माझे शेजारी मराठी निबंध | marathi essay maze shejari

माझे शेजारी मराठी निबंध | marathi essay maze shejari

मराठी निबंध 1 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे शेजारी मराठी निबंध बघणार आहोत.  माझे शेजारी एक महिन्यापूर्वी माझ्या वडिलांना शिवाजी नगर येथे राहण्यास निवासस्थान देण्यात आले. आमचे निवासस्थान बस स्टैंड जवळ आहे. येथील वातावरण शांत आहे. जवळच शासकीय शाळा आणि स्थानिक बाजार आहे. आमचे घर कोपऱ्यावर आहे. त्याला लागन असलेल्या रस्त्यामुळे घरे दोन भागांत विभागली गेली आहेत. 


आमच्या समोरच्या घरात शिंदे राहतात. ते मूळ मुंबई राहणारे आहेत. शिंदे यांना दोन मुली व एक मुलगा आहे. ते स्वभावाने खूप चांगले आहेत. त्यांची पत्नी शिक्षिका आहे. या कुटुंबाशी आमचा चांगला स्नेह जुळला आहे. आम्ही एकमेकांकडे चहा फराळ करतो.


आमच्या वरच्या मजल्यावर असणाऱ्या घरात एक सिंधी कुटुंब राहते. त्यांना दोन मुली आहेत. त्यांचे आई वडील त्यांच्याकडेच असतात. ते लोक श्रीमंत आहेत. पती-पत्नी धार्मिक आहेत. दोन्ही मुली एका प्रसिद्ध पब्लिक स्कूलमध्ये शिकतात.


आमच्या शेजारच्या घरांत श्री. गुप्ता राहतात. ते अंदाजे ५५ वर्षांचे असून केंद्रीय विद्यालयात मुख्याध्यापक आहेत. शेजार-पाजारचे लोक त्यांना खूप मान देतात. आपल्या मुलांच्या शिक्षणासंबंधीच्या अडचणींसंबंधी सल्ला मसलत करण्यासाठी लोक त्यांच्याकडे जातात. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. कॉलेजात शिकणारी त्यांची मुले नेहमी मदतीला तत्पर असतात.


आमच्या समोरच्या घरात एक वरिष्ठ अधिकारी राहतात. ते ३५ वर्षांचे असतील. त्यांना एक मुलगी आणि दोन मुले आहेत. ते डॉक्टर आहेत. आमच्या सोसायटीत कोणीही आजारी पडले तर आम्ही त्यांच्याकडेच जातो. ते खूपच चांगले व हसतमुख आहेत. त्यांची पत्नीही डॉक्टर आहे. ते दोघेजण एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करतात.


आमच्या सोसायटीतील एक कुटुंब असे पण आहे की ज्यांच्याकडे चार मोटारी आहेत. त्यांच्या मालकीच्या बसेस पण आहेत. तीस वर्षांपासून हे लोक इथे राहतात. श्री. कुलकर्णीना हे घर त्यांच्या वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळाले. त्यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे. ते पुण्याजवळच्या एका गावातील आहेत. कुलकर्णी धार्मिक वृत्तीचे आहेत.


सारांश, येथील बहुतांश शेजारी सभ्य सुशिक्षित, शांतताप्रिय आहेत. एकमेकांच्या सुख-दु:खांत ते सहभागी होतात. एकमेकांसाठी काही करण्याचीही त्यांची इच्छा असते. चांगले शेजारी सुदैवानेच मिळतात.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

आमचे शेजारी मराठी निबंध 2

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे शेजारी मराठी निबंध बघणार आहोत. मी एका धड्यात वाचलं होतं की, खिस्त नावाचा कोणी एक महापुरुष होऊन गेला. खिश्चन लोक तर त्याला म्हणे देव मानतात. त्याचे एक वचन आहे, 'शेजाऱ्यावर प्रेम करा.' मी नक्की सांगतो तुम्हाला की या खिस्ताला कोणी शेजार - पाजार नसावा. त्याला जर शेजारी असता तर इतका आत्मघातकी संदेश त्याने दिला नसता. अहो, शेजारी हा काय प्रेम करण्यासारखा प्राणी असतो?


शेजाऱ्या - शेजाऱ्याचं तर विळ्या - भोपळ्याएवढं सख्य. बहुतांश शेजारी एकाच जातीचे असतात. त्या साऱ्यांचं एकच लक्ष्य 'शेजाऱ्यास त्रास देणे' माझ्या एका मैत्रिणीने आपल्या शेजारणीवर एक गीत केलंय. 'सखे शेजारपणी तू छळत रहा ! भिंतीत खिळे ठोकीत रहा !' आपली भिंत खराब झाली तरी चालेल पण शेजाऱ्याला त्रास झाला पाहिजे. 


आपला शेजारी बघत नाही असं बघून हळूच आपल्या खोलीतला केर शेजाऱ्याच्या दारात टाक. ही शेजाऱ्याची तहा. मला जर खिस्त भेटला असता, तर त्याला मी विचारलं असतं, अशा शेजाऱ्यावर प्रेम करायचं? मागे घे पाहू तुझे शब्द.


आजच्या ब्लॉक संस्कृतीमुळे आठ - आठ दिवस शेजाऱ्याचं दर्शनही घडत नाही. शेजारी कोण राहतं हेही काही जणांना ठाऊक नसतं. शेजारी आपल्याकडे साधं बघायलाही तयार नाहीत. दार उघडताना पाहिलंच तर चटकन आत जातील आणि धाडकन दार लावून घेतील. एखाद्या वेळी पाहिलंच आमच्याकडे तर मारक्या म्हशीसारखं पाहतील. कराल का अशा शेजाऱ्यावर प्रेम ? खिस्ताला काय होतं सांगायला ?


शेजाऱ्याचे निरनिराळे प्रकार आहेत. पशूचे असतात तसे. काही शेजारी बातम्या पुरवणारे आणि बातम्या तरी कसल्या ? 'ऐकलंत का, शेजारच्या बापूरावांची नोकरी गेली.' 'बरं झालं, माज चढला होता ना त्याला' केव्हा अगदी ताजी खबर घेऊन येतील. 


कुणा म्हातारीला म्हणे हॉस्पिटलात ठेवली होती. 'मी सांगते तुम्हाला ती म्हातारी आता काही परत येत नाही.' असल्या बातम्या, असल्या बातम्या देण्याची काय गरज असते ? बरं बातमी दिलीत तर दिलीत. वर त्याच्यावर अशुभ शेरेबाजी कशाला ? पण असं केलं नाही तर शेजारी कसला ? यालाच म्हणतात शेजारधर्म.


आणखी एक जात असते शेजाऱ्यांची, ते आमचे हितचिंतक, सल्लागार; आपल्या शेजाऱ्यांना सल्ला देणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे असं ते मानतात आणि लोकमान्य टिळकांच्या आवेशात 'तो हक्क आम्ही बजावणारच.' असं बजावतात. प्रसंग सुखाचा असो, दुःखाचा असो, आपल्याला त्यात कळो अगर न कळो, सल्ला द्यायचाच. परदेशात कधीही न गेलेला माणूस आपल्याला परदेशात गेल्यावर आपण कसं वागावं हा सल्ला देणारे हे सल्लागार. आम्हाला सल्ला देणार आणि गार करणार.


एकदा माझी पाठ दुखत होती, आले चौकशीला, 'काय म्हणतेय पाठ ?' बरी आहे. लावलंय बेला - डोना, मग सल्ला देणार. 'काय नको बेला आणि डोना. आमच्या ओळखीचे एक बाबा आहेत त्यांच्याकडे चला, ते एक लाथ हाणतील कमरेत. जन्मात कधी कंबर म्हणून दुखायची नाही. कसला सल्ला, पण नाही ! सल्ला दिला नाही तर राहवणार नाही. वर सुनावणार, 


'आम्ही आपलं तुमच्या हिताचं सुचवलं. ऐकायचं असेल तर ऐका नाहीतर सोडून द्या. म्हणतात ना, ज्याचं करावं बरं तो म्हणतो माझंच खरं' ! आता वर हे कशाला ?


एखादा समारंभ असला आमच्या घरी की, तडमडणारच मधेमधे. असा गोंधळ उडवून देणार की वाटावं तुझी मदत नको पण तुझं तडमडणं आवर. आम्हाला हातभार लावणार म्हणजे काय, हात लावणार आणि आमच्यावर भार टाकणार. 


त्यांच्याकडे टी.व्ही. असला तरी आमच्याकडे टी.व्ही. पहायला येणार. बरं, आले तर आले, एकटे नाही येणार. बरोबर आपल्या पाहुण्या मंडळीना घेऊन येणार. वर अभिमानाने सांगणार, 'आमचा की नाही घरोबा आहे. यांचं घर म्हणजे आमचंच घर.' असं निःसंकोचपणे सांगणार. पण असं नाही म्हणणार की, आमचं घर म्हणजे याचंच घर.


अशा किती तहा सांगायच्या आमच्या शेजाऱ्यांच्या ? आमचा मुलगा एस्.एस्.सी. झाला. लागलीच भकले. 'रिझल्ट चुकला असणार. थोड्या दिवसात कळवतील मुलगा नापास म्हणून !' नेहमी बुध्दिबळातल्या उंटासारखी तिरकी चाल. एकदा मला बरं नव्हतं. आई दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांना म्हणाली 'आज बरंय हो !' लागलीच प्रतिप्रश्न 'इतक्या लवकर कसं बरं वाटलं ? सांभाळा हो ! दुखणं उलटतं एखाद्या वेळा ?'


सारांश, असे आमचे शेजारी. ते आता आपल्या अवता-भोवती नाहीयेत म्हणून सांगितलं हो हे तुम्हाला. नाहीतर 'आमचे शेजारी म्हणजे लाख मंडळी ! शोधून सापडायची नाही अशी मंडळी !' असं सांगितलं असतं. मग एक विचार मनात येतो की, मीसुद्धा कुणाचा तरी शेजारी


आहेच ना ?' मित्रहो, एक मेहेरबानी करा. जर आमचे शेजारी कधी तुम्हाला भेटले तर त्यांना 'तुमचे शेजारी कसे आहेत हो ?' असं विचारू नका. समजलं ?

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद