वृक्षाचे आत्मवृत्त मराठी निबंध | Vruksha Che Atmavruth in Marathi

 वृक्षाचे आत्मवृत्त मराठी निबंध | Vruksha Che Atmavruth in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वृक्षाचे आत्मवृत्त मराठी निबंध बघणार आहोत. अरे मुलांनो, जरा थांबा! येवढा वेळ माझ्या थंडगार सावलीत उभे राहीला आहात तर माझ्याशी जरा बोला तरी. मी तुमचा थकवा घालवला त्याबद्दल मला धन्यवाद तरी द्या. चला, बसा पाहू थोडा वेळ. आज मी तुम्हाला माझी जीवनकहाणी ऐकवतो.


माझा जन्म इथे या रस्त्याच्या कडेलाच झाला. कोण्या एका पक्षाने त्याच्या चोचीतून एक बी इथे आणून टाकले आणि पावसाचे पाणी मिळताच त्यातून एक रोप बाहेर आले. मला कोणी मुद्दाम पाणी दिले नाही की खत टाकले नाही. 


पण पावसाचे पाणी पिऊन मी हळूहळू मोठा झालो. मला खूपशा पारंब्या फुटल्या. त्या मोठया होऊन पुन्हा जमिनीत घुसल्या. माझ्या या पारंब्या खोलवर जाऊन पाणी व अन्न गोळा करतात.


या रस्त्याच्या किनारी मी खूप आनंदात आहे. विविध पक्षी माझ्यावर वास्तव्याला येतात. काही माझ्यावर घरटे बांधतात. या रस्त्यावर थोडे पुढे एक प्रसिद्ध मंदिर आहे. तुम्ही जसे सहलीला आलात ना तसेच अनेक भाविक त्या मंदिरात येतात. उन्हा-तान्हात थकले की माझ्या सावलीला येतात. 


आराम करतात. ताजे तवाने होऊन परत चालू लागतात. मी माणसांच्या, पक्ष्यांच्या उपयोगी पडतो याचा मला अतिशय आनंद वाटतो. मी काही फळे देणारा वृक्ष नाही. पण काही पक्षी माझ्या अंगावर वर्षातून एकदा येणारी ही फळे आवडीने खातात.


काल मात्र या परिसरात बरीच माणसे आली होती. नेहमी लाकडे गोळा करायला येणाऱ्या व मंदिरात येणाऱ्या लोकांपेक्षा ते वेगळे होते. त्यांच्या बोलण्यातून असे कळले की, हा रस्ता अधिक मोठा करायचा असल्याने मोजमाप घेण्याचे काम चालू आहे. 


त्यासाठी कदाचित येथील बरीचशी झाडे तोडावी लागतील. तेव्हा कदाचित माझेही आयुष्य धोक्यात येईल. नवीन सोयी-सुविधा करताना तुम्हा माणसांच्या हे लक्षात येत नाही की झाडे तोडली तर त्याचा निसर्गावर व पर्यायाने मानवावर वाईट परिणाम होतो. वृक्षतोडी मुळे जमिनीची धूप होते. पाऊस कमी होते व निसर्गचक्र बिघडते.


तुम्ही माझी कहाणी ऐकलीत याबद्दल धन्यवाद. पण माझी एक विनंती आहे. प्रत्येकाने झाडे लावा व झाडे जगवा. नाहीतर काही वर्षांत ही पृथ्वी म्हणजे रखरखीत वाळवंट बनेल. तुम्हा बुद्धिमान मानवांना आणखी काय सांगावे?मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद