मी केलेले श्रमदान मराठी निबंध | mi kelele shramdan marathi nibandh

मी केलेले श्रमदान मराठी निबंध | mi kelele shramdan marathi nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी केलेले श्रमदान मराठी निबंध  बघणार आहोत. आमच्या कॉलेजचा या वर्षीचा 'एन.सी.सी.'चा कॅम्प कणकवली गावात पडणार होता. डिसेंबरचे दिवस होते. पुण्याहून आमच्या महाविद्यालयातील सुमारे दीडशे विद्यार्थी कोकण रेल्वेने एकत्रच निघालो होतो. आमच्याबरोबर आमचे दहा प्राध्यापकमार्गदर्शकही होते. शिबिराचा कालावधी १५ दिवसांसाठीचा होता. कोकण रेल्वेचा प्रवास... आणि कोकणातील निसर्गाची उधळण, त्यातूनही आमची अभ्यासातून-प्रयोगातून-परीक्षेतून पूर्णपणे झालेली सुटका. काय विचारता सर्व विद्यार्थी वर्ग अगदी कानात वारे शिरलेल्या वासरांसारखी मुक्तपणे विहरत होतो.


आमच्या विद्यार्थ्यांचे २०-२० जणांचे गट पाडले होते. प्रत्येक गटावर एक-एक सेनानायक होताच. 'कणकवली मक्कामी पोहोचल्यानंतर लगेच प्रत्येक गटासाठी कार्यक्रम पद्धतशीरपणे वाटून दिला होता. आम्हांला मिळालेले विश्रामधाम चांगले प्रशस्त, एका डोंगराला लागून पायथ्याशी हिरव्यागार अशा कुरणामध्ये होते. मधूनमधून मोठीमोठी आंबा-काजू-फणसपांगारा-गुलमोहर इ. झाडांची गस्त घालण्यासाठी जणू नेमणूक केली होती.


संध्याकाळच्या वेळी पोहोचलो परंतु त्यादिवशी रात्री कोरडा फराळच होता. त्यामुळे प्रत्येक गट आपापल्या जागी आपली व्यवस्था लावण्यात गुंतला होता. रात्री सेनानायकाची जोरात शिटी झाली आणि आम्ही सर्वजण मोकळ्या पटांगणात शेकोटीभोवती जमा झालो. प्रार्थना झाली  आणि शेवटी शिबीर प्रमुखांनी संपूर्ण शिबिराच्या कार्यक्रमाची रूपरेषा सर्वांसमोर ठेवली. आपण सर्वजण कणकवलीला केवळ सेवेच्या भावनेतून आलो आहोत हेही पुन्हा एकदा आमच्या मनावर ठसविले.


प्रत्येक गटांना आपल्या थोर समाजसुधारकांची नावे देण्यात आली होती. आमच्या गटांचे नाव 'संत गाडगेबाबा' गट होते. वीस जणांमध्येही कामाची विभागणी पाच-पाच जणांमध्ये केली होती. संपूर्ण दीडशे सैनिकांची स्वच्छता, संरक्षण, स्वयपाक, नाश्ता, निरोप पोहोचणे अशा कामांसाठीही अगदी योजनाबद्ध कार्यक्रमपत्रिका केली होती. सर्वांना सर्वप्रकारचे काम करण्याची संधी मिळणार होती. आणि खरोखरीच त्याचा आनंद आम्हांला फार फार झाला होता. 'शिस्त आणि अनुशासन' याबाबतीत तर रेल्वेच्या प्रवासापासूनच काही दंडक घालून दिले होते. त्यामुळे कोणालाही त्रास होणे शक्य नव्हते.


शिबीर' म्हणजे सहकार्य, शिबीर म्हणजे प्रत्येकाला समजून घेणे, शिबीर म्हणजे आलेल्या प्रसंगाला-संकटाला तोंड देण्यास सर्वांनी सज्ज राहणे. शिबीर म्हणजे एकमेकांची सुख-दुःखे जाणून घेणे, समाजात जाऊन प्रत्येक देशबांधवाच्या जीवनशैलीचा परिचय करून घेणे. शिबीर म्हणजे माझा हा सहकारी, माझा मित्र, माझा बांधव, गाव-तालुका-जिल्हा आणि माझा हा देश या एकात्मतेच्या भावनेतून काम करण्यास तयार राहणे, सांघिक भावना सेवावृत्तीचा आनंद घेऊनच आम्ही दुसऱ्या दिवशी कामाला लागलो..

कणकवली' गावातील एक भाग आम्हांला दत्तक दिला होता. त्या भागातील स्वच्छता करणे, रस्ते दुरुस्त करणे, खड्डे भरणे, विहिरी बांधून देणे, रस्त्याच्या कडेने झाडे लावणे. त्या भागातील नागरिकांना स्वच्छतेचे-शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे. अशी विविध प्रकारची कामे आमच्यासमोर आखून दिली होती. त्यामुळे घमेली, फावडी, कु-हाडी, टोपल्या स्वच्छतेसाठी फडकी, पाणी भरण्यासाठी घागरी अशी अनेक आवश्यक साधने घेऊन आम्ही सकाळी ८.०० वाजता बाहेर पडत होतो... काम करताना -

'नौजवान सैनिक उचल पावलं, पुढे चला पुढे चला ध्वनी निनादला।' 

अशी स्फूर्तीगीते म्हणत, नाचत, भारत माता की जय, जय जवान, जय किसान अशा प्रकारच्या घोषणा करीत आमचे सैनिक दुपारी एकपर्यंत काम करीत. दुपारचे जेवण वगैरे झाल्यानंतर अर्धा-पाऊण तास विश्रांती घेऊन पुन्हा सायंकाळ होईपर्यंत कामाला जुंपत होतो. ध्येयाने वेडे झाल्याप्रमाणे काम काम आणि काम चालू होते. कुठे कधी ठेच लागायची, दगड लागायचे, फांदी लागायची, रक्त यायचे, जखम व्हायची परंतु कशाकशाकडे लक्ष नसायचे. 


अवतीभवती गावकरीही जमू लागत... कोणी थट्टा करीत, कोणी मदत करीत, कोणी कौतुक करीत... हां, हां म्हणत रस्ते सपाट झाले, खडी पडली, रोल फिरले, खड्डे बुजू लागले... झाडे-रोपे आणली गेली. विहिरी खोदल्या... बोअरिंगची व्यवस्था केली गेली... गावातील गावकऱ्यांच्या मदतीने तर 'भूतो न भविष्यति' असे काम झपाट्याने होऊ लागले. गावातील मुले खूश होऊन दूध, फळे खाद्यपदार्थ आणत, संध्याकाळी एकत्र बसून गप्पा गोष्टी होत.


बघता बघता १५ दिवस कधी संपले हे समजलेच नाही. शेवटच्या दिवशी गावच्या सरपंचांनी आम्हां-सर्व सैनिकांना मेजवानीचे जेवण दिले... शेंगा-गूळ खाऊ घातले. गावकऱ्यांना आणि आम्हांलाही आता गावी परतणार म्हणून वाईट वाटत होते. शेवटच्या रात्री मोठी शेकोटी झाली... गाणी-गोष्टी-करमणूक-सर्व काही गावाकडील लोकांनी पार पाडली. ते 'आता पुना कधी येनार ?' असे पुन्हा पुन्हा विचारत होते.


अखेरीस परतणे तर भागच होते. एकमेकांचा निरोप घेतला आणि अनमोल अशा आठवणी, गावकऱ्यांचे प्रेम, मित्रांचे किस्से कायमचे बरोबर घेऊन आमच्या गावी परतलो. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद