच्या संपत्तीत मुलगा आणि मुलीला सारखा वाटा मिळतो. त्यामुळे आता तर हुंड्याचे औचित्यच संपले आहे. विवाहाच्या पवित्र बंधनाचा बाजार होण्यापासून रोकण्याची वेळ आली आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद