संगणक आपला मित्र निबंध मराठी | computer my friend essay in marathi

 संगणक आपला मित्र निबंध मराठी | computer my friend essay in marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  संगणक आपला मित्र मराठी निबंध बघणार आहोत.   ज्ञानासारखे पवित्र या जगात दुसरे काहीच नाही. तर सध्याचे युग आहे ज्ञानाचे! विज्ञानाचे! तेव्हा विविध प्रकारचे ज्ञान, माहिती आत्मसात करणे आज अत्यावश्यक झाले आहे. तर यासाठी आपल्याला संगणक उपयोगी ठरतो. संगणक हे एक बहुउद्देशीय माहितीयंत्र आहे.


सध्याच्या जगात माहितीचा स्फोट प्रचंड प्रमाणात होत असतो. तेव्हा योग्य ती माहिती कमी वेळात आणि कमी खर्चात उपलब्ध व्हावी म्हणून माहितीचे यांत्रिकीकरण करण्याची गरज भासू लागली. यातूनच संगणकाची आवश्यकता भासू लागली आणि त्याची निर्मिती झाली.


संगणक हा इलेक्ट्रॉनिक क्रांतीचा अग्रदूत आहे. याने माहितीयुगाची पहाट आणली आहे. अनंत अशा आणि अहर्निश वाढत जाणाऱ्या ज्ञानाला लीलया पेलण्याची क्षमता संगणकात आहे. आज विज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात संगणक हा अविभाज्य घटक आहे. 


तसेच तो आता घराघरात जाऊन प्रत्येकाचा मित्र बनू लागला आहे. मानवाचा सोबती बनलेल्या या संगणकाला वेग, अचूकता आणि निर्णयक्षमता यांमुळे स्वप्नवत सामर्थ्य प्राप्त झाले आहे. एका संगणकाची जर मानवाशी तुलना करायची झाली तर १ कोटी गणितज्ञ सतत २४ तास काम करतील तरी संगणकाच्या तुलनेत उणे ठरतील. 


संगणक सतत काम करूनही थकत नाही वा चिडत नाही. एकाच प्रकारचे काम परत परत करीत राहण्यातला कंटाळवाणेपणाही संगणकावर परिणाम करीत नाही, तो कंटाळत नाही.प्रचंड माहिती साठविणाऱ्या संगणकामुळे अवकाश संशोधन प्रगत आणि विकसित झाले आहे. अग्निबाण, कृत्रिम उपग्रह यांची दिशा, वेग सर्व माहितीचे प्रचंड भांडार असल्यामुळे हजारो वर्षांपूर्वीच्या एखाद्या रात्रीचे आकाश आपण आज पाहू शकतो.


वैद्यकीय क्षेत्रातही संगणक मोठ्या प्रमाणावर काम करीत आहेत. मेंद, हृदय, मूत्रपिंड इत्यादींच्या सूक्ष्म शस्त्रक्रिया योग्य प्रकारे यशस्वी करण्यासाठी डॉक्टर या संगणकाचीच मदत घेतात. क्ष किरणांवर अवलंबून असणाऱ्या वैद्यकशास्त्रात संगणकाने मोठी क्रांती घडवून आणली आहे. शरीरांतर्गत असलेल्या अनेक सूक्ष्म गोष्टी 'कॉम्प्युटराइज्ड' उपकरणांमुळे स्पष्ट दिसू शकतात.


हवामानाचा अचूक अंदाज वर्तविण्यात संगणकाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. एखाद्या देशाचे संपूर्ण हवामान तेथील ढग, वारे, महासागरातील कमी दाबाचे पट्टे या सर्वांची पूर्वसूचना संगणक अचूकपणे देऊ शकतो. भारतासारख्या कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांना या माहितीचा चांगलाच उपयोग होऊ शकतो. तसेच मच्छिमार बांधवांना वादळ, जोरदार पाऊस याची पूर्वसूचना मिळू शकते व अनेक अपघात टाळता येतात.


संगणकाद्वारे पुस्तके, मासिके, वृत्तपत्रे यांची अक्षरजुळणी, मुद्रण सारे काही होते. संगणक कुशाल अनुवादकही असतो. शेअर बाजार, बँका, विमा कंपन्यांची कार्यालये, शासकीय कार्यालये अशा अनेक ठिकाणी संगणकाचा वापर केला जातो. रेल्वे वा विमानाच्या तिकिटांचे आरक्षण संगणकाच्या साहाय्याने फार कमी वेळात करता येते. असा हा संगणक मानवासाठी झटणारा, अत्यंत तत्पर असा मानवाचा मित्र आहे. आता संगणकामुळे बेकारी वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येते. 


परंतु सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणी सामावून घेऊन यावर मात करता येईल. काही वेळा अकुशल माणसे संगणकाला माहिती पुरविताना चुका करतात आणि मग परीक्षांच्या निकालात ९३ ऐवजी ३९, ६२ ऐवजी २६ असे गुण येतात आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होते. परंतु यावरही तोडगा काढता येईल. संगणक मानवाच्या नैसर्गिक बुद्धीवर आक्रमण करील अशीही एक


धास्ती मनात येत असते. परंतु मानवी मेंदूनेच संगणकाला जन्म दिला आहे व मानवी मेंदच सर्वश्रेष्ठ आहे, हे निर्विवाद सत्य आहे. तेव्हा एकविसाव्या शतकात प्रवेश करताना या संगणक मित्राचे साहाय्य आपल्याला खूपच उपयुक्त ठरणार आहे, आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला मानवकल्याणाचे ध्येय गाठायचे आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद