अभ्यासाचे महत्व मराठी निबंध | Essay on Importance of Study in Marathi

 अभ्यासाचे महत्व मराठी निबंध | Essay on Importance of Study in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  अभ्यासाचे महत्व  मराठी निबंध बघणार आहोत. 


सुखार्थी चेत् त्यजेद् विद्यां विद्यार्थी चेत् त्यजेत् सुखम् ।

सुखार्थिनः कुतो विद्या कुतो विद्यार्थिनः सुखम् ।। 


संस्कृत भाषेला देववाणी म्हणतात. या भाषेतील सर्वात मोठा अनमोल ठेवा म्हणजे संस्कृत भाषेतले सुभाषितरत्न - भांडार. प्रत्येक सुभाषितात जीवनातल्या अमोल अनुभवाचे सार आहे. अनुभवावर आधारलेल्या भावनेचा आविष्कार आहे, सारासारविवेकाने मांडलेला प्रमाणबद्ध विचार आहे.


अशा अर्थपूर्ण सुभाषितापैकी एक सुभाषित वर दिले आहे. ज्याला विद्या मिळविण्याची इच्छा आहे त्याने 'सुखा'ची इच्छा धरू नये. आराम, झोप, चैन, गप्पाटप्पा, टीव्ही, नाटक, सिनेमा, क्रिकेट, टेबलटेनिस सारखे खेळ, या गोष्टीत जास्त वेळ घालविणाऱ्याला विद्या प्राप्त होणार नाही. 


ही सारी सुखे हवी असतील तर विद्येची आशा नको. विद्या हवी असेल तर या सुखांची आकांक्षा नको. दोन्ही गोष्टी साधणार नाहीत. इंग्रजीत म्हण आहे  You cannot have the cake and eat it too. पुष्कळ मुले विचारतील पण ही विद्या मिळवायलाच हवी का ? अभ्यास करायलाच पाहिजे का ? 


आजकाल बऱ्याच जणांना शिक्षण नसून दरमहा भरपूर पगार मिळताना दिसतो. बोरीबंदरवरचे हमालसुद्धा रोज वीस रुपयांपासून शंभर रुपयांपेक्षाही जादा रक्कम मिळवितात. पानाची गादी चालविणारेसुद्धा शेकडो रुपये मिळवितात ! ते कुठे अभ्यास करतात ?


असा विचार करण्यात आपण दोन चुका करीत आहोत. या साऱ्यांना विचारून पहा. आपण शिकू शकलो नाही याचे त्यांना अंतर्यामी फार दुःख आहे. आपल्या मुलाबाळांनी शिकावे यासाठी ते धडपडत असतात. केवळ पैसा मिळविला, खाणे, पिणे, कपडालत्ता मिळाला की माणूस सुखी होत नाही.


दुसरी चूक अशी की यांना काही अभ्यास करावा लागत नाही हा आपला चुकीचा समज आहे. पानाच्या गादीवर बसणाऱ्यालासुद्धा पानांच्या जाती, सुपारी, तंबाखूचे प्रकार, रोजचे बदलते बाजारभाव, गि-हाईकांच्या आवडीनिवडी वगैरे अनेक गोष्टींचा अभ्यास करावा लागतो, तेव्हा धंद्यात यश मिळते.


लहान वयात आपल्याला अनेक गोष्टी शिकायच्या असतात. मोठेपणी जगात वावरताना लहानपणी मिळविलेले शिक्षणच उपयोगी पडते. मातृभाषा, राष्ट्रभाषा, इंग्रजीसारखी आंतरराष्ट्रीय भाषा वगैरे. गणित, शास्त्रे यासारखे नित्य उपयोगी पडणारी शास्त्रे, 


आपल्या राष्ट्राचा व संस्कृतीचा इतिहास, आपल्या परिसराचा व जगाचा भूगोल या केवळ पुस्तकी विषयांचाच नव्हे तर अर्थशास्त्र, सामान्य ज्ञान (General knowledge) लोकव्यवहार, संभाषण कला, हिशेब मांडणी वगैरे गोष्टींचा अभ्यास विद्यार्थ्याला भावी काळात उपयोगी पडतो. 


सर्वात मुख्य म्हणजे कोणत्याही गोष्टीचा विचार करताना परिस्थितीचा व विषयाचा अभ्यास करून त्याबद्दल योग्य निर्णय घेण्याची शिस्त माणसाला लागते व मग माणसास 'अशक्य' काहीच वाटत नाही. तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे तर 


असाध्य ते साध्य करिता सायास । 

कारण अभ्यास तुका म्हणे।

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद