वर्तमानपत्र वर मराठी निबंध | Essay On Newspaper In Marathi

 वर्तमानपत्र वर मराठी निबंध | Essay On Newspaper In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  वर्तमानपत्र वर मराठी निबंध बघणार आहोत.'तुम्ही काय वाचता यावरून तुमच्या देशाच्या प्रगतीची जाणीव होऊ शकते.' असे कुणीसे म्हटले आहे. खरे पाहता वृत्तपत्रे ही लोकशिक्षणाची साधने आहेत. समाजजागृतीची शक्तिकेन्द्रे आहेत.


पूर्वीच्या काळी ज्ञानप्रसार हाच वृत्तपत्रांचा मुख्य उद्देश होता. अर्थात 'ताज्या बातम्यां' चे महत्त्व कधी कमी झालेले नाही. टेलिप्रिंटरची यंत्रे, रेडिओ फोटो, उपग्रहावरून येणारे संदेश याचबरोबर स्वतंत्र वृत्तसंस्था, छपाई यंत्रात रोटरी मशीन वा ऑफसेट प्रिंटिंगमुळे झालेले बदल वगैरे गोष्टींमुळे गेल्या काही वर्षांत वृत्तपत्रांचे स्वरूप बदलले आहे.


वृत्तपत्रांचा खपही बराच वाढला आहे. लोकसत्ता सुमारे चार लाख. महाराष्ट्र टाइम्स सुमारे दीड लाख. मुंबई सकाळ, नवाकाळ एक एक लाख असा खप ऐकतो. मुंबई सकाळ, नवाकाळ ही दोनच वृत्तपत्रे मराठी मालकीची ! त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून प्रसिद्ध होणारे दैनिक 'सामना' हेही मराठी मालकीचे !


पण वृत्तपत्रांचे मूळ ध्येयवादी रूप मात्र बदललेले दिसते. काहींच्या मते लोकमान्यांचा केसरी आता 'केशरी' झाला आहे. वस्तुतः 'केसरी', 'तरुण भारत' ही ध्येयवादी वृत्तपत्रे-पण स्वतःचा खप टिकविण्यासाठी त्यांना एस.एस.सी. मार्गदर्शनमाला दर आठवड्याला सादर करावी लागते आणि वर्षातून ४/५ विशेषांक काढावे लागतात. 


काळानुसार बदल करावेच लागतात. शिवाजीचा जिरेटोप घालून लो. टिळक घोड्यावरून फिरत नव्हते किंवा टिळकांची पगडी व मिशा पं. नेहरूंना नव्हत्या म्हणून त्यांचे नेतृत्व कमी प्रतीचे ठरत नाही. वृत्तपत्र व्यवसायात सध्या फार स्पर्धा आहे. 


'ताज्या बातम्या' देणे हे तर महत्त्वाचे आहेच, पण बातम्या व प्रसंगानुसार उत्तम व स्पष्ट छायाचित्रे देणे, व्यंगचित्रे देणे, निरनिराळी सदरे चालविणे फार अगत्याचे ठरते. ज्ञान विज्ञान, साहित्य, संगीत, कला, चित्रपट, नाट्य, क्रीडा वगैरे विविध सदरे त्यासाठीच तयार करावी लागतात. रंगीत पुरवण्या सादर कराव्या लागतात.


बोफोर्स प्रकरणाची पुढची प्रगती काय ? शेअर घोटाळा प्रकरणाचे पुढे काय झाले? अशा बातम्या इतक्या महत्त्वाच्या असतात की त्या ताबडतोब पण खात्रीपूवक द्याव्या लागतात. हल्ली वृत्तपत्रांची दीड ते दोन पाने सिनेमा, नाटक व मोठ्या कंपन्यांच्या जाहिराती किंवा छोट्या जाहिराती यांनी भरलेली असतात.


त्यानंतर उरलेल्या पानांत विविध सदरे, एखादा माहितीपूर्ण लेख व अग्रलेख. असे असले तरी आजकालची वृत्तपत्रे निष्क्रिय म्हणता येणार नाहीत. गिरणी संप, गोदी कामगारांचा संप, विविध परिषदा, आंतरराष्ट्रीय महिलावर्ष, वगैरे गोष्टींची माहिती वृत्तपत्रे देतातच पण त्यावर अर्थपूर्ण भाष्येही करतात. 


सरकारची किंवा महापालिकेची धोरणे यावर सडेतोड टीका करतात. म्हणजे लोक-शिक्षण व जागृती ही कामे आजची वृत्तपत्रेही चोख बजावतात. मनोरंजक बातम्या व चटकदार जाहिराती, आकर्षक व्यंगचित्रे, काही मजेशीर शब्दकोडी वगैरे देऊन लोकरंजनही करतात, म्हणून वृत्तपत्रांचा दर्जा खालावला आहे असे म्हणणे सयुक्तिक नाही.


एक प्रकार दिसून येईल ! 'लोकसत्ता', 'महाराष्ट्र टाइम्स', 'नवशक्ती', 'मुंबई सकाळ', 'सामना', 'नवाकाळ' यांतून काही वेळा परस्परविरोधी विचार मांडले जातात. अर्थात पूर्वीही 'केसरी' व 'सुधारक' यांच्यात परस्परविरोधी विचार येत असतच. आगरकर म्हणत, विचार , कलहाला भिऊ नका / कारण त्यातूनच खरे तत्त्व हाती येते.'

वादे वादे जायते तत्त्वबोधः । मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद