माणसाची स्मृती नष्ट झाली तर मराठी निबंध | Manasachi smruti nast zali tar essay in marathi

माणसाची स्मृती नष्ट झाली तर मराठी निबंध | Manasachi smruti nast zali tar essay in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माणसाची स्मृती नष्ट झाली तर मराठी निबंध बघणार आहोत. निसर्गाकडून माणसाला लाभलेली एक महत्त्वाची देणगी म्हणजे स्मरणशक्ती होय. माणसाच्या आजवरच्या प्रगतीमध्ये या स्मरणशक्तीचा फार मोठा वाटा आहे. अर्थात, या स्मरणशक्तीचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. विशेषतः राग, द्वेष माणसाच्या मनात फार काळ धुमसत राहिला की त्यातूनच भांडणे, मारामाऱ्या, खून इतकेच नव्हे, तर राष्ट्राराष्ट्रांतील युद्धे घडतात. अशा वेळी वाटते की, माणसाला स्मृतीच नसती, तर किती बरे झाले असते! 


माणसाची स्मृती नष्ट झाली तर माणूस राग, द्वेष मनात बाळगूच शकणार नाही. कारण स्मृती नसल्यामुळे त्याच्या मनात काही राहूच शकणार नाही. त्यामुळे भांडणं, मारामाऱ्या, योजनापूर्वक केलेले खून, दरोडे शक्यच होणार नाहीत. देशादेशांमधील युद्धं संपतील ! स्मृती नसल्यामुळे अतिरेक्यांना काही आठवणारच नाही आणि त्यांचा कोणताही कट यशस्वी होणार नाही. जगातल्या किती कटकटी संपतील ! न आणखीही फायदे होतील. कधी कधी आईबाबा काम सांगतात. आपल्याला कंटाळा येतो. आपण काम करत नाही. आपण कारण सांगतो, 'विसरलो.' मग, विसरलास कसा' असं दरडावून जाब विचारला जातो. यावर आपण काहीच बोलू शकत नाही. स्मृतीच नसती, तर हा प्रश्नच आला नसता. सगळी कामं आपोआप टळली असती.
आपला अभ्यास म्हणजे हे लक्षात ठेवा, ते लक्षात ठेवा, असंच असतं. स्मृती नसती तर पाठांतर करावं लागलं नसतं. वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान लक्षात ठेवणं, प्रश्नोत्तरं लक्षात ठेवणं हे सगळं टळलं असतं. गृहपाठ करा, क्लासला जा, क्लासचा गृहपाठ करा, सगळीकडच्या परीक्षांची तयारी करा, हे काही करावं लागलंच नसतं. किती त्रास वाचला असता ! स्मृती नष्ट झाली, तर फायदाच फायदा होऊ शकेल ! -स्मृती नष्ट झाल्यामुळे होणाऱ्या फायदयांच्या कल्पनांमध्ये मी रममाण झालो होतो. एक एक कल्पना मनात निर्माण होऊ लागली होती. आणि अचानक मला आठवले ते स्मृतिभ्रंश झालेले शेजारचे आजोबा ! मग मात्र मनाचा थरकापच उडाला. मला स्मृती नष्ट झाल्याचे तोटेच तोटे दिसू लागले. बघा ना... 


स्मृती नष्ट झाली तर आई जेवण करायलाही विसरेल ! मग खाणार काय? बरं, आईने जेवण करायला घेतलं, तरी करणार कशी? कारण कोणता पदार्थ कसा शिजवायचा, हे तिला आठवणारच नाही! आपल्याला सुद्धा कोणता पदार्थ कसा लागतो, त्याची चव काय, हे आठवणारच नाही! सर्व माणसे इतर प्राण्यांप्रमाणेच रानावनात किंवा उकिरड्यावर अन्न शोधत हिंडतील. बरं, स्मृती नसल्याने अभ्यास नाही म्हणून ज्ञान नाही. ज्ञान नसल्याने प्रगती शक्य नाही. त्यामुळे उकिरड्यावरील जीवनातून सुटका कशी करून घेणार?याहीपेक्षा भयंकर गोष्ट आता माझ्या लक्षात येतेय. आईबाबा आपल्याला ओळखणारच नाहीत. आपणही आईबाबांना ओळखणार नाही ! घर ओळखता येणार नाही. कोणीही कोणालाही ओळखणार नाही! सगळेच एकमेकांना परके असतील ! म्हणजे कोणालाही कोणाविषयी आपुलकी नसेल, प्रेम नसेल. याचा अर्थ कोणीही दुसऱ्याला लुबाडेल, त्याच्याशी भांडेल, त्याला मारील. म्हणजे हाणामाऱ्या, युद्धं सहज होतील. माणसे माणसांच्या जिवावर उठतील. कोणीही इतरांची पर्वा करणार नाही.


छे, छे ! स्मृती हवीच. ती नसणं माणसाला परवडणारं नाही."

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद


महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )


 • माणसे राग, द्वेष यांनी आंधळे
 • मनात ठेवतात
 • केव्हातरी भीषण कृत्य करतात
 • स्मृती नसती तर हे घडले नसते
 • आणखीही फायदे
 • अभ्यासाचा त्रास नसेल
 • कामे टळतील
 • तोटेही खूपच
 • स्मृती नाही म्हणून ज्ञान नाही आणि ज्ञान नाही म्हणून प्रगती नाही
 • आईबाबा, इतर माणसे ओळखणार नाहीत
 • सगळेच परके
 • इतर प्राण्यांसारखे
 • उकिरड्यावरील जीवन
 • स्मृती हवीच.