शेतमजुराचं आत्मवृत्त मराठी निबंध | Shetmajurache Aatmvrutta Marathi nibandh

 शेतमजुराचं आत्मवृत्त मराठी निबंध | Shetmajurache  Aatmvrutta Marathi nibandh 

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शेतमजुराचं आत्मवृत्त मराठी निबंध बघणार आहोत. “राबून राबूनशानं जिंदगी सरली पोटाची दामटी वळली रं, चल उचल कोयता कुदळ रं।" असं आमचं आयुष्य. काळ्या मातीत तिफन चालवताना, विहिरीवर मोट चालवताना, पिकाची राखण करत, गोफण चालवताना ऊन, पाऊस, थंडीत राबावं लागतं. 


लई कष्ट होतात. पण आम्ही नाही राबलो तर लोक खाणार काय? आम्ही राबतो शेतात तेव्हा तुमच्या भाकऱ्या शेकतात... कुणी इंजनेर होतात, कुणी डागदर, कुणी गुरुजी, कुणी कंडक्टर तसा मी शेतमजूर आहे, परिस्थिती आणि वकूब याचा जसा मेळ बसंल तसे आपण होतो. 


तुम्ही म्हणाल लई ज्ञानी बोलतो आहेच मी ज्ञानी. नावच माझं ज्ञाना, हाकेला- देन्या ! या काळ्या आईच्या मांडीवर कधी टॅहँऽ केलं ठाऊक नाही. आंबेडकरानं धरम बदलला तेव्हा बापाचं मुंडासं धरून त्याच्या खांद्यावर होतो म्हणे त्या तिथं!... काही वर्षांतच बा ची माती झाली. 


आयेचा हात धरून खुरपायला, पाणी धरायला जाऊ लागलो. मालकाची जित्राबं राखू लागलो.... या ज्ञानाची त्या ज्ञानाशी गाठच पडली नाही. अडाणीपणाचं लोढणं सारखं पायात येतं. पाखऱ्या बैलाच्या पायात लाकडाचं येतं तसं. लिहिता वाचता नाही आलं तरी व्यवहार पक्का यायचा. 


आता रातच्या प्रौढशिक्षण वर्गात जातो तेव्हा थोडं थोडं लिहिता वाचता पण यायला लागलं... शेतात काम नसलं की शेतातच देवाचं नामस्मरण करत बसतो. सावता माळ्यानं भक्तीचे मळे पिकवले, मी पिकवलेल्या मळ्यात भक्ती करत बसायचो. देवळात ऐकलेले अभंग म्हणत शेतात हात चालवायचो.


“शेत माझा देव, शेती माझी पूजा मला सांगायचा माझा बाप, माझा आजा।" खरं तर शेतीचा तुकडाही माझ्या नावावर नाही. माझ्या बाच्याही नव्हता. पण मशागतीत कसर नाही ठेवत. शेती मालकाची. देऊळ आपलं नसतं म्हणून देवाची पूजा आपण करतोच ना? 


तिच्यात अग चारून कस चालल? पापच ते!... पहाटेच उठून मी शेतात जातो. निंबाची काडी चघळत चक्कर मारतो. विधी उरकतो. फाट्याच्या पाण्यावर आघोळ करून खोपटात येतो. म्हसराच दूध काढतो. 'चा' न्याहरी करतो. कोंबडं, शेळ्या सोडतो. अन् शेतीच्या कामाला लागतो. 


नांगरणी, पेरणी, कोळपणी, खुरपणी, कापणी, मळणी, एका का दोन कामं. निर्मळ हवा, गोड पाणी, सूर्याची ऊब, ताजा भाजीपाला, फळं, भरपूर मेहनत, खवळलेली भूक, नीरसं दूध, कांदालसूण भाकर, अंग टाकताच झोप... कशाची चिंता करायची? 


पैसा ओतून न मिळणारी ही सुखं डोक्यावर देव आला की टोपलीतली भाकरी शेतात खायची दुपारची. निंबाच्या झाडाखाली लुडकायचं... सांजचं घरी यायचं. म्हणाल "गडी लईच पोचलेला दिसतो, सुखी दिसतो"- तसं नाय ! कधी पाऊसच नाही तर कधी नको तितका पडतो. 


रोगानं उभं पीक जळतं. कधी बेणं खराब लागतं. कधी खत खराब निघतं. कधी चोर पीक कापून नेतात. कधी शेतमालाला भावच येत नाही.- चालायचंच. अडचणी तुमच्या पण आयुष्यात आहेतच की! अडचणी आल्या म्हणून जगणं थोडीच सोडतं माणूस ? 


पाण्याच्या वाटेमध्ये खड्डा आला म्हणून पाणी वहायचं थोडीच राहतं? खड्डा भरतं, पुन्हा वाहतं- तसंच! पुन्हा म्हणाल, “लई ज्ञान सांगतो.” सांगितलं ना नावच माझं ज्ञाना, हाक मारायला- देन्या!  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद