संगणक साक्षरता काळाची गरज निबंध मराठी | Computer Literacy Essay Marathi

संगणक साक्षरता काळाची गरज निबंध मराठी | Computer Literacy  Essay Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  संगणक साक्षरता काळाची गरज मराठी निबंध बघणार आहोत. आजच्या २१ व्या शतकात संगणक मानवाला कश्याप्रकारे उपयोगी ठरत आहे. संगणक साक्षरता आजच्या काळात का महत्वाची ते सांगितले आहे.  


संगणक हा आज आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आधुनिक काळातील विज्ञानाने दिलेली ही देणगी आहे. खरे तर संगणकाचा जन्म दीडशे वर्षांपूर्वीच झाला; पण हा संगणक तेव्हा आकाराने मोठा अन् वयाने लहान होता. तो वयाने मोठा होऊ लागला, तसा त्याचा आकार लहान होत गेला; पण त्याचे कार्यक्षेत्र मात्र विस्तारत गेले. 



त्याने आपल्या सामर्थ्याची प्रचीती लोकांना दिली, तेव्हा सर्वांनीच त्याला जवळ केले. एकविसावे शतक हे 'ज्ञानयुग' आहे. या ज्ञानयुगाची सर्व दालने खुली झाली आहेत या संगणकामुळे.  असा हा गुणी संगणक चार्लस बॅबेज याने इ. स. १८३२ मध्ये शोधून काढला. अनेक शास्त्रज्ञांनी संगणकावर प्रयोग केले.


या संगणकासाठी माहिती पुरविण्याची सुविधा झाल्याने आज कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकते. त्याचमुळे हा संगणक घरा-घरांत पोहोचला. आज शाळेतून संगणक' हा विषय शिकवला जातो; त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना याची ओळख होऊ लागली आहे.


आज संगणक प्रत्येक क्षेत्रात तुमची मदत करतो. त्याचमुळे त्याच्याशी सर्वजण मैत्री करत आहेत. प्रौढ साक्षरता वर्गाप्रमाणे प्रौढ संगणक साक्षरता वर्ग सुरू झाले आहेत. संगणक आबालवृद्धांपर्यंत सर्वांच्याच उपयोगी पडणारा असल्याने संगणक-साक्षरता वाढत आहे. 


संगणकाने सर्व क्षेत्रे पादाक्रांत केलेली आहेत. आज घरबसल्या रेल्वे, विमान यांच्या तिकिटांचे आपण आरक्षण करू शकतो. नेहमीची  विजेची व दूरध्वनीची बिले, विम्याचे हप्ते, बँकेचे व्यवहार हे घरबसल्या करू शकतो. संगणक या सर्वांची स्मरणपत्रे तयार करतो. संगणकाच्या साहाय्याने सर्व कामे सुलभ, शिस्तीने व दगदग न होता केली जातात. 


मग हा संगणक सर्वांना वापरता आला, तर फायदाच होईल ना? त्यामुळेच घरातील प्रत्येकजण ह्या संगणकाचा मित्र व संगणक सर्वांचा मित्र बनला आहे. संगणकावर कोणतीही महत्त्वाची गोष्ट आपण साठवू शकतो. मॉल्स, सर्व संस्था, कार्यालये, कचेऱ्या, कारखाने येथील बिले तयार करण्यासाठी संगणक सज्ज असातात.


शाळा, कॉलेजमधील परीक्षांची गुणपत्रके संगणकाच्याच साहाय्याने अचूक व कमी वेळात होतात. मोठ-मोठे ग्रंथ संगणकामुळे चुटकीसरशी छापले जातात. विमा कंपन्या, शेअरबाजार, बँका, पतपेढ्यांमधील हिशेब संगणक बिनचूक करतात. हे सर्व खरे असले, तरी संगणक वापरायचा कसा, हे शिकलेच पाहिजे. संगणकसाक्षर झाल्याशिवाय फायदा होणार कसा?


संगणक ही एक क्रांती आहे व इंटरनेट हे त्याचे पुढचे पाऊल आहे. इंटरनेट-मार्फत माणसांना ज्ञानाचा खजिना उघडा झाला आहे. कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती आपल्याला हवी ती माहिती इंटरनेटवरून थोड्या खर्चात व अल्प वेळात मिळवू शकते. इंटरनेटमुळे जगात ‘ज्ञानाचा प्रसार' हा फार मोठ्या प्रमाणात होत आहे. 


इंटरनेटमुळे आज सारे जग जवळ आले आहे. इंटरनेटच्या सभासद असलेल्या लाखो व्यक्ती परस्परांशी संपर्क साधून निरनिराळ्या विषयांवरच्या मतांची देवघेव करू शकतात. इंटरनेटवरच्या या दुहेरी संपर्कव्यवस्थेमुळे जगात एकात्मता साधणे शक्य झाले आहे. 


जगातील एकही विषय असा नाही की, ज्याची माहिती इंटरनेटवर मिळणार नाही. म्हणूनच इंटरनेट ही सर्वात महान क्रांती आहे; तो कल्पवृक्ष आहे.  अशा ह्या माहितीच्या खजिन्यापर्यंत पोहोचायचे असेल, तर संगणक-साक्षरता आवश्यक आहे. 


संगणक-साक्षरता झाल्यावर इंटरनेट, ‘ई-मेल', 'ई-लर्निंग' काही अवघड नाही. तेव्हा ‘ज्ञानाचा अतिद्रुत गतिमार्ग' शोधून त्यावर धावण्यासाठी हवी संगणक-साक्षरता. संगणक-साक्षरतेला वयाचे बंधन नाही. फक्त साक्षर होण्याची इच्छा मात्र हवी. इच्छा तेथे मार्ग असतोच !


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. हा  निबंध तुमच्या मित्रमंडळी सोबत व  व्हाट्सअँप ग्रुपवर  शेयर करून संगणक साक्षरताबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी हातभार लावावा  हि नम्र  विनंती. धन्‍यवाद


टीप : वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते.

  • आजचे युग संगणक युग निबंध मराठी