maza avadta samaj sudharak essay in marathi | माझा आवडता समाजसुधारक मराठी निबंध 



समाजाच्या दु:खांशी नातं सांगणाऱ्यांना, शतकांची कुंपणं अडवत नाहीत. ते शब्द कुरवाळीत नाहीत अन् खाजगी व्यथाही गोंजारत नाहीत! सभोवतीच्या दुःखांना आव्हान देत येतात. या समाजातल्या दु:खभरल्या रात्री अन् अंधारलेली मने उजळून लख्ख करतात. अशी ही परमेश्वराप्रमाणे पूजनीय व्यक्तिमत्त्व म्हणजेच आपले समाजसुधारक होत. असाच एक वंदनीय समाजसुधारक मराठी मातीत जन्मलेला आहे, जो आज महाराष्ट्राचंच नव्हे तर जगाचं भूषण ठरला आहे आणि तो म्हणजे बाबा आमटे! मुरलीधर देवीदास आमटे हे त्यांचं खरं नाव. 

maza-avadta-samaj-sudharak-essay-in-marathi
maza-avadta-samaj-sudharak-essay-in-marathi


२६ डिसेंबर १९१४ रोजी हिंगणघाट येथे एका कर्मठ जमीनदाराच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. १९४९ मध्ये ‘स्कूल ऑफ ट्रॉपिकल डिसीझेस्' इथे त्यांनी महारोग्यांवरील अभ्यासक्रम पूर्ण केला. १९५० मध्ये त्यांनी 'महारोगी सेवा समिती' स्थापन केली. बाबांना ज्या क्षणी 'क्षितीज नसलेले पंख' लाभले असल्याची जाणीव झाली, त्याच क्षणी नियतीने त्यांच्या पुढ्यात परीक्षेतल्या प्रश्नपत्रिकेसारखा, तो गटारात रूतलेला महारोगी आणून टाकला, त्याचक्षणी महारोग्याच्या शरीराच्या जखमा आधुनिक उपचारांनी बऱ्या करणे सोपे असले तरी त्याच्या मनाला झालेल्या जखमा पूर्णपणे भरून यायला त्याचा पुरुषार्थ जागृत केला पाहिजे, हे बाबासाहेबांनी अचूक ओळखले. हे काम करताना आलेल्या अनुभवांतून आणि झालेल्या चिंतनातून चंद्रपूर जिल्ह्यातील 'आनंदवना'चा जन्म झाला.

 उद्ध्वस्त मानवातून पराक्रमी व्यक्तित्व निर्माण करण्याचा हा त्यांचा प्रयत्न पाहून परदेशातील जाणती मंडळी त्यांना मोठ्या आपुलकीने मदत करीत आहेत. आनंदवनासाठी सर्वप्रथम परदेशातून आलेली मदत नॉर्मा शिअर या अभिनेत्रीकडून होती! गांधीजींनी त्यांना अभय साधक' ही पदवी दिली. फक्त आनंदवनापाशीच ते थांबले नाहीत, तो त्यांचा मार्गावरचा एक टप्पा आहे. आज खलिस्तनवादी लोक 'भारत तोडो' म्हणत असतानाच त्यांनी देशाची एकता, अखंडता अबाधित राखण्यासाठी 'भारत जोडो' ही पदयात्रा काढली. समाजसुधारणेचा त्यांचा आणखी एक सुंदर प्रयत्न म्हणजे 'ज्वाला आणि फुले', 'करुणेचा कलाम' ह्या त्यांच्या कविता! त्यांच्या एकांतसाधनेचं ते फलित आहे. 



आजच्या युवापिढीला मारलेली ती अमूर्त हाक आहे. आळस, दैववाद, असामाजिकता, अल्पसंतुष्टता व संवेदनहीनता यांनी ग्रासलेल्या मनांना उद्देशून सोमनाथच्या आंतरभारती श्रमसंस्कार छावणीत बाबा म्हणाले, 'मन का कुष्ठ शरीर के कुष्ठसे अधिक भयंकर होता है।' हे जग व जीवन, फुलवण्याकरिता, उपभोग घेण्याकरिता आपल्याला दिले आहे, निसर्ग अनंत हस्तांनी आपणाला देऊ शकतो, पण त्याला संतुष्ट करण्याचे आव्हान भारतीयाने स्वीकारले पाहिजे, असा बाबांचा आग्रह आहे. यश यावे आणि या माझ्या आवडत्या समाजसुधारकाचे स्वप्न साकार व्हावे हीच माझ्यासारख्या त्यांच्या चाहतीची इच्छा ! म्हणून मला बाबांविषयी म्हणावंसं वाटतं 'जे का रंजले गांजले त्यांसि म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा देव तेथेचि

 निबंध  2

तुकाराम महाराज म्हणतात,
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले
तोची साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा' 
देवाची अशी सुंदर परिभाषा तुकाराम महाराजांनी केली. खरे म्हणजे देव ह्या पेक्षा वेगळा असूच शकत नाही. देव हा माणसात आहे मूर्तीत नाही हे तुकाराम महाराज सांगतात. तुकाराम महाराजांच्या या अभंगानुसार मला अशा प्रकारचे गुण असलेला महापुरुष आढळून आला ते म्हणजे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
बी.ए.,बी.एससी.,डीएससी.,एम.ए.,पी.एच.डी. अशा अनेक पदव्या प्राप्त करुन ते उच्चविद्याविभुषीत झाले.


भरपुर संपत्ती कमावून आपल्या कुटूंबाचा फायदा करु शकले असते.परंतु समाजसेवेचे व्रत घेणा-या या महापुरुषाला संपत्ती कमविण्याचे ध्येय नव्हते.त्यांना वेड होत ते भारतीय समाजाला अंधारातुन प्रकाशाकडे नेण्याचे, अज्ञानातुन ज्ञानाकडे नेण्याचे,अधोगतीतुन प्रगतीकडे नेण्याचे. बुद्ध,कबीर व महात्मा फुले या महापुरुषांना त्यांनी आपले गुरु मानले.या तीनपैकी कुणाचाही त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध आला नाही किंवा ते समकालीन सुद्धा नव्हते परंतु त्यांचे विचार व कार्य डॉ.आंबेडकरांना अतिशय महत्वाचे वाटले.त्यामुळे वरिल तिन्ही महापुरुषांना त्यांनी आपल्या गुरुस्थानी मानले.



त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा प्रचंड आहे. प्रत्येक ग्रंथात अमूल्य विचार आहेत. २) ग्रंथ निर्मिती : शूद्रांना शतकानुशतके विद्या ग्रहण करण्यावर परंपरेने बंदी घातली होती त्यामुळे भारतीय बांधव आपला इतिहास विसरला. त्याला आपली ओळख राहिली नाही. तेंव्हा त्याला आपली ओळख व्हावी या उद्देशाने बाबासाहेबांनी त्यांच्या करिता “शुद्र पूर्वी कोण होत?' हा ग्रंथ लिहिला. 'हिंदू स्त्रियांची उन्नती व अधोगती', 'रीडल्स इन हिंदूइझम'इ. प्रत्येक भारतीयाने वाचावेत अशी ग्रंथसंपदा आहे.


बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा ग्रंथ सुद्धा बाबासाहेबांनी सर्वच बहुजनासाठी लिहला. तो केवळ बौद्ध अनुयायांसाठीच लिहिला असे अजिबात नाही. हा ग्रंथ म्हणजे बुद्धाने केलेल्या क्रांतीचा इतिहास आहे. हा कुण्या एका जातीसाठी लिहिला नाही. कुण्या एका धर्मासाठी लिहिला नाही. ३) हिंदू कोड बिल : हिंदू स्त्रियांना आपले हक्क व अधिकार मिळावेत या करिता हिंदू कोड बिल तयार केले होते. परंतु त्या बिलात कोणत्या तरतुदी आहेत ह्याची पुसटशीही कल्पना नसलेल्या हिंदू स्त्रियांनी त्याचा प्रखर विरोध केला.


४) घटना निर्मिती : आज जगातील सर्वात मोठी लिखित घटना म्हणून महत्व आहे. जगातील एक महान घटनाकार म्हणून जग बाबासाहेबांना घटनेवरच आज भारतीय लोकशाही सुरु आहे.परंपरेने नाकारलेले मुलभूत अधिकार घटनेमुळे '. मिळाले.


स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्याय यावर अधारीत राष्ट्राच्या निर्मितीवर त्यांनी भर दिला व त्या प्रकारची कलमे संविधानात अंतर्भुत केली.शिका,संघटीत व्हा व अन्यायाविरुद्ध संघर्ष करा ही त्यांची त्रिसुत्री आहे.
म्हणूनच कवी म्हणतो, “उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे”. बहुजनांचे हित साधणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माझे कोटी कोटी प्रणाम!


 निबंध 3


माझा आवडता समाजसुधारक महात्मा ज्योतिबांं फुले



महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • माझा आवडता समाजसुधारक एकोणिसाव्या शतकातील महात्मा जोतीराव फुले
  • विदयेचे महत्त्व जाणणारा
  • बालपणापासून आईचा वियोग
  • वडिलांचे प्रेम मिळाले
  • समाजातील अनिष्ट प्रथांची जाणीव 
  • कार्याची आखणी 
  • पत्नीचे बहुमोल साहाय्य
  • ज्ञानदान
  • स्त्रियांसाठी शाळा
  • दलितांसाठी हौद
  • शेतकऱ्याचा असूड 
  • सत्यशोधक समाज

"विदयेविना मति गेली। 
मतीविना नीति गेली। 
नीतीविना गति गेली। 
गतीविना वित्त गेले।।
इतके अनर्थ एका अविदयेने केले."

किती मोजक्या शब्दांत जोतीरावांनी येथे विदयेचे महत्त्व सांगितले आहे ! कारण स्वतः त्यांना विदया मिळवायला खुप  कष्ट घ्यावे लागले होते. १८२७ मध्ये  त्यांचा जन्म झाला होता. बालवयातच त्यांची आई देवाघरी गेली आणि आईचे प्रेम त्यांना त्यांच्या वडलांनी, गोविंदरावांनीच दिले. शिकत असतानाच विविध अनुभवांतून जोतीरावांना भोवतालच्या समाजातील अनिष्ट प्रथा लक्षात आल्या.

 मोठ्या कष्टाने त्यांनी इंग्रजी विदया संपादन केली आणि भरपूर वाचन करून ते बहुश्रुत झाले. शिक्षणाचे महत्त्व पटलेल्या जोतीरावांनी १८४८ साली मुलींची पहिली शाळा स्थापन केली. त्यांनी प्रथम आपल्या पत्नीला-सावित्रीबाईंना शिकवले आणि त्यांच्याकडे विद्यार्थिनींच्या अध्यापनाचे काम सोपवले. सावित्रीबाईंची त्यांना जन्मभर साथ मिळाली. 


स्त्रियांच्या शिक्षणाला त्या काळात प्रखर विरोध होता. जोतीरावांना व सावित्रीबाईंना दगडगोटे, शेणमाती यांचा मारा सहन करावा लागला. पण १८४८ साली सुरू केलेले ज्ञानदानाचे कार्य त्यांनी सतत चालू ठेवले. जोतीराव फुले यांना जे वाटले, ते त्यांनी बोलून दाखवले, त्याप्रमाणे कृती केली म्हणून आचार्य अत्रे त्यांचा उल्लेख 'कर्ते सुधारक' असा करतात.



जोतीरावांच्या काळात म्हणजे सुमारे दीडशे वर्षांपूर्वी स्त्रियांची स्थिती अत्यंत दयनीय होती. विशेषतः विधवा स्त्रियांना फार वाईट वागणूक दिली जात असे. त्यांचे केशवपन केले जाई. ही अनिष्ट रूढी बंद पडावी म्हणून जोतीरावांनी न्हाव्यांचाच संप घडवून आणला. त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाची चळवळ उभी केली. तसेच, त्यांनी बालहत्याप्रतिबंधकगृहाची देखील स्थापना केली.



जोतीरावांनी दलित वर्गाचीही दुःखे हलकी करण्याचा यत्न केला. त्यांच्यासाठी आपल्या घरचा पाण्याचा हौद खुला केला. शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीचा अभ्यास करून त्यांची स्थिती सुधारावी म्हणून जोतीरावांनी शेतकऱ्याचा असूड' हे पुस्तक लिहून सरकारला अनेक उपाय सुचवले. 


१८७३ मध्ये फुले यांनी 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली. सर्व धर्मांचे व जातींचे नागरिक या सत्यशोधक समाजाचे सदस्य व्हावेत, अशी त्यांनी योजना केली होती. आपले विचार मांडताना जोतीरावांनी 'अखंड रचले. त्यांत ते आपल्या देशबांधवांना मौलिक संदेश देतात -
जगाच्या कल्याणा। देह कष्टवावा। कारणी लावावा। सत्यासाठी।। असा हा कर्ता सुधारक माझा आवडता आणि आदर्श समाजसुधारक आहे. 

maza avadta samaj sudharak essay in marathi | माझा आवडता समाजसुधारक मराठी निबंध

my sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंध

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी ताई  मराठी निबंध बघणार आहोत. आई वडीलांनतर सांभाळ करणारे, मार्गदर्शन करणारे असतात ते भांवडे. या निबंधात आदर्श अश्‍या मोठ्या बहीणीचे वर्णन केले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.  

तशा आम्ही आईबाबांच्या दोघी लाडक्या लेकी-मोठी ताई आणि धाकटी मी. ताई सुकृता आणि मी संपदा. ताई माझ्याहून चांगली पाच-सहा वर्षांनी मोठी आहे. घरात मी लाडोबा, पण मनात मला ताईबद्दल प्रेमयुक्त आदर वाटत असतो. कारण माझी ताई आहेच तशी नावाप्रमाणे 'सुकृता' ! |

my-sister-essay-in-marathi
my-sister-essay-in-marathi


ताई आणि मी सख्ख्या बहिणी, पण आमच्या दोघींच्या बोलण्याचालण्यात मात्र खूपच फरक आहे. ताई तशी थोडी अबोल आहे. त्याचे कारण तिला विचारले तर ती म्हणते, "मला आपणच बोलत राहण्यापेक्षा, दुसऱ्याचे बोलणे ऐकायलाच अधिक आवडते." याउलट मी खूपच बडबडी आहे. एका जागी बसून एखादे काम करण्याची चिकाटी अजूनही माझ्या अंगी नाही. ताईजवळ ही चिकाटी वाखाणण्यासारखी आहे.

ताईने शाळेतील दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षांत उत्तम यश मिळवले आहे. किंबहुना 'अशक्य', 'असाध्य' हे शब्दच ताईच्या शब्दकोशात (Dictionary) नाहीत. महाविदयालयातील अभ्यासशाखेची निवड करतानाही 'ताई'ने आपल्या स्वतंत्र विचारांची चमक दाखवली. अभ्यास करत असताना छंद म्हणून तिने अनेक अन्य विदेशी भाषांचा अभ्यास चालू ठेवला आहे.

ताई ही काही केवळ पुस्तकातील किडा नाही. तिला अनेक कला अवगत आहेत. सहज गमतीने म्हणून तिने चित्र काढले, तरी ते अत्यंत रेखीव व चित्तवेधक असते. पण हीच ताई मला म्हणते, “संपदा, तुझी चित्रे खुप छान असतात हं!" अशा या प्रेमळ, गुणी, कलासंपन्न ताईचा आदर्श मी सतत माझ्यासमोर ठेवलेला आहे. माझ्या ताईच्या मार्गदर्शनामुळेच आतापर्यंत चौथी, सातवीच्या शिष्यवृत्त्या मी मिळवल्या आहेत.

ताईच्या पावलावर पाऊल ठेवून शालान्त परीक्षेतही गुणवत्ता यादीत येण्याचे माझे एक स्वप्न आहे. माझ्या ताईच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने माझे तेही स्वप्न साकार होईल, याची मला खात्री आहे.
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

my sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंध

karmaveer bhaurao patil essay in marathi | कर्मवीर भाऊराव पाटील मराठी निबंध 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण कर्मवीर भाऊराव पाटील मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधात त्‍यांनी शैक्षणीक क्षेत्रात केलेल्‍या कामगीरी सोबतच त्‍यांच्‍या बद्दल माहीती दिली आहे. चला तर मग सुरू करूया निबंधाला.  

स्वावलंबी शिक्षणाचे उद्गाते : कर्मवीर भाऊराव पाटील 'स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय आणि स्वातंत्र्य' हीच खरी शैक्षणिक तत्त्वज्ञानाची चतु:सूत्री मानणारे 'कर्मवीर भाऊराव पाटील यांना थोर शिक्षणतज्ज्ञच म्हटले पाहिजे. 'कमवा आणि शिका' असा अतिशय सोप्या भाषेत शिक्षणाचे मर्म सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारे कर्मवीर एक श्रेष्ठ समाजसुधारकही आहेत.

karmaveer-bhaurao-patil-essay-in-marathi
karmaveer-bhaurao-patil-essay-in-marathi

कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज गावी २२ सप्टेंबर १८८७ ला  जन्मलेले
हे बालक बालपणापासून हट्टी स्वभावाचे होते. वडील सरकारी नोकरीत, त्यामुळे वडिलांसोबत भाऊरावांच्या पायालाही भिंगरी लागलेली. परंतु भाऊरावांचे मामा हे पैलवान, त्याचा मित्र सत्याप्पा हा तर शूर साहसी अन् त्याबरोबर दयाळू अन् गरिबांचा वाली. तो श्रीमंताकडून मिळालेले पैसे गोरगरिबात वाटून टाकत असे. त्याच्या चातुर्याच्या, हिमतीच्या चांगुलपणाच्या गोष्टींचा प्रभाव भाऊरावांवर चांगलाच होत होता. अन्यायाविरुद्ध बंड करण्याचे बाळकडू त्यांना लहानपणीच सत्याप्याकडून मिळाले होते.

भाऊरावांचे शिक्षण बेताचेच. वसतिगृहात शिकत असताना तेथील नियम हे व्यक्तिस्वातंत्र्याच्या विरुद्ध दिसल्याबरोबर भाऊरावांनी वसतिगृह सोडले. आणि आयुष्याला एक वेगळेच वळण लागले. कुस्ती-मल्लखांब यासारख्या खेळात ते नेहमीआघाडावर असल्यामुळे त्यांना राजर्षी शाहू महाराजांच्या वाड्यात आश्रय मिळाला, शाहू महाराज्याकडून समाजसेवेचा वारसा घेतला. पुढे उद्योगाच्या निमित्ताने ते जेव्हा भारतभर फिरून आले तेव्हा त्यांचा 'शिक्षणाचा पिंड गप्प बसू देईना,' "विचार, आचार, उच्चार' यांचे उगमस्थान म्हणजे खरे शिक्षण, सत्य सामाजिक समता या सर्वांचा संगम त्यांना शिक्षणात दिसला, इतकेच नव्हे तर जनजागृती-समाजक्रांतीसाठीही शिक्षणासारखे दुसरे माध्यम नाही, अशी त्यांची खात्री झाली.

म. फुल्यांचा पाईक बनून दुधगाव येथे शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना केली. पुढे १९१९ मध्ये कराड तालुक्यातील वाले या गावी 'रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. एकूणच शिक्षणासाठी सर्व जीवन वाहून जनसामान्याच्या मुलांसाठी अतोनात कष्ट भाऊरावांनी घेतले. या त्यांच्या शैक्षणिक कार्यात त्यांची पत्नी लक्ष्मीबाईंचा हातभार फार मोठा हाता, कमवा आणि शिका' हा कर्मवीरांचा शिक्षणापाठीमागचा मूलमंत्र तर रयतेला पटवून देण्यासाठी ती स्वावलंबी शिक्षणाची कल्पना प्रत्यक्षात ते जगले. बहुजन समाजाला ज्ञानाची संजीवनी देऊन गरिबांच्या झोपडीपर्यंत ज्ञानगंगा पोहोचण्याचे व्रत त्‍यांनी आयुष्यभर पाळले.

'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।' गीतेतील या महान संदेशानुसार कर्मावर त्यांचा गाढा विश्वास होता, कोणतेही काम किंवा श्रम हे हलके नसते. काम म्हणजे ईश्वर त्याच श्रमाला प्रतिष्ठा देण्याचे कार्य, पावित्र्य देण्याचे काम, स्वावलंबनाचा आनंद लुटू देण्याचे महान श्रेय कर्मवीरांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानातून दिसून येते.
रयतेच्या शिक्षणाबरोबरच समाजपरिवर्तनही घडवून आणण्याचा वारसा कर्मवीरांनी म. फुले, शाहू महाराज विठ्ठल रामजी शिंदे, संत गाडगेमहाराज यांच्यापासून घेतला होता. 

शिक्षणाच्या गंगोत्रीतून दारिद्रय, अंधश्रद्धा, लोकभ्रम, अज्ञान अशा अनेक महासंकटातून सुटण्यासाठी अनेक समाजोद्धारक उपक्रम राबविले. एक कर्तव्यनिष्ठ शिक्षक हाच संपूर्ण समाज बदलू शकतो. लहान मुले हीच देशाचे भविष्य घडविणारे असतात. तेव्हा शिक्षणातून देशप्रेम, स्वावलंबन, अन्यायाची चीड, श्रमाची प्रतिष्ठा अशा सद्गुणांते बाळकडू जर त्यांना पाजले गेले तर निश्चित देशाचा विकास हा घडेल. शिक्षण हेच माणसाच्या पर्यायाने देशाच्या विकासाचे मूळ आहे, हीच त्यांची पक्की विचारसरणी होती.


कर्मवीरांच्या कार्याचा प्रसार, त्यांच्या कार्याची पाऊले,खुणा, त्यांच्या स्मृती आठवणी म्हणून सांगलीतील 'दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ' नावाची मोठी संस्था, साताऱ्यातील 'छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस' तर बोधचिन्ह वटवृक्षा' सह आजही दिमाखात उभे आहे. वसतिगृहातून भेदभाव नष्ट करणे, अस्पृश्यांना न्याय मिळवून देणे, सामाजिक समता प्रस्थापित करणे, सर्व जाती-धर्माचे सर्व थरातील विद्यार्थी एकत्र राहणार... त्यांचा समन्वय घडवून आणणार. या त्यांच्या असामान्य कार्याची सर्वांनी मुक्तकंठाने स्तुती केली.

या महापुरुषाचे महानिर्वाण १९५९ झाले. परंतु मित्रहो, संपूर्ण महाराष्ट्रभर अनेकानेक, प्राथमिक, पूर्व प्राथमिक, माध्यमिक, अध्यापन विद्यालये, महाविद्यालये, वसतिगृह, कार्यालये आणि इतर अनेक शिक्षण संस्था आज कर्मवीरांच्या त्या विशाल वटवृक्षाखाली गुण्यागोविंदाने नांदत आहेत, त्या अमर आहेत.
आपण सामान्यांनी या महापुरुषाचे किती सन्मान करायचे ? अनेक सामाजिक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे. भारत सरकारने पद्मभूषण हा किताब देऊन सर्वोच्च सन्मान केला आहे.

महाराष्ट्राचा 'बुकर टी. वॉशिंग्टन' या नावाने त्यांना ओळखतात. यशवंतराव चव्हाण त्यांच्याविषयी म्हणतात, 'कर्मवीर' हीच महान संस्था, बहुजन समाजाचा ज्ञानप्रकाश, रयत शिक्षण संस्था ही शिक्षणाची गंगोत्री आहे.
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

karmaveer bhaurao patil essay in marathi | कर्मवीर भाऊराव पाटील मराठी निबंध

 aarsa nasta tar marathi nibandh | आरसा नसता तर मराठी निबंध

निबंध 1 
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण aarsa nasta tar marathi nibandh बघणार आहोत. हा एक कल्‍पनात्‍मक निबंध आहेत त्‍यामुळे आरसा नसता तर काय झाले असते याचे वर्णन खालील 5 निबंधामध्‍ये तुम्‍हाला दिसुन येईल चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

आजच्या युगात माणसाला ज्या गोष्टी अनिवार्य वाटतात; त्यांपैकी एक म्हणजे 'आरसा.' घरातून बाहेर पडताना लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकजण आरशात डोकावल्याशिवाय राहत नाही. शहरांमधून ऑफिसात  काम करणाऱ्या तसेच कॉलेजांत शिकणाऱ्या मुलींच्या पर्सेसमध्ये 'आरसा' आढळतोच. रस्त्यावरून जाणारा कॉलेज युवक एखादया मोटारच्या आरशात डोकावून आपले केस ठाकठीक असल्याची खातरजमा करून घेतो. सांगायचा हेतू काय की, प्रत्येकाला आपली छबी वारंवार पाहण्याची हौस असते आणि त्यामुळे आरसा ही आज आवश्यक गोष्ट झाली आहे.

aarsa-nasta-tar-marathi-nibandh
aarsa-nasta-tar-marathi-nibandh


आरसा नसता तर माणसाची मोठी गैरसोय झाली असती. स्वत:चे रंगरूप माणूस जाणू शकला नसता आणि मग स्वत:चीच तोंडओळख त्याला पटली नसती. परीक्षेत आपणाला लाभलेल्या यशाचा आनंद आपल्याला आरसा दाखवतो. आपल्या आवडत्या माणसाची दीर्घकालानंतर झालेली आतुरतेची भेट आरसा खुलवतो आणि एखादया दुःखद प्रसंगी सगळ्यांच्या नजरा चुकवून आपल्या डोळ्यांनी गाळलेले अश्रू हाच आरसा टिपून घेतो. आरसा हा माणसाचा फार जवळचा मित्र आहे.

आरशाला संस्कृतमध्ये आदर्श' म्हणतात. रूप जसे असेल तसेच आरसा दाखवतो. तो कुरूपाला सुंदर बनवू शकत नाही. म्हणजे आरसा हा 'प्रामाणिकपणाचा आदर्श' आहे. म्हणून तर आपण आरशाची उपमा देऊन म्हणतो, त्याचे मन आरशासारखे नितळ आहे. आरसा नसता तर सुंदर माणसांना आपल्या सौंदर्याची अवास्तव जाणीव झाली नसती आणि त्यामुळे कुरूप माणसांना वाईट वाटले नसते. 

केशकर्तनालये, फोटो स्टुडिओ  अशा अनेक ठिकाणी आरसे मोठी कामगिरी बजावतात. आरसा नसता तर अनेक ठिकाणी सजावटीचे काम अपूर्ण राहिले असते. अनेक वैज्ञानिक प्रयोगांत आरशाला स्थान असते. आरसा नसेल तर ते प्रयोग अपूर्ण राहतील. अंतर्गोल भिंग-बहिर्गोल भिंग असलेले आरसे माणसांना हसवतात व ते मोटारींनाही उपयोगी पडतात. गावातील जत्रांत आरशांना महत्त्वाचे स्थान असते. आरसा नसेल तर ही सारी गंमत हरवून जाईल. तेव्हा असा हा बहुगुणी आरसा हवा आणि हवाच!

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

aarsa nasta tar essay in marathi language

निबंध 2
रोज आपण अशा अनेक गोष्टींचा वापर करत असतो की, त्यांचे अस्तित्वही आपण विसरलेले असतो. म्हणतात ना - अतिपरिचयात् अवज्ञा. (अति परिचयाच्या गोष्टीला किंमत न देणे ) तशी स्थिती आहे आपली आरशाच्या बाबतीत. अगदी सहजगत्या जातायेता आपण आरशात डोकावतो आणि आपण ठाकठीक आहोत ना याची खात्री करून घेतो. असा हा आरसा प्रत्येक घरात असतोच असतो. कधी तो एखादया भिंतीवर लटकत असतो, तर कधी एखादया मोठ्या कपाटाच्या दारावर, कधी एखादया सुंदरीच्या पर्समध्ये असतो, तर कधी एखादया मोठ्या दिवाणखान्याच्या दाराशी स्थानापन्न होऊन तो येणाऱ्या-जाणाऱ्याला त्याची छबी दाखवत असतो.

असा हा आरसा नसता तर - ? तर माणसाने आपली छबी कोठे पाहिली असती? एखादया मुलाखतीला जाताना, एखादया समारंभासाठी नटताना, माणूस पुनः पुन्हा आरशात डोकावतो आणि त्या आरशाला विचारतो- 'सांग दर्पणा, कसा मी दिसतो?' पण हा आरसा मात्र बेटा खरा प्रामाणिक ! उगाच नाही त्याला संस्कृतमध्ये 'आदर्श' म्हणतात. तुम्ही जसे आहात तसेच तुम्ही आरशात दिसणार. आरसा तुम्हांला सुंदरही बनवत नाही वा तुमच्या कुरूपतेतही भर घालत नाही. म्हणून तर आरशाचा आदर्श व्यक्तीपुढे ठेवला जातो. कसे बना? कसे असा? - तर आरशासारखे स्वच्छ चारित्र्य असलेले.

आरसा हा माणसाला पुराणकालापासून परिचयाचा आहे. रामायणातील रडणाऱ्या रामाला आरशात चंद्र दाखवून मंत्री सुमंताने त्याची समजूत काढली होती. इतिहासकालातही हा आरसा आपल्याला भेटतो. चितोडच्या महाराणी पद्मिनीचे सौंदर्य अल्लाउद्दीनने आरशातच पाहिले होते. मोगल साम्राज्यातील 'आरसे-महाला'चे वर्णन आपण ऐकलेले आहे. त्या काळात घर, महाल, प्रासाद यांना सजवण्यात आरशांचे स्थान महत्त्वाचे होते.

आजच्या विज्ञानयुगातही माणसाला आरशाची मदत अनेक ठिकाणी घ्यावी लागते. भौतिकशास्त्रात प्रकाशाचे नियम हे आरशाच्या साहाय्यानेच समजून घेतले जातात. अनेक वस्तू निर्माण करताना आरशांचा उपयोग होतो. मग एखादया आरशात आपण गोलमटोल होतो, नाहीतर एखादया आरशात आपण उंचचउंच झालेलो असतो. ही गंमत सोडली तरी, वाहन चालवताना-- मग गाडी असो वा बाईक - आरसा आपल्याला आपल्यामागून येणाऱ्या वाहनाची कल्पना देत असतो. हा आरसा नसेल तर चालकाचा फार गोंधळ उडेल. अभिनय करणारे कलावंत आरशात पाहून सराव करतात म्हणे... !
असा हा आरसा नसेल तर माणसाची अशी अनेक प्रकारे गैरसोय होईल. मग तो आरशाची जागा कोण घेऊ शकेल याचा शोध घेऊ लागेल.

निबंध 3  

आरसा बाजूला सारून कधी पाहिलंय का कुणी? आपल्या रोजच्या जीवनात इतकी महत्त्वाची जागा अडवून बसलाय हा की आपण तो नसता तर! यावर विचारच करीत नाही. आपण आरशात पाहतो ते आपलं रूप बघण्यासाठी. आपल्या प्रसाधनात आरसा नाही म्हणजे जणू डोळ्याविना चेहरा! लोकांनी आपल्याकडे पहावं यासाठी स्वत:ला खुलविण्यासाठी आपण आरशात पाहतो. कारण आजच्या युगात माणूस अंतरंगापेक्षा बाह्यरंगाकडे अधिक लक्ष देतो.

ह्या आरशाचा शोध तरी केव्हा लागला? जेव्हा मानव उत्क्रांतीच्या पहिल्या पायरीवर उभा होता, तेव्हा त्याच्याजवळ अन्न होते, ना वस्त्र, ना निवारा, मग प्रसाधनाची तर बातच सोडा. पण एक मात्र निश्चित की प्रतिबिंब ही गोष्ट मानवाला पहिल्यांदा पाण्यामुळे माहिती झाली असणार. म्हणजेच पाण्यामुळे काचेचा व काचेतून आरसा जन्मला असणार ! 

या आरशानं काहीवेळा प्रताप घडवून आणलेत, तर कधी मदतही केली आहे. अहो, हा नसता तर, बाल श्रीरामाचा चंद्राचा हट्ट सुमंत पुरविता नाकीनऊ आले असते. हा नसता तर महाराणी पद्मिनीच्या सौंदर्याला कुणी वाचवलं असतं ? तिने आपलं प्रतिबिंब अल्लाऊद्दिनाला दाखवून स्वत:ची सुटका करून घेतली. हा नसता तर गॅलिलिओला ग्रीसची लढाई जिंकताच आली नसती! प्रत्यक्ष दर्शन न देता प्रतिबिंबाच्या रूपाने दर्शन घडवून संतुष्ट करणारा हा आरसा खूपच उपयोगी पडला.

असा हा आरसा नसता तर कुरूप लोकांच्या दृष्टीने फायदाच झाला असता. त्यांची दु:खे तरी कमी झाली असती. परंतु स्त्रिया, तरुण मुले, मुली, चित्रतारका यांची खूपच पंचाईत झाली असती. आरसाच नाही. मग नटणार कसे ? सतत दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागले असते. दिवसातून, दर पाच मिनिटांनी सांग दर्पणा, मी कशी दिसते?' असं गुणगुणत आरशात पाहणाऱ्या ललनांची खूपच पंचाईत झाली असती. आरसा नसता तर न्हाव्याच्या हातात डोकं देऊन हजामत करायला कुणाची छाती झाली असती?

आरसा नसता तर केवळ तरूण-तरूणींचीच नव्हे तर शास्त्रज्ञांचीही पंचाईत झाली असती. अहो, आरशामुळेच प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमांचा शोध लागला. आरसाच नसता तर गुणितप्रतिमा मिळाल्या असत्या का?
असो! आरसा नसता तर घडामोडी घडल्या असत्या. पण मग यावर उपायही शोधावा लागला असता. आरसा नसता तर प्रत्येकाने आपली छबी आपल्या आवडत्या माणसाच्या डोळ्यात पाहिली असती कारण 'डोळा हा माणसाच्या  मनाचा आरसा आहे!' पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 4 

aarsa nasta tar marathi nibandh | आरसा नसता तर मराठी निबंध


काचेचा शोध म्हणजे मानवाच्या प्रगल्भ
बुद्धिमत्तेचा एक आविष्कार ! काचेच्या शोधामुळे सुधारणेची अनेक दालने खुली झाली. मूलभूत गरजांच्या शोधयात्रेत स्वत:च्या प्रतिबिंबाचाही शोध लागला. पाण्यात डोकावताना प्रतिबिंब दिसले व काचेच्या शोधातून आरशाचा जन्म झाला.


आरसा माणसाचा जीवनसाथी! घरात त्याचे स्थान अगदी महत्त्वाच्या जागी असते. स्वत:चे प्रतिबिंब पाहिल्याशिवाय माणसाची दैनंदिनी सुरूच होत नाही; आणि हा आरसाच नसता तर... 'डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे।' म्हणजे दुसऱ्यांच्या डोळ्यांत बघून आपले प्रतिबिंब शोधावे लागले असते.


प्राचीनकाळी राजेलोकांना
आपल्या रूपवती राण्यांसाठी 'आरसेमहाल' उभारताच आले नसते. सुमंतांना बाल प्रभुरामचंद्रांचा 'चंद्र' पाहण्याचा हट्ट पुरा करताच आला नसता. आरसा नसता तर अल्लाउद्दीन खिलजीला लावण्यवती पद्मिनीचे दर्शन झालेच नसते. 


शहाजहान बादशहा लाल किल्ल्यात कैदेत असताना 'ताजमहाल'चे प्रतिबिंब आरशात पाहून समाधान मानीत असे. आपल्या निर्मितीचे दर्शन तो आरशातून घेई; आरसा नसता तर त्याचे उर्वरित आयुष्य कंटाळवाणे झाले असते.


आधुनिक काळात सुंदर-सुंदर डिझाईनची ड्रेसिंग टेबले आणि आकर्षक गोदरेजची कपाटे, निरनिराळ्या आकाराचे आरसे घेण्याचा ललनांनी हट्ट केलाच नसता. आजकाल स्त्रियांच्या पर्समध्येसुद्धा आरशाने स्थान मिळविले आहे. मग 'सांग दर्पणा कशी मी दिसते?' असे आरशाशी हितगुज करणाऱ्या तरुणींच्या ओठी हे गाणे आलेच नसते. 


अहो, रामप्रहरी स्नान वैगेरे करून 'सौभाग्यलेणे - कुंकुमतिलक लावण्याचीदेखील पंचाईत झाली असती.
भिंग बिलोरी सहा बाजूंनी बांधून आरसेमहाल असला, उभे राहूनी मध्ये पहावे,
रूप आपुले छंद मनाला॥



हा छंद कसा पुरा करता आला असता? लमाणी बायकांना आपल्या काचोळ्यांना लावण्यासाठी आरसे मिळालेच नसते. अहो, पुरुषांचे तरी आरशावाचून कुठे चालते? रोजच्या दाढीची गैरसोय तर झालीच असती; पण न्हाव्याच्या मर्जीनुसार केस कापून घ्यावे लागले असते. 


वाहनचालकाच्या बाजूला बहिर्वक्र आरसा नसता तर मागून भरघाव वेगाने येणारी वाहने चालकांना दिसलीच नसती, मग अपघातांचे प्रमाण वाढले असते. हल्ली पंचतारांकित हॉटेल्स, मोठमोठ्या शोरूम्स, दुकाने जी काही आरशांनी सजवलेली असतात, त्यांना आरसे नसते तर अवकळा आली असती.



आरसा नसता तर शास्त्रज्ञांचे थोडे का अडले असते? आरसा नसता तर गुणित प्रतिमा मिळविता आल्या नसत्या. प्रयोगशाळेत तर आरशावाचून फारच अडले असते. नवीन नवीन उपकरणे निर्माण करताच आली नसती. पाणबुड्यांना पाण्यावरील शत्रूची जहाजे दिसलीच नसती.



आरसेच नसते तर दुर्बिणीचा शोध तरी कसा लागला असता? सोलर एनर्जीवर चालणारी उपकरणे तयार करता आली नसती. अर्थात आरसा नसता तर कुरूप व्यक्तींना आपल्या कुरूपतेची जाणीव झाली नसती, हा एक फायदाच झाला असता. पण माणूस काही स्वस्थ बसणारा प्राणी नाही. 


तो अंतर्मनाच्या आरशात डोकावून पाहील. अंतर्मुख होऊन आरशाला पर्याय शोधील. तो जीवनाचा (पाण्याचा) तळ शोधेल व तेथे आपले प्रतिबिंब स्थिर करता येईल का याचा विचार करील. अंधारातून चालताना तो आपल्या बुद्धीचा किरण पाडून प्रकाशाचा शोध घेईल.  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 5

aarsa nasta tar marathi nibandh | आरसा नसता तर मराठी निबंध

 

आरसा नसता तर रजपुतांच्या इतिहासातला प्रसंग. राणी पद्मिनीला पाहण्यासाठी अल्लाउद्दीन खिलजी वेडा झाला होता. त्याकाळी रजपूत रमणी परपुरुषापुढे येत नसे. त्यातून हा शत्रू. त्यावेळी आरसा त्याच्या मदतीला आला.
आरशात पधिनीची मोहक छबी पाहून तो परतला. 


त्यावेळी तरी आरशाने तिला कठीण प्रसंगातून निभावून नेले. दशरथाचा राजमहाल. चिमुकला राम आभाळातला चंद्र हवा असा हट्ट घेऊन बसला. सगळ्यांनी नानापरीने त्याची समजूत घातली. पण तो काही केल्या ऐकेना. 


शेवटी चतुर अशा सुमंताने आरसा आणला व त्या आरशात रामाला बंद दाखविला. इतका वेळ रडणारा तो बाळ श्रीराम खुदकन हसला. ही आरशाची किमया.. आरसा ही दैनंदिन जीवनात गरजेची वस्तू आहे. आरसा नसता तर लग्न-समारंभात आकर्षक वेषभूषा, केशभूषा करणाऱ्या वधूचे काय झाले असते? 


लग्नसमारंभात वधू ही उत्सवमूर्ती. तेव्हा तिचे प्रसाधन आरशावाचून होऊच शकले नसते. तिच्या जोडीला तिच्या मैत्रिणी, घरातील स्त्रिया आणि पुरुषसुद्धा आपला जामानिमा नीटनेटका आहे ना हे कसे पाह शकले असते?
घरात छोट्या बेबीचा किंवा बाळाचा वाढदिवस आहे. 


त्याला नवे सुंदर कपडे घातल्यावर आपण आधी आरशापुढे उभे करतो. त्यात स्वत:ची सजलेली प्रतिमा पाहून ते मूलही खूष होते. आरशाविना त्याचा हा आनंद पूर्ण झाला नसता. पूर्वी आरसा हा स्त्रिया, मुलींचाच लाडका सखा होता. आज मुलांनाही तो तितकाच प्रिय आहे.


शाळेत, घरात, स्टेशनवर, हॉटेलात, रेल्वेत सर्वत्र आरसे असतात. तसे नसते तर आरशात पाहून भांग पडणे, प्रसाधन करणे, नव्हे गाण्याच्या तालावर नाचणे कसे शक्य झाले असते ? त्यातून तारुण्यात नुकतेच पदार्पण केलेल्या युवक-युवतींचे विचारूच नका. 

घरातला आरसा त्यांना पुरत नाही. म्हणून बरेचदा खिशात, पर्समध्येसुद्धा छोटा आरसा बाळगला जातो. आरसा नसता तर त्यांच्या या आनंदात नक्कीच विरजण पडले असते. कुणी म्हणतील, पूर्वी कुठे आरसे होते? तलावाचे पाणी, नदीचे पाणी यात प्रतिबिंब पाहिले जात असे. पण सगळीकडेच कुठे तलाव,


नद्या असणार? शिवाय गढूळ
पाण्यात प्रतिबिंब कसे दिसेल? आजकाल घरात कपाट घेताना आरसा आधी पाहिला जातो. लग्नात, इतरप्रसंगी भेट देण्यासाठी आरसा वापरला जातो. 


तेव्हा आरशाचा उपयोग निर्विवाद आहे.सारांश, आरसा हा माणसांचा लाडका मित्र आहे. तो नसता तर बाळांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचे विविध प्रकारचे आनंद त्यांना उपभोगता आले नसते. म्हणून आरसा हवाच. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.  धन्‍यवाद


aarsa nasta tar marathi nibandh | आरसा नसता तर मराठी निबंध

essay on trees our best friend in marathi | वृक्ष आपले मित्र मराठी निबंध



नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वृक्ष आपले मित्र मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. या निबंधात मानवाला जिवन जगण्‍यासाठी वृक्ष किती उपयोगी आहेत याचे महत्‍व पटवुन सांंगीतले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

वृक्षांची महती आपल्या भारतात प्राचीन काळापासून सांगीतली  गेली आहे. तुकाराम महाराजांना तर वृक्ष हे आपले सगेसोयरे वाटतात. असे हे वृक्ष आज या आधुनिक विज्ञानयुगातही- आपले जिवलग मित्र आहेत.

विज्ञानामुळे माणसाने खूप प्रगती केली पण या विकासासाठी माणसाने अविचाराने जंगलतोड केली. आपण आपल्या या वृक्षमित्राचा घात केल्याने स्वत:वरच दुष्काळाचे, प्रदूषणाचे संकट ओढवून घेत आहोत, याचा माणसाला विसर पडलेला आहे. वृक्ष ही निसर्गाची फुप्फुसे आहेत. हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि 'प्राणवायू' हवेत सोडून हवा शुद्ध करण्याचे काम करतात. यामुळे माणसाचे जगणे सुकर व सुखी झाले आहे.

essay-on-trees-our-best-friend-in-marathi
essay-on-trees-our-best-friend-in-marathi

वृक्ष आपल्याला सहस्र हातांनी मदत करतात. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा तर ते भागवतातच; शिवाय आपल्या पूजाविधीसाठी नानाविध साहित्य देऊन आपल्याला सुखावतात. आज वनस्पतींपासून मिळालेल्या अनेक औषधींचा उपयोग करून माणसाने असाध्य आजारांवर मात केली आहे.

स्वतः जळून हे वृक्ष इतरांच्या उपयोगी पडतात. वृक्षाचा प्रत्येक अवयव माणूस, प्राणी, पक्षी यांना उपयुक्त आहे. वृक्षांजवळ भेदभाव नसतो. ते सर्वांना समान वागणूक देतात. अगदी त्याच्या अंगावर घाव घालणाऱ्या कुन्हाडीचे पातेही तो सुगंधित करतो. मानवाच्या एकाकी जीवनातही वृक्ष साथसंगत देतात. माणूस आपल्या अनेक आठवणी या वृक्षांशी जपून ठेवतो. तो त्यांच्याशी हितगूज करतो. असे हे वृक्ष मानवाचे जिवलग मित्र आहेत.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व वृक्षारोपण करण्‍यासाठी आणखी काय उपाय योजना करायला पाहीजे हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 2 

 वृक्ष आपले मित्र मराठी निबंध | essay on trees our best friend in marathi 


“आजी, घरी एकट्याच राहता?' 'एकटी का? ही झाडं आहेत की सोबतीला.' मी फाटकाजवळ आल्यावर समोरच अंगणात उगवलेली मोठी मोठी गुलाबाची फुले डोकावून बघतात व सांगतात, या आजी, आम्ही केव्हाची वाट पहातोय. बांधाच्या शेजारच्या फुललेला कुंद अंगावरच्या कळ्या सावरत होकारार्थी हसतो.



'एकटी कशी मी? अगं ती तुळस बघितलीस का? कशी छान डंवरली आहे. मंजिऱ्यांनी गच्च भरून गेली आहे. 'मला मंजिऱ्यांचा भार सहन होत नाही, थोडा कत्री करा,' असे सांगते आहे.



उजव्या हातची माझी राजसबाळी बघितलीत का? माझी राजसबाळी 'केळ' आहे हो. सध्या ओली बाळंतीण आहे. पाहिलीत तिची छोटी छोटी बाळं. आईच्या कुशीत पानांचं मोठं पांघरुण घेऊन कशी शांत झोपली आहेत ती. मी रोज माझ्या बाळीच्या अंगावरून हात फिरवते. तिला चांगलं-चुंगलं खाऊ घालते. बाळंतपणाला आलेली माझी लेक आहे ती.


पाठीमागच्या अंगणात उभा असलेला व्रात्य आंबा बघितलात का? वारा सुटल्यावर असा नाचतो. त्याची मुलंही तशीच नाचरी. लहानपणापासूनच आपल्या आईवडिलांना सोडून पटापट जमिनीवर उड्या मारतात. त्यांना आवरता आवरता नाकी नऊ येतात माझ्या, पण त्याची बाळं मोठी झाली, वयात आली की, किती गोंडस दिसतात म्हणून सांगू?


आंब्याच्या मागे सर्वांना आवडणारा शेवगा, मला तर तो गोड शेंगा देतोच. परंतु अंगाखांद्यावर मर्कटराजांनाही मनमराट खेळू देतो. पहाटे मला जाग येते ती प्राजक्ताच्या व बकुळीच्या फुलांच्या मंद सुगंधाने. सूर्य उगवल्याबरोबर ती नाजूक, कोमल अंत:करणाची प्राजक्ताची फुले मी वेचते व छाया गर्द सुरेख, गार हिरवी शोभे तुझी पालवी। 



सो सो गर्जत वाहुनी गदगदा वारा तुला हालवी। छोटे गोंडस, पांढरे सुम तुझे हंगू किती मी तया। छोट्या, सुंदर पाकळ्या कितीतरी, येती न मोजावया॥ अशा कवितेच्या ओळी गुणगुणत मी बकुळीची फुले वेचते.


रस्त्याच्या कडेला फणस कटिखांद्यावर बाळे घेऊन उभा असतोच. त्याच्या मुलाबाळांची मी चौकशी करते. माझीही मुले खुशाल आहेत असे त्याला सांगते. तोही हसून आपल्या काटेरी बाळाला माझ्याशी गुजगोष्टी करायला पाठवून देतो. डाव्या हातचा चाफा मात्र फारच रागीट. 



कधी रुसेल व कधी हसेल सांगता येत नाही. रागावला की, आपल्या अंगावरची सगळी पानांची वस्त्रे काढून टाकतो व खुलला की चाफा फुलांनी भरून जातो. माझे भलेभक्कम सोबती म्हणजे आमचे नारळराव. असे उंच वाढलेत की, आल्यागेल्यावर करडी नजर ठेवून पहारा देत असतात. 


शरीर थोडे रस्त्याकडे झुकलेलेच, 'माझ्या सावलीत येऊन बस ना,' असा सारखा लाडिक हट्ट करीत असतात.
एवढे सत्पुरुष माझे सखेसोबती असताना मी एकटी कशी? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



essay on trees our best friend in marathi | वृक्ष आपले मित्र मराठी निबंध

maza avadta kalakar marathi essay | माझा आवडता कलाकार मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण maza avadta kalakar marathi essay बघणार आहोत. प्रत्‍येकाला कोणत्‍यातरी कलेमध्‍ये रस असतो मला गायनात आहे त्‍यामुळे माझ्या आवडत्‍या कलाकार आहेत लता दीदी चला तर जाणुन घेऊया त्‍यांच्‍याविषयी माहीती.

ग्रीष्म ऋतूतील ती संध्याकाळ होती. सूर्यदेव अस्ताला गेले होते. तरीपण त्यांच्या कठोर कर्तबगारीची चुणूक अजून जाणवत होती. एक सभा गेले दोन तास रंगली होती. लतादीदी रंगमंचावर उपस्थित होत्या. सभा संपत आली तेव्हा सर्वांनी दीदींना गाणे म्हणण्याचा आग्रह केला. लोकाग्रहाखातर दीदींनी सूर लावला, कोणतेही वादय साथीला नसताना 'मोगरा फुलला' हा अभंग लतादीदी गाऊ लागल्या नि वातावरणातील दाहकता अचानक लुप्त झाली. सर्वत्र प्रसन्न समाधानी वातावरण निर्माण झाले आणि याच वातावरणात सभा संपली. हे सामर्थ्य असलेल्या कलावती लता मंगेशकर आज साऱ्या विश्वात विख्यात आहेत. त्याच लतादीदी माझ्या आवडत्या कलावंत आहेत.

maza-avadta-kalakar-marathi-essay
maza-avadta-kalakar-marathi-essay

भारत सरकारने लतादीदींना 'भारतरत्न' हा किताब दिला,
तेव्हा मनात आले की या उपाधीने त्यांचा गौरव झाला की त्यांच्यामुळे प्रत्यक्ष या उपाधीची झळाळी वाढली. लता मंगेशकर यांना आजवर राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर 'स्वरभारती', 'कलाप्रवीण', 'सूर श्री', 'स्वरलता' व 'डी. लिट.' असे अनेक बहुमान प्राप्त झाले आहेत. पण या यशामागे पर्वतासारखे परिश्रम आहेत. यशाचा मार्ग हा काट्याकुट्यांतून जातो. अनेक कसोट्यांतून उतरल्यावरच सुवर्णाचे तेज झळाळते.

 आज साऱ्या  मर्यादा ओलांडून लतादीदी या कोट्यवधी जनतेच्या मनावर अधिराज्य करत आहेत. संगीताच्या क्षेत्रात त्यांचे स्थान सर्वोत्कृष्ट व सर्वमान्य आहे.  अनेक ख्यातनाम संगीतकारांची १८०० च्या वर चित्रपटांतील विविध रंगढंगांची सुमारे बावीस भाषांतील गाणी लतादीदींनी गायली असून त्यांची संख्या सुमारे पंचवीस ते तीस हजारांच्या घरात सहज जाते.

लतादीदींच्या स्वर्गीय मधुर आवाजाने असंख्य गाणी चिरंजीव झाली आहेत. मराठी माणसाच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर दीदींच्या आवाजातील ओळी आपल्याला साथ देत असतात. 'आनंदघन' या नावाने त्यांनी संगीत-दिग्दर्शनही केले. त्यांनी गायलेले 'ए मेरे वतन के लोगों' हे गीत आजही भारतीयांचे डोळे ओले करते.

अगदी लहान वयात दीदींनी आपल्या बाबांबरोबर नारदाची भूमिका केली होती. 'सौभद्र', 'भावबंधन' अशा नाटकांतूनही त्यांनी कामे केली. 'गजाभाऊ' व 'पहिली मंगळागौर' अशा काही मराठी चित्रपटांतूनही छोट्या भूमिका केल्या. कारण साऱ्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती.

लतादीदींच्या  सुरेल, मुलायम व परिपूर्ण अशा स्वरांनी लक्षावधी श्रोत्यांना सुरांची माधुरी व सौंदर्य प्रत्ययास आणून दिले. त्यांच्या आवाजाच्या उंच खोलीमुळे, लवचिकतेमुळे, अलौकिक फिरतीमळे चित्रपट संगीतकारांना नवनवीन प्रयोग करणे शक्य झाले. 'तीन मिनिटांच्या तबकडीतून लोकांपर्यंत संगीत पोचवण्याचे अवघड काम लताने केले,' असा त्यांचा गौरव प्रत्यक्ष कुमार गंधर्वांनी केला आहे.

आपल्या भावंडांसाठी, आपल्या कुटुंबासाठी लतादीदींनी जे अतोनात श्रम केले, त्यांची आठवण आजही त्यांना, त्यांच्या भावंडांना व्यथित करते. अत्युच्च पदावर पोचूनही या थोर कलावतीने विनम्रपणा सोडला नाही. आपली सामाजिक जबाबदारीही ती विसरली नाही. पुण्याचे 'दीनानाथ मंगेशकर रुग्णालय' हे त्याचेच द्योतक आहे. या एवढ्या यशस्वी जीवनातही शास्त्रीय संगीताला आणि आपल्या इतर छंदांना आपण पुरेसा वेळ देऊ शकलो नाही, ही खंत दीदींना आहे. अशी ही गानकोकिळा भारतवर्षाचे अक्षय वैभव आहे.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

maza avadta kalakar marathi essay | माझा आवडता कलाकार मराठी निबंध

maza avadta prani essay in marathi | माझा आवडता प्राणी मराठी निबंध

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण maza avadta prani essay in marathi निबंध बघणार आहोत. आपल्‍या अवतीभोवती आपल्‍याला गाय म्‍हैस, मांजर,कुत्रा यासारखे प्राणी दिसुन येतात, प्रत्‍येक लोकांना वेगवेगळे प्राणी आवडतात परंतु मला कुत्रा आवडतो. म्‍हणुन मी या विषयावर 2  सुंदर निबंध लिहीले आहेत चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 

माझ्या बाबांना कुत्रा हा प्राणी खूप प्रिय आहे. त्यामुळे आमच्या घरात नेहमी एक-दोन कुत्री पाळलेली असतात. त्यांपैकी एक म्हणजे आमची गोल्डी. मी दुसरीत असताना बाबांनी हे पिलू विकत आणले. त्यामुळे ते माझ्याबरोबरच मोठे झाले आणि माझी खास मैत्रीण बनले. ही कुत्री आहे आणि ती खास लॅब्रेडॉर जातीची आहे. तिला विकणाऱ्याने तिच्या घराण्याचा सर्व इतिहास व तिची माहिती दिली होती. आमच्या घरी आली, तेव्हा ती फक्त सहा आठवड्यांची होती. पांढरा, सोनेरी असा लोकरीचा गुबगुबीत गुंडा! आजीने तिच्या रंगावरून तिचे गोल्डी' नाव ठेवले.


maza-avadta-prani-essay-in-marathi
maza-avadta-prani-essay-in-marathi

पाहता पाहता गोल्डी मोठी झाली. आमच्याकडे येणारे लोक तिचा आकार पाहूनच घाबरतात. ती पूर्ण शाकाहारी आहे. टोमॅटो, काकडी, बटाटे तिला प्रिय. लपवलेली वस्तू शोधून काढण्याचा खेळ तिला आवडतो. ती सर्वांना 'शेक हॅन्ड' करते. गाडीत बसून फिरायला जाताना ती फार खूश असते. गोल्डी अतिशय स्वच्छताप्रिय आहे. ती अतिशय प्रेमळ आहे. त्यामुळे नंतर आमच्या घरी आणलेल्या इतर कुत्र्यांवरही ती प्रेम करते. आता ती वृद्ध झाली आहे, पण तिचा रुबाब तसाच टिकून आहे.

तर हा होता आमच्‍या लाडक्‍या गोल्‍डीचा निबंध हा तुम्‍हाला कसा वाटला ते तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . व खालील दुसरा निबंध वाचायला विसरू नका धन्‍यवाद .

निबंध 2

maza avadta prani marathi nibandh

माझा आवडता पाळीव प्राणी आम्ही आमच्या कुत्र्याला 'बॉबी' म्हणतो. कोणताही मानवी संरक्षक रक्षण करणार नाही, एवढे बॉबी आमच्या घराचे रक्षण करतो. हे घर आमचे नसून त्याचेच असावे अशा रुबाबात तो आपल्या गोंडेदार शेपटीसह साऱ्या बंगल्यात वावरत असतो. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचा भाव जण सांगत असतो की, 'माझ्याच कृपेने तुम्ही या घरात वास्तव्य करत आहात हं!'

आठ वर्षांपूर्वी बॉबी आमच्या घरात आला तेव्हा तो इतका गुबगुबीत होता की, मऊ मऊ लोकरीचा एक गुंडाच भासत असे. छोटा बॉबी दुधाशिवाय दुसरे काहीही खात नसे आणि लुटूलुटू चालणाऱ्या त्याला धड जिनाही चढता येत नसे. तोच बॉबी आता अवाढव्य झाला आहे. त्याचा भव्य देह, काळेभोर पाणीदार डोळे आणि त्याचा प्रचंड आवाज यांमुळे कोणीही परका माणूस घरात शिरण्याचा चुकूनसुद्धा विचार करत नाही.

बॉबीचे नाक मोठे तिखट आहे. त्यामुळे घराच्या फाटकाशी आलेली व्यक्ती परिचित आहे की अपरिचित हे त्याला केवळ वासानेच कळते. बॉबीला बोलता येत नाही, पण आपण बोललेले सर्व त्याला कळते. त्याला काही हवे असल्यास तो विविध आवाज काढून तसे सुचवतो आणि जर का आपण दुर्लक्ष केले तर तो आपल्या अंगावर चढाई करतो. 'आंघोळ' असा शब्द नुसत्या बोलण्यातही आला. तरी तो लपतो. पण एकदा आंघोळीला सुरवात झाली की तो मनसोक्त आंघोळ करतो.

बॉबी खरा खेळकर आहे. चेंडू फेकाफेकीचा खेळ त्याला खूपच आवडतो. कुठेही दडलेला चेंडू तो बरोबर हुडकून काढतो. बॉबीची स्मरणशक्ती दांडगी आहे; म्हणून तर एकदा इंजेक्शन घेतलेला बॉबी आता सिरिंज पाहताच पळून जातो आणि पलंगाखाली दडून बसतो. असा बॉबी माझा अत्यंत लाडका व आवडता कुत्रा आहे.

maza avadta prani essay in marathi | माझा आवडता प्राणी मराठी निबंध