मला लॉटरी लागली तर मराठी निबंध | Mala Lottery Lagli Tar Essay In Marathi

 मला लॉटरी लागली तर मराठी निबंध | Mala Lottery Lagli Tar Essay In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मला लॉटरी लागली तर मराठी निबंध बघणार आहोत.   'लाखाची गोष्ट' या जुन्या मराठी विनोदी चित्रपटातला एक प्रसंग आहे. एक लाखाचा जॅकपॉट लागलेल्या बाबुरावांना अत्यानंदाने हर्षवायू होऊ नये म्हणून त्यांचे डॉक्टर हलक्या आवाजात त्यांना विचारतात


"बाबुराव, समजा, तुम्हाला जॅकपॉटमध्ये एक लाख रुपये मिळाले तर...?" "तर...? त्यातले पन्नास हजार रुपये मी तुम्हाला देऊन टाकीन !" बाबुराव अगदी सहजपणे म्हणाले. "काऽऽ य ?" असे म्हणून डॉक्टर जे जमिनीवर कोसळले ते दोन तास बेशुद्ध होते.


खरंच आहे ! माणसाला आकस्मिकपणे एकदम खूप संपत्ती मिळाली तर वेड लागायची पाळी येते. मला प्रश्न पडतों, मला जर महाराष्ट्र राज्याची बंपर ड्रॉ ची पंचवीस लाखांची लॉटरी लागली तर मला वेड नाही ना लागणार ?....तशी शक्यता कमी. कारण आजच्या जमान्यात पंचवीस लाख रुपये म्हणजे काही फार मोठी रक्कम नाही ! 


शिवाय ही रक्कम म्हणे ४०/४५% कर कापून हाती दिली जाते. (अनंत करे देणारा तो कमलाकर विश्वकर्ता कुठे, आणि देतांनाच कर कापून देणारे हे शासनकर्ते कुठे?) म्हणजे जवळजवळ दहा लाख कापून घेऊन हाती येणार जेमतेम पंधरा लाख रुपये ! या पंधरा लाखात मी काय करीन असे तुम्हाला वाटते ? मला वाटते तीन-चार खोल्यांचा


७०० ते १००० चौरस फुटांचा ब्लॉक वसई, विरारकडे जरी घ्यायचा म्हटलं तरी साधारणतः ५-६ लाख रुपये लागतील हो. तो मी घेणारच ! (या मुंबईत जीव मेटाकुटीला आलाय) तरी आठ-नऊ लाख शिल्लक राहतील. 


आता नवीन जागा घेताना नवे फर्निचर, लिव्हिंग रूममधले सोफा कम बेड कम दिवाण, बाहेरच्या हॉलमध्ये राजस्थानी पद्धतीच्या खुर्या-टेबलांची सजावट गोदरेजचा दोन दारांचा फ्रीज, ओनिडाचा कलर टीव्ही, व्हीसीआर, फिलिप्सचा टेपडेक, बी.पी.एल चं पूर्ण स्वयंचलित धुलाई यंत्र (वॉशिंग मशीन) वगैरे सर्व सजावट करून घ्यावी लागणारच मग त्यासाठी एक दीड लाख रुपये लाणगार. म्हणजे साधारणतः सात लाख उरतील.


आता मात्र मी तुमचेच काय पण आमच्या घरातल्यांनी विरोध केला तर त्यांचे देखील ऐकणार नाही. म्हणजे त्यांना पटवून देईन.. अहो एवढी रक्कम हाती असताना पर्यटन...प्रवास करायला नको ? लोक हसतील ना कंजूषपणा करून घरातच बसून राहिलो तर...आता सहा-सात लाखांत इंग्लंड, अमेरिका पाहण्याचे स्वप्न व्यर्थच पण निदान सिंगापूर, हाँगकाँग, दुबई, मस्कत वगैरे ठिकाणी तर जाऊन येणारच. 


काय म्हणता...सहा-सात लाख त्यातच संपतील - नाही नाही. या प्रवासासाठी फक्त दोन लाखांची मर्यादा आहे. त्यात जमेल तिथेच जाणार. किमान पाच लाख रुपये शिल्लक ठेवणार ! तेवढे पाहिजेतच ! कशाला म्हणजे ? राष्ट्रीय बचत रोखे, संरक्षण रोखे, युनिट ट्रस्ट यासारख्या योजनांमध्ये दोन लाख रुपये ठेवणारच. आणि पन्नास-साठ हजार रुपये वेगवेगळ्या बँकांत ठेवीन (एका बँकेत नको रे बाबा ? तिची क-हाड बैंक झाली तर...?)


आता तुम्हाला हसू येईल पण साधारणतः एक लाखांचे सोन्याचे दागिने खरेदी करणार ! सोन्याचे भाव सारखे वाढतच असतात ना ! काही न करता सोने जवळ बाळगले तर मी जास्त श्रीमंत होणार ! देवाला विसरणार नाही बरं मी ! दक्षिण भारतात, उत्तर भारतात विविध तीर्थक्षेत्री जाऊन दानधर्म करीन. तसा माझ्या गावच्या आणि इतर काही चांगल्या शाळांमधल्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या ठेवीन. आणि कपडालता ? यासाठी पंधरा वीस हजार हवेतच ! लाखोपती मी ! माझ्या पैशात कपात कोण करणार ?


कोण करणार ? इन्कमटॅक्सवाले, डॉक्टर, वकील, इंजिनीअर, आर्किटेक्ट हे आपला पैसा कापणारच ! आणि इतके दिवस आपल्यापासून फटकून राहणारे आपले खरे खोटे लांबचे नातेवाईक ! ते अगदी ढेपेच्या मुंगळ्यासारखे जवळ येऊन डसतील का ? आता काय म्हणे लॉटरी बंद करणार आहे सरकार. त्याच्या आधीच मला लॉटरी लागली तर....! "....काय ? लक्ष कुठे आहे ? दिवास्वप्न पाहतोयस की काय इंद्राच्या राज्यातलं?" माझा मित्र मला गदगदा हलवून विचारीत होता ! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद