माझ्या मनातील आदर्श गुरु-शिष्य मराठी निबंध | Mazya Manatil Adarsh Guru Shishya Marathi Nibandh

  माझ्या मनातील आदर्श गुरु-शिष्य मराठी निबंध | Mazya  Manatil Adarsh Guru Shishya Marathi Nibandh 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  माझ्या मनातील आदर्श गुरु-शिष्य मराठी निबंध बघणार आहोत.  'विद्या नाम नरस्य रूपमधिकम्, विद्याविहीन: पशुः।-... माणसाचं पशुत्व जायचं तर विद्या शिकावी. विद्या हीच खरी माणसाची ओळख! 


त्यासाठी हवा गुरू. .... मानवेतर प्राण्यांमध्ये नसलेलं एकच नातं- गुरुशिष्य. एकमेकास शिकवताना इतर प्राण्यांना कुणी पाहिलंय? वंशपरंपरा आणि भुकेसाठी व्यवहार एवढंच त्यांना माहीत. ज्ञान, कला, अनुभव यांचे आदानप्रदान फक्त मानवातच! म्हणून जन्माला आलं गुरु-शिष्य नातं!


वाल्मिकींचा आदर्शवाद, व्यासांचा व्यवहारवाद, वेदांची शिकवण आजही उपयोगी पडत आहे. काळावर मात करून!... असा अनंतकाळचा वारसा देणारे, लघुत्व घालवणारे गुरू हवेत. देह पिता देतो, संस्कार गुरू करतो म्हणूनच जगज्जेता सिकंदर पित्यापेक्षा श्रेष्ठ स्थान गुरू अॅरिस्टॉटलला देतो. संत कबीर तर परमेश्वरापेक्षाही गुरू श्रेष्ठ मानतात.

'गुरु गोविंद दोनो खडे, काके लागू पाय ?

बलिहारी गुरु आपकी गोविंद दियो बताय॥' 


गुरू त्या प्रतीचा असावा की ज्याच्या केवळ काल्पनिक अस्तित्वानेही अर्जुनाच्या तोडीचा एकलव्य तयार व्हावा. - द्रोणाचार्यांसारखा! श्रीसमर्थ म्हणतात "सूर्याने अंधार जातो, गुरूने अज्ञान अंधार जातो. गुरूमुळे मायाबंधने तुटून पडतात. मुक्तीची वाट गुरू दाखवतो." 'सा विद्या या विमुक्तये।' अशी विद्या प्रदान करणाराच माझ्या मनातील गुरू आहे...


पोटार्थी विद्याव्यापारी म्हणजे गुरू नव्हे. 'हे आमचे गुरूच नव्हेत' लो. टिळकांनी लिहिलेले हे तीन लेख व समर्थांनी सांगितलेले तथाकथित गुरूंचे सतरा प्रकार खूप काही सांगतात.

 “जे यातीचा जो व्यापार । 

शिकवती भराया उदर। 

ते ही गुरू परी लाचार । 


सद्गुरू नव्हेती॥" शेवटी म्हणतात “मोक्षदाता सद्गुरू । तो वेगळाचि असे॥" आधुनिक युगात-ज्ञान, अनुभव, त्याग, तपस्या, विवेक, वैराग्य, वत्सलता, अनुशासनप्रियता या आठ गुणांचं अष्टगंध लावलेला गुरू आदर्श! जुनी मूल्ये जपत नवीन आव्हाने पेलत शिष्यांत स्फुलिंग फुलवणारा गुरू असावा. Best teacher inspires म्हणतात. 


गुरू हाच! सुगंधामुळे फुलाकडे लक्ष जाते. किरणांमुळे सूर्य भासमान होतो. शूर सैनिकांमुळे राजा चक्रवर्ती होतो. तसा उत्तम शिष्यामुळे गुरू गुरुत्वाला जातो. शिष्यांच्या पारंब्यांनी वटवृक्षासमान गुरू विस्तारत जातो. अश्रद्ध, चंचल, आळशी, उद्धट, सांगकामे, पढतमूर्ख शिष्य विद्येला, गुरूला व स्वत:लाही कलंकित करतात. 


"ज्ञानतृष्णा गुरौ निष्ठा सदा अध्ययनदक्षता” असणारा शिष्य आदर्श! श्रद्धा, नम्रता, चारित्र्यवान, नीतिमान, उद्योगशीलता, महत्त्वाकांक्षा या गुणांचे सप्तरंगी इंद्रधनुष्य त्याच्या ज्ञानपटलावर दिसावे.... गुरूच्या पोटात शिरून विद्या मिळविणारा, देवयानीचा मोह टाळणारा कच, 


भुंग्यांनी मांडी पोखरली तरी गुरूचे मस्तक हलू न देणारा कर्ण, पक्ष्याचा डोळाच पाहणारा अर्जुन, गुरुशब्दाखातर गडावरून उडी मारणारा कल्याण, धौम्य ऋषींचा शब्द वेद समजून देहाचा बांध घालणारा अरुणी हे ज्ञानलालसा, सहनशीलता, श्रद्धा, अनुशासनप्रियता, तल्लीनता यांचे आदर्श घालणारे आदर्श शिष्य होत. माझ्या मनातील आदर्श शिष्यच!


वसिष्ठ- प्रभू रामचंद्र, सांदीपनी-कृष्ण, व्यास-वैशंपायन, जनक-शुक, द्रोणाचार्य-अर्जन, परमहंस-विवेकानंद - आदर्श गुरुशिष्यांची भारतात अशी देदीप्यमान परंपरा आहे. जगात अशी कोठेही नसेल. आदर्श गुरुशिष्य परंपरा हे माणसाच्या विकासाचं रहस्य आहे. हे मानवतेचं मूलस्थान आहे. गरज आहे ती परंपरा जपण्याची! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद