अति तिथे माती मराठी निबंध | ATI tithe mati marathi nibandh

अति तिथे माती मराठी निबंध | ATI tithe mati marathi nibandh 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण अति तिथे माती मराठी निबंध बघणार आहोत.  "असा माणूस गेल्या दहा हजार वर्षांत आम्ही पाहिला नाही." आचार्य अत्र्यांच्या या वाक्याला हास्याची कारंजी उडायची. 'अति झालं नी हसू आलं' या चालीवरच! एकंदरीतच अतिशयोक्ती हा लोकप्रिय भाषालंकार!...


भाषेत ठीक, पण व्यवहार समतोलाच्या काट्यावरच तोलला जातो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक अहितकारकच असतो. " अतिरूपेण वै सीता, अतिगर्वेन रावणः।

अतिदानात् बलि: नष्टः -

 अति सर्वत्र वर्जयेत्॥" 


 असे म्हटले आहे ते उगाचच काय? म. गांधींची हत्या झाली तेव्हा सुप्रसिद्ध इंग्रज नाटककार बर्नार्ड शॉ उद्गारला “अतिशय चांगुलपणाचा परिणाम अशाच शोकांतिकेत होतो."... कर्णाचा अतिदानशूरपणा शेवटी कवचकुंडलं गमावण्यात झाला. 


परिणामी त्याचा युद्धात अंत झाला. Too good is also too bad! - ऊस गोड लागला म्हणून कोणी मुळापासून खाऊ नये. बोलघेवडेपणा हा गुण आहे पण अति बडबडीची वटवट होते आणि नकोशी होते. मौन हे प्रसंगी गुणकारी असते पण सततचे मौन हे घुमेपणाचे द्योतक ठरून निंदेस पात्र होते. 


अन्नात मीठ प्रमाणात असलं की अन्न रुचकर लागते. जास्त पडले तर घास तोंडात घालवत नाही. सढळपणाने खर्च करण्याचा अतिरेक उधळपट्टीत मोडतो तर काटकसरीचा अतिपणा कंजूषपणाकडे नेतो. व्यक्तिमत्त्व डागाळतो. कुणाकडे सतत गेल्याने आपली किंमत कमी होते. आदर कमी होतो.


'अतिपरिचयादवज्ञा संततगमनादनादरो भवति।

मलये भिल्लपुरंध्री चंदनतरुकाष्ठमिन्धनं कुरुते॥ 


मलय पर्वतावर चंदनाची झाडे विपुल असतात. त्यामुळे तेथील भिल्लिणी त्याचा उपयोग सरपणासाठी करतात. अतिराग रक्तदाबाला आमंत्रण देतो. अति मद्यपान लिव्हर बिघडवते. अति तांबूलसेवनाने, धूम्रपानाने कॅन्सर होतो. अति लोभाने सोन्याचं अंडं देणारी कोंबडी कापली तर हातचं सारंच जातं... 


अति टी.व्ही. पाहण्याने बुद्धी गंजून जाते...म्हणूनच म्हटलंय Anything in excess is - poison ! सर्व बाबतीत समतोलपणा महत्त्वाचा. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्र त केव्हा व का थांबावे हे ज्याला कळते तोच यशस्वी होतो.

ना अधिक ना उणे। 

असे असावे जिणे॥


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद