परीक्षा रद्द झाल्या तर मराठी निबंध | pariksha radda zalya tar essay in marathi

परीक्षा रद्द झाल्या तर मराठी निबंध | pariksha radda zalya tar essay in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण परीक्षा रद्द झाल्या तर  मराठी निबंध बघणार आहोत.  या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता.


“संपली सारी शिक्षा,

कारण, रद्द झाली परीक्षा

फक्त आनंदाचीच प्रतीक्षा

जगी कोण सुखी आंम्हापेक्षा?"

या आपल्या नव्या कवितेच्या ओळी शेजारचा बंडू मोठ-मोठ्याने मित्रांना म्हणून दाखवीत होता. मी नुकताच शाळा व खाजगी शिकवणी आटोपून घरी आलो होतो.तो बंडू काय म्हणतोय म्हणून मी कान टवकारले...... काय? परीक्षा रद्द झाल्या.... या विषयावर बंडूने कविता लिहिली की खरंच परीक्षा रद्द झाल्या? खरंच काय बहार येईल जर परीक्षा रद्द झाल्या तर......! 


मनोभावे मी देवाची प्रार्थना केली की, 'परीक्षा रद्द कर'. अहो बालपणातले हसण्या - नाचण्याचे दिवस पुस्तकात तोंड खुपसून घालवायचे का? दिवसभर हुंदडण्यात , खेळण्यात किती आनंद म्हणून सांगु! पण चिमुकली पावले शाळेकडे वळली रे वळली की पाठोपाठ परीक्षेचे भूत मानगुटीवर येऊन बसलेच समजा! 


अवघ्या तीन-चार वर्षे वयाच्या मुलांनाही परीक्षा आहेच.वाढत्या वयाबरोबर हे परीक्षेचे भूत प्रचंड होत जाते. तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा, चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा, स्पर्धा . परीक्षा ...... बापरे! मग आपोआप बंधने सुरू..... टि.व्ही.पाहु नकोस , जास्त वेळ खेळू नकोस, आजारी पडशील आईस्क्रीम खाऊ नकोस परीक्षा जवळ आली आहे. क्रिकेट बंद, सिनेमा बंद.... इ.


सुरूवातीला मनात विचार आला, आपण सर्व विद्यार्थी खूप खुश! परीक्षाच नाही आता फक्त मज्जाच मज्जा.घरात गेलो परीक्षा रद्द झाल्याची बातमी खरी होती. आई-बाबांचा आंनदही गगनात मावेनासा झाला होता. कारण मुलांची परीक्षा म्हणजे पालकांची सत्वपरीक्षाच नव्हती का? 


मुले तर सर्वच 'आनंदी आनंद गडे..... जिकडे तिकडे चोहीकडे.... च्या तालात बेभान नाचू लागली. तो गृहपाठ, ते पाठांतर, ती गणिते , ते निबंध ....सारे पाश आता सुटलेले . मन कसे मुक्त पाखरासारखे....... गुरूजींच्या छड्या नाही, आईचे लाटणे नाही. 


परीक्षाच नाही तर गुणांची चिंता नाही. शिक्षक व पालकांचे ताशेरे नाहीत, शिकवण्या नाहीत, परीक्षा केंद्रे नाहीत, तिथला गोंधळ  नाही, पेपरफुटी नाही, वशिला नाही, भ्रष्टाचार नाही.एकंदरीत ‘परीक्षा बंद' चे बरेच फायदे आम्हां विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागले.


कधि ना भूगोल एवढेच समजले की आहे पृथ्वी गोल..... ती इंग्रजी भाषा कसली, ती डोक्यावरूनच गेली.. माथी जाऊन बसली, 'सॉरी' मात्र शिकवून गेली. आनंदाच्या भरात बराच वेळ गेला. थोड्या वेळाने नाण्याची दुसरी बाजू माझ्यासमोर नाचू लागली. 


पहिली बाजू सांगत होती की परीक्षा नाही तर स्पर्धा नाही , पास-नापास शिक्के नाहीत, भेदभाव नाही, कॉपी नाही, निकालाचा गोंधळ नाही, भ्रष्टाचार नाही , नापास तरुण-तरुणींच्या आत्महत्या नाहीत , बालपणाच्या स्वच्छंदावर गदा नाही.


तर नाण्याची दुसरी बाजू सांगत होती की, आयुष्य ही चैन नसून ते एक कर्तव्य आहे.चढाओढ नाही तर प्रगती नाही.परीक्षा नाही तर योग्यतेचे मूल्यमापनच नाही.वाचन व लिखाण नाही. पुस्तकासारखां सच्चा मित्र दुरावेल. विद्यार्जन हे ज्याचे कर्तव्य तो विद्यार्थीच विलासी होईल. रिकामा वेळ कुसंगती किंवा व्यसने याकडे ओढून नेईल. हुशार विद्यार्थी नाराज होतील.अभ्यासाची आवड नसणारे मात्र सिनेमा, फॅशन यांच्या आहारी जाऊन संस्कृती विसरून विकृतीकडे वाटचाल करतील.


मनाला मुंग्या आल्या. घशास कोरड पडली. बापरे , फायदे ठीक पण नुकसान केवढे! 'सत्यम् शिवम् सुंदरम् ' चा खरा अर्थच गायब होईल. परीक्षा रद्द झाल्या तर जीवनाची रद्दी व्हायला वेळ लागणार नाही असे माझे मन ओरडू लागले.मी डोळे मिटून प्रभूला आळविण्यास सुरूवात केली- “प्रभू परीक्षा रद्द हा ठरावच रद्द कर!'' धन्‍यवाद,मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 2

परीक्षा रद्द झाल्या तर मराठी निबंध | pariksha radda zalya tar essay in marathi


मार्च महिना उजाडला की, सर्व विद्यार्थ्यांची धडधड वाढू लागते. डिसेंबर-जानेवारी कसे छान थंडीच्या दिवसात घालविलेले असतात आणि एकदम शाळेच्या रोजच्या वातावरणात बदल घडू लागतो. अभ्यासाची, वेगवेगळ्या विषयांच्या तासांची, प्रश्नपत्रिका जमा करण्याची गडबड सुरू होते. 


मधूनच कौटुंबिक लग्नमुंजीचा मोसम सुरू असतोच. जेवणावळी, भोजनाची आमंत्रणे आमचे अभ्यासातून लक्ष दुसरीकडे खेचण्याचा प्रयत्न करीत असतात. समोरचे मिष्टान्नाचे भोजन काही घशाखाली उतरायला तयार नसते. परीक्षेच्या धसक्यामुळे आपल्यापेक्षा घरातील आई-वडील अधिक काळजी करायला लागतात. येता जाता, 


उठता बसता 'अरे, परीक्षा आली ना जवळ ! खेळतोस काय?' असे बोलणे त्यांचे सुरू होते. मित्रांशी गप्पा मारायला सवड नाही, की खेळायला जायला, टीव्हीवर बंदच आणि टेपरेकॉर्डरवरील गाणी ऐकणेही बंदच असते. नुसता सारखा ससेमिरा मागे लागतो तो परीक्षेचा आणि अभ्यास करण्याचा. वाटते नकोत त्या परीक्षा !


या परीक्षा म्हणजे आपल्या  मुलांच्या मुक्तपणे हिंडण्या-फिरण्याला एक मोठी अडचण होऊन बसली आहे. जणू ती एक मोठी बाधा झाली आहे. खरेच मग या परीक्षाच रद्द झाल्या तर... आम्हांला शाळेत जायचा कधीच कंटाळा येत नाही. शाळेत मित्र भेटतात.


प्रार्थना-गाणी-कविता शिकायला मिळतात, चित्रे काढायला मिळतात. इतिहास, मराठी, गणित यासारखे विषयही शिकायला मिळतात. आम्ही रोज मधल्या सुट्टीनंतर खेळतोही मस्त... पण विषय शिकल्यानंतर जी परीक्षा येते ना ! ती आली की आमचे धाबे दणाणलेच. 


मग मान मोडेपर्यंत अभ्यास सुरूच. ती घोकंपट्टी... ते वाचन... त्या प्रश्नपत्रिका सोडवणे आणि महत्त्वाचे म्हणजे ते शिक्षक आणि आई-बाबा यांचे सतत मागे लागलेले टुमणे...


हल्ली तर पावलोपावली परीक्षा चालू असतात. शाळेच्या पहिल्या दिवसापासून हा 'परीक्षा' नावाचा ब्रह्मराक्षस मागे लागलेला असतो. तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा, आठवड्याची परीक्षा, मासिक, तिमाही, सहामाही, नऊमाही, वार्षिक परीक्षा, परीक्षा अन् परीक्षा चालूच असतात.


अगदी 'अतिपरिचयात् अवज्ञा' म्हणतात ना तसेच चालू आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व वाटेनासे झाले आहे. शाळेच्याच किंवा महाविद्यालयाच्याच परीक्षा असतात, असे नाही. आता तर कोणताही व्यावसायिक कोर्स किंवा अभ्यासक्रम पूर्ण करायचा म्हटले की, सामायिक पूर्व परीक्षा आलीच. 


नोकरी मिळविण्यासाठी परीक्षा. "सेट नेट' आहेतच. आणि लग्न जमविण्यासाठी मुलींना वधूपरीक्षा ही द्यावी लागतेच.या परीक्षा पद्धतींमध्ये- परीक्षांच्या स्वरूपामध्ये तर अनेक दोष आढळतात. वर्षभर व्यवस्थित सर्व परीक्षा दिल्या आणि उत्तम गुण मिळविले तरी 'वार्षिक परीक्षेचा मान हा सर्वांत मोठा आहेच. 


नेमकी त्यावेळी काही अडचण निर्माण झाली तरी त्याला पर्याय नसतो. आणि शिवाय संपूर्ण वर्षभराचा अभ्यास पुन्हा पूर्ण करीत राहणे आहेच. तो तीन तासातच फक्त पडताळून पाहणार आहे. "शितावरून भाताची परीक्षा' ही या बाबत तशी घातकच ठरते. परीक्षक जर वेगवेगळे असले तर मग आणखीनच समस्या. 


प्रत्येकाचे मत भिन्न भिन्न आढळते. काही प्रश्नपत्रिकेत बुद्धीला वाव नसून स्मरणशक्तीवर भर दिलेला आढळतो. आणि बऱ्याच वेळा विद्यार्थी हा परीक्षेच्या दडपणानेच काही लिहू शकत नाही.काळ बदलतो आहे, लोकसंख्या वाढती आहे, तशी शाळांतून विद्यार्थी संख्याही प्रचंड वाढत आहे. संपूर्ण शालेय व्यवस्थापनेवर यंत्रणेवर फार मोठा परिणाम होत आहे. 


प्रश्नपत्रिका पळविल्या जातात - फुटतात. पेपर लिहिला तर परीक्षक योग्य ते मिळत नाहीत. कोणीही-कोणालाही पेपर तपासायला देतात आणि मग विद्यार्थ्यांचे - आमचेच हाल. मग अन्याय सहन करावा लागतो.म्हणून वाटते नकोच, 


त्या इतक्या कटकटी. विद्यार्थी जीवन कसे आनंदी... मुक्तपणे हवा तो विषय शिकण्यासाठी... हव्या त्यावेळी अभ्यासण्यासाठी असावे. परीक्षेचा हा अंकुश निघून गेल्यावर निश्चितच अभ्यास-खेळ-क्रीडा स्पर्धा-सहल या सर्व गोष्टी कशा स्वच्छंदपणे पार पाडता येतील. 


हा 'हुशार' विद्यार्थी हा 'ढ' विद्यार्थी - हा इतका अभ्यास करतो हा - इतका खेळतो कशाचा प्रश्नच नाही. बरं परीक्षा नसल्यामुळे कॉपीचे प्रसंग नाही... ना खरे खोटेपणा. आणि ना अपयशामुळे खचून जाणे... सर्व काही मुक्तपणे घडत राहील.


पण मोठा प्रश्न पुढे आहे की परीक्षाच रद्द झाल्या तर मुले हवा तसा - हवा तितका योग्य मार्गदर्शनाखाली अभ्यास करतील का ? मोठमोठे हुशार विद्वान लोक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्यासाठी तयार होतील का ? विद्यार्थ्यांचा दर्जा ठरविता येईल का ? सर्वच मुले सारखी सापडणार का ? 


अशाही मूलभूत अडचणी समोर येतील. त्यासाठी विचार करूनच परीक्षा हव्यात, परंतु दडपण नको. स्वरूप बदलावे... निकष बदलावे... निश्चितता असावी आणि त्याचा अतिरेक टाळावा. म्हणजे 'सुवर्णमध्य' गाठला जाईल व परीक्षांचे भयही कमी होईल.