महात्मा गांधी मराठी निबंध | Mahatma Gandhi essay Marathi

महात्मा गांधी मराठी निबंध | Mahatma Gandhi essay Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण महात्मा गांधी मराठी निबंध बघणार आहोत.  सकाळी नेहमी लवकर उठणारे, प्रार्थना म्हणणारे, सकाळी ३-४ मैल पायी चालणारे, आजारी पडणे हे पाप आहे असे सांगणारे, निसर्गोपचाराचे प्रयोग करणारे, 


क्षणात मम विचाररहित करून विश्रांती घेणारे, मन:शक्तीच्या जोरावर रात्रीच्या कोणत्याही प्रहरी उठणारे, नेहमी यथार्थ तेच बोलणारे, एकटाकी लेखन करणारे, लिहिताना एकही शब्द गैर न वापरता हजारो पाने लेखन करणारे गांधीजी म्हणजे एक व्यक्ती म्हणून अलौकिक असामान्य पुरुष होते.

गांधीजींना एकट्या माणसाचे सैन्य असे म्हणत. गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला दिलेले योगदान केवळ असाधारण आहे. बार्डोलीला शेतकऱ्यांवरील अन्याय दूर व्हावा म्हणून त्यांनी सत्याग्रह केला. अहमदाबादला कापड गिरणी कामगारांच्या हलाखीविरुद्ध लढा दिला. 


भारतीयांच्या स्वातंत्र्यासाठी सन १९२०, १९३० मध्ये देशव्यापी आंदोलने केली. १९४२ च्या आंदोलनात इंग्रजांना 'चले जाव' म्हणून सांगण्यास ते कचरले नाहीत. स्वातंत्र्यासाठी म. गांधींनी सत्याग्रह, असहकार, सविनय कायदेभंग अशी एकापेक्षा एक सरस अस्त्रे वापरली.


गांधीजींनी तत्त्व म्हणून ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या त्यांनी स्वत: आधी कृतीत आणल्या. 'आधी केले, मग सांगितले' असे त्यांचे जीवन होते. त्यांनी श्रमप्रतिष्ठेला, अंगमेहनतीला खूप महत्त्व दिले. प्रत्येकाने कष्ट केले पाहिजेत. कष्टाशिवाय कोणालाही अन्न खाण्याचा, संपत्ती जमविण्याचा अधिकार नाही असे त्यांना वाटे. 


ते स्वत: अंगमेहनतीची कामे करत. गांधीजी संयमी होते. साध्या राहणीशिवाय उच्च विचारसरणी शक्य नाही. यंत्रामुळे मानवाचे नैसर्गिक गुण मारले जातात. जीवन सुधारण्यासाठी संयमाचा बंधारा हवा म्हणून गांधींनी साबरमती, सेवाग्राम येथे आश्रम स्थापन केले. 


तेथे कार्यकर्त्यांवर, सत्याग्रहींवर अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, स्वदेशी, निर्भयता इ. तात्त्विक संस्कार केले. गांधीजींच्या आश्रमात सर्व जातिधर्माचे लोक येत. आश्रमात रोज प्रार्थना होई. सर्वसाधारणपणे सर्वांच्या बसण्याच्या जागा ठरलेल्या असत. एकदा गांधींना एका महारोग्याची जागा रिकामी दिसली. 


तो महारोगी महार होता. त्याला त्यांनी शोधून काढले. आश्रमात आणले. त्याची सेवा केली. त्याला बरे वाटले मग गांधीजी म्हणाले, आता माझी प्रार्थना पूर्ण झाली.' अशी होती गांधींची ईश्वरसेवा! गांधीजी सर्वधर्मसमभाव मानणारे होते. नौखालीत एकदा दंगल उसळली होती. 


अशा वेळी गांधींनी मुस्लिमांना भेटण्याचे धोक्याचे होते. तरीसुद्धा गांधींनी धोका पत्करून मुस्लिमांची भेट घेतली. असा हा गांधींचा प्रत्यक्ष सर्वधर्मसमभाव अतिशय महत्त्वाचा ठरला. दंगल शमली, हिंदू-मुस्लिम शांत झाले. भारत हा दरिद्रीनारायणाचा देश आहे. हे पाहून गांधींनी अंगभर वस्त्र घालणे सोडून दिले. 


कमरेला पंचा गुंडाळू लागले. गांधीजी स्वच्छताप्रिय होते. ते स्वत:चे कपडे स्वत: धुवत. त्यांची पाण्याची लोटी तर आरशासारखी लखलखीत असे. त्यांच्या मते 'स्वच्छता म्हणजे परमेश्वर.' गांधीजी स्वच्छतेचे पुजारी होते. भारतातील तीर्थक्षेत्रे अस्वच्छ पाहून ते दु:खी होत. 


त्यांनी हरिजन वस्त्या, वाड्यात जाऊन स्वत: स्वच्छता केली. लोकांना आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. गांधीजींनी समाजप्रबोधनासाठी 'इंडियन ओपीनियन' हे वृत्तपत्र व 'यंग इंडिया', 'हरिजन' ही नियतकालिके सुरू केली. गांधीजींनी शेतकरी, संपादक, शिक्षक, मुद्रक, लोहार, सुतार, न्हावी इ. विविध भूमिका वेळप्रसंगी निभावल्या.


चुकांचा आढावा घेण्यासाठी ते मौन पाळत. गांधीजींची वृत्ती अस्सल वैष्णवी होती. 'वैष्णव जन तो तेणे कहिये। जो पीड पराई जान रे।' हे त्यांचे आवडते भजन होते. हे भजन ते जगले होते. गांधीजी रंजले-गांजलेल्यांचे द:ख निवारण्यासाठी अहोरात्र झटले. गरिबांच्या जीवनाशी समरस झाले होते.


गांधींजी खऱ्या अर्थाने भारतीय होते. त्यांचे सर्व जीवन भारतासाठी होते. देश स्वतंत्र झाल्यावर गांधींनी स्वत: कोणतेही पद स्वीकारले नाही. त्यांना एखादे पद मिळाले नसते का? सहज मिळाले असते. उलट महात्मा गांधींनी पद स्वीकारले असते तर त्या पदाचाच मान वाढला असता. 


पण गांधींनी अस्तेय तत्त्व आचरणात आणले होते. 'इदं न मम' ही निर्लोभी वत्ती अखेरपर्यंत त्यांची होती. आज असे दिसणार नाही. म्हणूनच गांधीजी महात्मा होते. अशा या मानवतेच्या महान महात्म्याला माझे विनम्र अभिवादन!


सन १९९३. महात्मा गांधींच्या दक्षिण आफ्रिका प्रवेशाला १०० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने म. गांधीजींनी केलेल्या कार्याच्या विचारांना उजळा मिळाला. म. गांधीजींचे व्यक्तित्व तसे गुंतागुंतीचे; जटिल, समजावून घेणे अवघड! मनात विचार आले. म. गांधी हे जन्मानेच सत्याचे मूर्तस्वरूप असावेत; 


कारण सत्याबद्दलच्या अतीव आस्थेमुळेच त्यांनी आपले संपूर्ण जीवनच सत्याशी जखडून घेतले होते. त्यांनी आफ्रिकेत केलेला संघर्ष हा केवळ काही हक्कांसाठी दिलेला लढा नव्हता; तर सत्याच्या जपणुकीसाठी केलेला सत्याग्रह होता. 


गांधीजींनी आपल्या अगदी पहिल्याच भाषणात 'आफ्रिकेतील भारतीय व्यापाऱ्यांना सचोटीने वागण्याचा संदेश दिला. यावरूनच ते आफ्रिकेत पोहोचले तेव्हाही ते महात्माच होते, हे सिद्ध होते. आफ्रिकेतील भारतीयांच्या प्रश्नांपासून गांधीजींच्या सार्वजनिक जीवनाचा प्रारंभ एक राजकीय नेते म्हणून होतो. 


त्या आरंभाचे स्वरूप अन्याय आणि आक्रमण करणाऱ्या वरिष्ठांच्या विरुद्ध, जेतेपणाच्या अहंकाराविरुद्ध आणि सर्व अत्याचार निमूटपणे सहन करणाऱ्या दलितांच्या बाजूने उभे राहण्यात होते. गांधीजींच्या जीवनाचे हे कायमचे सूत्र होते.


त्यानंतर क्रमाने सामाज्र गाजविणाऱ्या इंग्रजांच्या विरुद्ध दडपल्या गेलेल्या भारतीय जनतेच्या बाजूने सत्याग्रही लढा देणे हे त्यांचे सर्वव्यापी ध्येय राहिले. सर्वांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. गांधीजींच्या जीवनाची मुख्य प्रेरणा सर्व दरिद्री व पीडित यांच्या बाजूने राहण्याची आहे. 


यावर मतभेद दाखविणे कुणाही प्रामाणिक माणसाला शक्य होणार नाही. क्रांतिकारकांप्रमाणे गांधीजीही बलिदानाला सज्ज होते. पण त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यांना वाटत असे की थोड्या लोकांच्या जास्तीत जास्त त्यागाने देश कसा मुक्त होणार? 


जास्तीत जास्त लोकांनी थोडा तरी त्याग केला पाहिजे. गांधींनी लोकांना त्यासाठी सज्ज केले. स्वातंत्र्यचळवळीला जनआंदोलनाचे रूप दिले. महात्मा गांधीजी म्हणत, जे वरच्या पायऱ्यांवर उभे आहेत त्यांना एखादी पायरी खाली उतरणे शक्य असते; पण जे खालच्या पायरीवर उभे आहेत त्यांचे डोकेच तेवढे पाण्याच्या वर असते. 


त्यांना अजून एक पायरी खाली उतरणे शक्यच नसते. हा जो शेवटचा माणूस, त्याच्या हिताचे काय, हा गांधीजींच्या समोर नित्य प्रश्न राहिला. गांधीजींना आधुनिक संत म्हणता येईल. कारण त्यांचा हिंदुधर्माभिमान जेवढा उत्कट आहे तितकाच राष्ट्राभिमान प्रखर आहे. 


त्यांनी स्वत: कोणताही नवा धर्मपंथ स्थापन केला नाही. उदा. आर्यसमाज, ब्राम्होसमाज, सत्यशोधक समाज, प्रार्थनासमाज इ. त्यांच्या मते प्रत्येक नवा धर्मपंथ कडवेपणाला जन्म देतो. ते त्यांना मान्य होणारे नव्हते. म्हणून त्यांनी 'सर्वधर्मसमभाव' ही कल्पना विकसित केली. 


गांधीजी असे मानत की, 'एकच परमेश्वरी तत्त्व सर्वत्र भरलेले' असल्यामुळे सर्व माणसे समान आहेत. त्यांचे हक्क समान आहेत. त्यांना प्रतिष्ठाही समान असली पाहिजे. त्यांना शोषणरहित समता आणि स्वातंत्र्यावर आधारलेल्या आदर्श भविष्यकाळाकडे जायचे , होते.


भारतासारखा देश परंपरागत जीवनामुळे धर्मश्रद्धाप्रधान आहे. त्यामुळे येथे धर्माचे नाव घेऊन कोणतेही आंदोलन कितीही उग्र स्वरूपाने चालविता येते. धर्म आणि जाती फुटीर राजकारणाचा फार मोठा भाग बनवतात. म्हणून या देशात धर्मातीत शासन उभे करणे शक्य व्हावे 


या दृष्टीने आवश्यक असणारे वातावरण सातत्याने निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी केला नव्हता; तो गांधीजींनी केला. आज धर्मातीत शासन या देशात आपण चालवू शकतो, हा गांधीजींचा नवभारताला मिळालेला फार मोठा वारसा आहे.


गांधीजींनी स्वातंत्र्याच्या भावनेने सारा देश भारून टाकला, तोसुद्धा अहिंसेच्या मार्गाने ! अहिंसा स्वत:चा व इतरांच्या स्वातंत्र्याचा विचार करते. स्वातंत्र्याच्या या आग्रहामुळेच गांधीजी भारतातील पुरोगामी मनोवृत्तीच्या समर्थकांचे प्रेषित ठरले. ब्रिटिश राजवटीला त्यांनी सैतानी राजवट ठरविले; 


कारण प्रेमस्वरूप परमेश्वर (प्रभू) दुसऱ्यांना गुलाम करण्याची प्रेरणा देऊ शकत नाही. स्वातंत्र्याचा हाच आग्रह गांधीजींच्या स्त्रीविषयक धोरणात दिसतो. त्यांनी नेहमी स्त्रीसुधारणांचा पुरस्कार केला. तसेच हजारो स्त्रियांना राजकारणाच्या सार्वजनिक क्षेत्रात आणले. 


राजकीय प्रचार, सभासंमेलन, सत्याग्रह, तुरुंगभरती अशा ठिकाणी त्यांनी नवजागृत स्त्रीची शक्ती वापरून दाखविली. म्हणूनच स्त्रियांनी गांधींना आपला वत्सल पिता मानले. जो मुद्दा स्त्रियांच्या बाबत होता तोच मुद्दा अस्पृश्यांनाही लागू होता. 


गांधीजी अस्पृश्यांना हिंदू समाजाचा भाग मानत. त्यांना समान नागरिकत्वाचे हक्क मिळावेत, त्यांच्या विकासाला अग्रहक्क पाहिजे असाही त्याचा आग्रह होता. त्यांनी अस्पृश्यांना काय दिले या प्रश्नाबरोबरच त्यांनी स्पृश्यांचे मन कसे घडविले हा प्रश्न विचारला पाहिजे. 


गांधीजी त्यांना 'हरिजन' शब्द वापरीत, तो दलितांना अपमानास्पद वाटतो. पण गांधींनी हा शब्द गुजराथी वैष्णव संतांच्या साहित्यातून उचललेला आहे. वैष्णवजन, हरिजन हे शब्द आदरवाचक आहेत. आदिवासींच्या विकासाला अग्रहक्क मिळाला पाहिजे हा प्रश्न त्यांनी स्पृश्यांच्या मनात बळकट करून घेतला.


गांधीजींचे राजकारण सर्व फुटीरपणाला विरोध करून समाज जोडण्याचे होते. ते समता आणि स्वातंत्र्याची नवी आकांक्षा घेऊन आले. आणि या आकांक्षेने कोट्यवधींची मते प्रभावित करून उज्ज्वल भविष्याचा एक नवा मार्ग त्यांनी मोकळा केला. 


तेवढे जरी नव्या पिढीच्या लक्षात आले तरी पुरेसे आहे. अर्थात या महात्म्याला समजून घेणे इतके सोपे नाही, कारण ते व्यक्तित्व फार गुंतागुंतीचे आहे. जटिल आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद