भूक नसतीच तर मराठी निबंध | Bhuk Nastich Tar Essay In Marathi

 भूक नसतीच तर मराठी निबंध | Bhuk Nastich Tar Essay In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भूक नसतीच तर मराठी निबंध बघणार आहोत.  शाळा सुटली. माधव घरी आला व दफ्तर टाकत ओरडून म्हणाला - "आई, भूक !" "हातपाय धुऊन ये आणि खायला बैस. काय तुझी भूक रे ही ! आता आई नसती तर". "असं नाही आई, पण मी म्हणतो जर भूकच नसती तर'-माधव हसत हसत म्हणाला.


माधवचे ते शब्द माझ्या डोक्यात गरगरा फिरू लागले. भूक नसती तर... तर माणसाच्या आयुष्यातले किती तरी प्रश्न ताबडतोब निकालात निघाले असते. नव्हे प्रश्नच निर्माण झाले नसते. 'दुपारी १२ वाजता पोटात काय घालू बाबा ?' हा प्रश्नच कोणी कुणाला विचारला नसता.


'Man cannot live without bread', असं म्हणावयाची पाळी इंग्रजी विचारवंतांवर आली नसती... कवी नारायण सुर्वे यांनी एका कवितेत म्हटले आहेशेकडो वेळा चंद्र आला रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली. भूक नसती तर सुर्त्यांना 'भाकरीचा चंद्र' शोधण्याची गरज काय होती ?


लहानपणी मी आणि माझ्याबरोबरची मुलं शाळेतून घरी आलो की, शाळेत शिकविलेली कविता म्हणायचो - शाळा सुटली पाटी फुटली आई मला भूक लागली! पाटी का फुटली ? तर जेवणाआधी आईने घरी अभ्यासाला बसवू नये म्हणून ! माणसाला भूक नसती तर ही कविता कुठून येती ? तशीच लहानपणीची आणखी एक कविता आठवते.


कशासाठी ?...पोटासाठी...खंडाळ्याच्या घाटासाठी पोटाचा आणि खंडाळ्याचा संबंध काय ते तेव्हा मला कळलं नव्हतं ! पण भूक नसती तर पोटासाठी वेडावाकडा खंडाळ्याचा घाट चढण्याची माणसाला गरज नव्हती. 


वळणं घेत माणसाला नोकरीसाठी वणवण करण्याची आणि मुलाखती देण्यासाठी उसने हसू तोंडावर आणून लाचारी दाखविण्याची आवश्यकता राहिली नसती ! भाकरीची गरज उरली नसती आणि भाकरी नको असेल तर नोकरीची दगदग तरी कशाला ? 'पोटा पुरते देई विठ्ठला...लई नाही लई नाही मागणे'...


किवा 'आधी पोटोबा मग विठोबा'... यासारखे वाक्प्रयोग भूक नसती तर भाषेतून हद्दपार झाले असते. भूक नसती तर भुकेपायी होणारी भांडणं झाली नसती. भूकबळी पडले नसते. उपासमारीचा उग्र उपद्रव जाणवला नसता. भूक नसती तर दारिद्र्य दाहक बनले नसते. 


भूक नसती तर वेठबिगारी बहुधा निर्माण झाली नसती ! साधारणतः एकूण चोऱ्या व दरोडे यातले तीन-चतुर्थांश गुन्हे पोटाची भूक भागविण्यासाठी घडतात असे जाणकार म्हणतात. भूक नसती तर ही गुन्हेगारी कमी झाली असती. सुपीक प्रांत आपल्या राज्याला जोडण्यासाठी होणाऱ्या लहान मोठ्या लढायाही झाल्या नसत्या.


हे झालं पोटाच्या भुकेबद्दल. पण माणसाला इतरही काही भुका असतात. प्रेमाची भूक, वात्सल्याची भूक, वाचनाची भूक ! स्त्री-पुरुषांना एकमेकांविषयी वाटणारे प्रेम ! ही भूक नसती तर लग्न संस्थाच बंद पडली असती. आईला मुलाबद्दल वाटणारं वात्सल्य व मुलाला वाटणारी आईची ओढ, आईच्या प्रेमाची तुलना विश्वातल्या इतर कोणत्या नक्षत्र ताऱ्यांबरोबर होऊ शकेल का ? तिची बाजारात किंमत होऊ शकेल का ? पण ही भूक नसती तर


ही भूक पोरक्याची होई न शांत आई पाहुनिया दुजांचे वात्सल्य लोचनाही असं म्हणायची वेळ कविवर्य माधव ज्युलियन यांच्यावर कशाला आली असती ? 'देव भावाचा भुकेला' असं म्हणतात. कविराय रामजोशी यांनी स्पष्टच म्हटलंय


"भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा ' भगवंताला जर ही भक्तीची भूक नसती तर भाविकांचा व श्रद्धावंतांचा आधारच तुटला असता. ...आणि म्हणूनच मानवाची प्रेमाची भूक, वात्सल्याची भूक, भक्तीची भूक, वाचनाची भूक जाता कामा नये. एवढंच नव्हे पोटाची भूकसुद्धा ! ती जाऊन माणूस सुखी झाला असता हा भ्रम आहे. 


कारण ही भूक आहे म्हणून भाकरीचं महत्त्व आहे. म्हणूनच नोकरीची गरज आहे. श्रमाचं मोल आहे आणि शेतातल्या पिवळ्याधमक पिकल्या धान्याला सोन्याचं तेज आहे. भूक आहे म्हणूनच माणूस शिकला, धडपडला, त्याने शेतीपासून, कारखान्यांपासून डोंगर, नदीपासून सागरासह आकाशापर्यंत अनेक ठिकाणी झेपावून नवे नवे शोध लावले.


ज्ञान आणि विज्ञान यांच्या संयोगाने पृथ्वीचे नंदनवन करण्याचे अखंड प्रयत्न केले. पण भूक नसती तर... ही पृथ्वी नंदनवन नव्हे तर केवळ 'वन'च राहिली असती आणि मानव हा केवळ वनवासी आदिमानवच राहिला असता. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद