जंगलातील एक दिवस निबंध मराठी | | janglatil ek divas essay in marathi

 जंगलातील एक दिवस निबंध मराठी | | janglatil ek divas essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जंगलातील एक दिवस  मराठी निबंध बघणार आहोत. जांभूळघाटी ओलांडून जीप भिंगरीच्या जंगलात शिरली आणि वृक्षांच्या छत्रीनं आमच्यावर सावली धरली. जाणवली ती जंगलाची धीरगंभीर प्रकृती! शांततेला पशुपक्ष्यांचे आवाज छेद देत होते. 


आमच्याबरोबर वनात घुसलेला आगंतुक वारा झाडेवेलींशी मस्ती करत होता. कधी चक्क शीळ घालत होता... वृक्ष आपले मस्तक हलवून आमचे स्वागत करीत होते. वनदेवतेला आमची खबर द्यायला माकडं दूर आत पळाली. शेपट्या उंचावत खारी वृक्षांचे मल्लखांब चढून गेल्या. 


ससे स्तंभित नजरेनं पाहून माघारी फिरले. "मी माणूस पाहिला" ही वार्ता घरच्यांना सांगायला कदाचित्! ... हळूहळू जंगल दाट होत गेलं. डेरेदार वृक्ष व कमनीय वेलींच्या कमानीखालून, हिरव्यागार गवतांच्या पायघड्यांवरून आम्ही जात होतो. सोबतीचा मंगळ्या हा आदिवासी जंगलाची रनिंग कॉमेंट्री करत होता. 


चिंच, निंब, जांभूळ यांबरोबर किंजळ, बदरी, धत्तूर, बृहती, दाडिमी, मरुबक या वृक्षपरिवाराशीही भेट करवून दिली. डब्यात दिसणारे बिब्बा, बेहडा, जायफळ उघड्यावर पाहून मजा वाटली. फुलांचे तर प्रदर्शनच होते. मोहाची शराबी फुलंही मंगळ्यानं दाखवली. 


आकार, रंग, वास यांची लयलूट होती... ऑक्टोबरचे दिवस म्हणून आंबे, जांभळं नव्हती पण अनोळखी फळांचा रानमेवा मंगळ्यानं असा खिलवला की 'यँवरे यँव!...' जंगल यात्रेला हेच दिवस चांगले- इति मंगळ्या! पाणवठे भरलेले, गवत खूप, तृणभक्षक पुष्ट, मांसाहारी प्राणीही संतुष्ट. 


जमीन ओली म्हणून त्यांचे ठसे ठसठशीत- खरंच होतं ते! फलाहारानंतर नागवेलीची पानं चघळताना मंगळ्यानं “गप्प रहा", म्हटले व जमिनीवर तो ठसे पाहू लागला. माझ्या अंगावर काटा! “मी तुला आता खाणारऽ” म्हणत वाघ येतो काय असे वाटून. "चला हरणं दावतो" म्हणत त्यानं आम्हाला पाणवठ्यावर नेलं.


गोंडस अंगाची, करड्या रंगाची, ठिपक्यांची ४-५ हरणं पाणवठ्यावर पाणी पीत होती. एक उंच, डौलदार शिंगाचं हरीण पहारा देत होतं... देखण्या चंद्राच्या रथाचे तितकेच नाजुक देखणे घोडे २५-३० पावलांवर होते. काजळ घातलेले, काळेभोर वाटोळे, किंचित बदामाकृती डोळे, किती भोळे, निष्पाप!... कालिदासाच्या शाकुंतलात हरणांशी गाठ पडलेला दुष्यंत आठवला. मनाच्या भावना उमलून आलेल्या. 


“वाहऽ” मी म्हटले. चाहूल लागताच सारा कळप उधळला. पायापासलं बेडूक पाण्यात बुडालं तशी मंगळ्यानं मला बाजूला खेचलंजवळूनच सळसळत साप गेला. "बापरे!" मी नि:श्वास सोडला. "आता जीपमधून उतरायचं नाही." हा निश्चय मंगळ्यानं टिकू दिला नाही.


“जनावरं स्वत: कुणाच्या वाटी जात न्हाईत" त्याचं जंगली तत्त्वज्ञान!... कधी तो ठसे दाखवत होता, कधी प्राणी! जंगली कुत्री, इसापनीतीतला कोल्हा, रानमांजर, मस्तवाल गवे, रानरेडे! लक्षात राहिले, जवळून पाहिलेले रानडुक्कर अन् तरस! ३०० पौंडाचं, वक्राकार सुळे, चित्त्याला लोळवणारं मुसंडी बहाद्दर डुक्कर, तर भुऱ्या रंगाचं, पट्टेवालं, मोठ्या डोक्याचं, घोड्यासारखी आयाळवालं तरस पाहणं हा विलक्षण अनुभव होता... 


दुर्बिणीनं प्राणी, पक्षी पाहात, कॅमेऱ्यानं टिपून त्यांना आमचे बंदी करत. अधेमधे पाणी, जागा पाहून पोटपूजा करत, गाणी म्हणत भिंगरीच्या जंगलातून भिरीभिरी फिरत मोठी वर्तुळाकार चक्कर पूर्ण करून बाहेर पडलो तेव्हा संध्याकाळ झाली. वेगळ्याच विश्वातून परतताना नको वाटलं इतके रमलो. 


परतताना वाटलं माणूस कुणाही प्राण्याचं भक्ष्य नाही. मग माणसानं सर्व प्राण्यांना भक्ष्य का ठरवावं? हा अधिकार त्याला दिला कुणी? माणसाच्या तुलनेत पाऊणशे पट जगहे इतर प्राण्यांनी व्यापलं आहे. सृष्टीत हे प्राणी प्रथम जन्मले. माणूस नंतरचा!... पण सर्व जगावर माणूस मालकी हक्क सांगतो. 


हौसेसाठी, उगाच गंमत म्हणून या सर्व मुक्या प्राण्यांना वेठीला धरतो. चवीसाठी खुशाल त्यांचे जीव घेतो. त्यांचे हाल करून खेळ खेळतो. अन्यायाची, क्रूरतेची ही परिसीमा आहे. बुद्धिमान माणसाला हे का कळत नाही?   मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.