गुरु महिमा मराठी निबंध | guru mahima essay in marathi

गुरु महिमा मराठी निबंध | guru mahima essay in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण
गुरु महिमा मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. आषाढ महिना आला की, वारकऱ्यांना 'पंढरी'ला जाण्याचे वेध लागतात.


विठोबाच्या दर्शनाची ओढ त्यांना 'तहानभूक-ऊन-पाऊस सगळ्यांकडे दुर्लक्ष करून घेऊन जाते पंढरपूरला.' त्यानंतर एकादशी पाठोपाठ येते ती, 'गुरू पौर्णिमा.' भारतीय संस्कृतीचे 'गुरुणाम् गुरू' महर्षी व्यास यांना या दिवशी आपण प्रथम वंदन करतो.'व्यास' = वि+आस म्हणजेच विस्तार – व्यापून टाकणे. वाढवीत जाणे, विकास करणे. आपला सर्वांगीण विकास साधणे. त्यासाठी या महाज्ञानी पुरुषाला आपण वंदन करीत असतो. महर्षी व्यास हे आपले सद्गुरू. म्हणून 'गुरुपौर्णिमा' हा दिवस गुरूंचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा दिवस.'गुरू' म्हणजे 'अज्ञानरूपी अंधकार' दूर करणारा. गुरू हे निर्लेप, निःस्वार्थी आणि ज्यांना आत्मतत्त्वाचा स्पर्श झाला आहे, असे असतात. आपल्या ज्ञानाचा त्यांना जरादेखील अहंकार नसतो. चांगला शिष्य जसा चांगल्या गुरूंच्या शोधात असतो. तसेच गुरूदेखील सच्छिष्यांच्या शोधात असतात. गुरू-शिष्यांचे हे नाते सर्व नात्यांमध्ये मानवीसंबंधातील सर्वोत्कृष्ट नाते आहे.


कारण त्यात पराकोटीचा निखळपणा, प्रामाणिकपणा असतो. चांगले गुरू हे शिष्यांना ज्ञानाभ्यासासाठी प्रेरित करतात. दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत असतात. गुरू हे 'आपुल्यासारिखे करिती तात्काळ.' करणारे असतो. म्हणजे परिसापेक्षा श्रेष्ठ असतो.


परीस लोखंडाचे सोने करतो, परंतु गुरू हे शिष्याला 'परीस'च बनवितात. साधना, अभ्यास, कृती कशी करावी याचे सोदाहरण स्पष्टीकरण करतात. शिष्यातील उणिवा, कमतरता कमी करण्याचा प्रयत्न करीत असतात. चुका झाल्या तरी अतिशय सांभाळून सौम्य भाषेत पटवून देऊन दुरुस्त करतात. आपल्या शिष्याचे आयुष्य प्रवाही-निर्मितीशील-जिवंत बनवितात. प्रसंगी गुरू हा परमेश्वरापेक्षाही श्रेष्ठ असतो. कारण त्याच्यापर्यंत पोहोचण्याची वाट हा 'गुरू'च दाखवितो. "गुरू गोविंदसे श्रेष्ठ !" म्हणूनच म्हणतात.द्रोणाचार्य-एकलव्य, रामकृष्ण परमहंस-विवेकानंद, शिवाजी महाराज-समर्थ रामदास, निवृत्तीनाथ-ज्ञानेश्वर, गोपाळकृष्ण गोखले-महात्मा गांधी अशा अनेक गुरु-शिष्यांच्या जोड्या अमर झाल्या आहेत. श्रीकृष्ण व अर्जुनाची जोडी तर भारतीय संस्कृतीचा आदर्श मानली जाते.हे गुरुशिष्यांचे संबंध आदर्श असतील तर त्यातील सामर्थ्य व यशप्राप्तीही मोठी असते. एकच अशी 'गुरू' ही व्यक्ती आहे, की जी नेहमी शिष्यावर 'वरदहस्त' ठेवते, त्यासमोर हात पसरत नाही. उलट आपल्यापेक्षा शिष्य मोठा व्हावा हीच अपेक्षा करते. म्हणूनच "शिष्यादिच्छेद पराजयम्' असे म्हटले जाते.भारतीय संस्कृती ही जगातील 'सर्वोच्च संस्कृती' मानली जाते. कारण म्हणजे तिच्यातील सर्वांत मोठा गुण म्हणजे 'कृतज्ञता भाव'. आपण म्हणूनच आपल्याला दुसऱ्याकडून मग ते निसर्गातून असो किंवा व्यक्तींकडून किंवा प्राणिमात्रांकडून काहीही प्राप्त होऊ दे. आपण त्यांच्याविषयी कृतज्ञतेने वागतो. त्यापुढे नम्र होतो, 


त्यांची पूजा करतो. मग ते सूर्य, चंद्र, नदी, पाणी, आकाश, हवा, वृक्ष, फुले, पाने, फळे असतो किंवा सर्प, नाग, पशू-पक्षी असोत त्यांची त्यावेळी सणासुदीला पूजा करतोच. त्यांना गुरू मानतो कारण निसर्गातील प्रत्येक गोष्ट - वस्तू आपल्याला काही ना काही शिकवीतच असते.


देतच असते. म्हणून प्रत्येक गोष्ट आपला गुरू असते. 'गुरू'ला ज्याप्रमाणे रूप-गुण-स्वरूप यांचे बंधन नसते, तसे त्याला वयाचेही बंधन नसते. छोटीशी मुक्ता ही १४शे वर्षांच्या चांगदेवांची गुरू बनते. नामदेवांचे गुरू विसोबा खेचर बनतात, सख्खा भाऊ निवृत्तीनाथ ज्ञानदेवांचे गुरू बनले.अशाप्रकारे कितीही मोठे ज्ञानी, बुद्धिमान लोक असले 


तरी त्या ज्ञानाला बुद्धीला योग्य मार्ग दाखविणारा गुरू असावा लागतो. चूकभूल करणाऱ्याला सांभाळून घेऊन दिशा दाखवणारा असावाच लागतो. म्हणूनच 'गुरू' हा सर्वत्र आहे.

गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णू, गुरुर्देवो महेश्वरा। . 
 गुरुक्षिात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ।।

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका


निबंध 2

गुरु महिमा मराठी निबंध | guru mahima essay in marathiगुरुः ब्रह्मा गुरु: विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।।अशा शब्दांत भारतीय संस्कृतीने गुरूचा मोठेपणा सांगितला आहे. साधारण मानवाला देवत्वाकडे नेण्यासाठी देवाजवळ पोहोचवण्यासाठी गुरूची आवश्यकता असते. अज्ञानाचा अंधकार नष्ट करून ज्ञानज्योत पेटविण्याचे काम गुरू करतात. 


गुरूच्या पायाशी बसून शिष्य नम्रता, जिज्ञासा, गुरुसेवा यांद्वारे गुरुजवळचे ज्ञानामृत मिळवितो व ते प्राशन करून स्व:तची उन्नती करून घेतो. गुरूच्या कृपादृष्टीनेच शिष्याच्या मनाची मलिनता दूर होते. म्हणून म्हटले आहे की 'गुरुविण नाही दुजा आधार'. 


आपण जीवनपथावर वाटचाल करताना कोठे अडलो, पडलो तर गुरू आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपली जीवननौका पार नेतात. गुरू हे शिष्याच्या जीवनाला योग्य दिशा देतात, योग्य मार्गदर्शन करतात.


गुरू हे ईश्वराच्या कार्यासाठी स्वत: झिजून जगात आनंद, शांती पसरवितात. गुरू केवळ वाणीने नव्हे तर स्वतःच्या वर्तनाने शिष्यांना उपदेश करीत असतात. सत्कार्यासाठी संकटे सोसूनसुद्धा गुरू सतत तत्पर असतात. गुरू आपल्याजवळचे ज्ञान शिष्याला देताना थकत नाही वा कंटाळत नाही. 


अर्जुनाचा मोह नष्ट करण्यासाठी भगवान कृष्णांनी गीतेचे अठरा अध्याय सांगितले. गुरू हे आपली कुवत पाहून आपल्याला ज्ञानदान करतात. म्हणून गुरूचा अनुग्रह असल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही असे म्हणतात.


भारतात गुरुपरंपरा फार प्राचीन काळापासून आहे. वसिष्ठ ऋषी हे राजा दशरथाचे गुरू होते. गुरू सांदीपनींचे श्रीकृष्ण, बलराम शिष्य होते. द्रोण हे अर्जुनाचे गुरू, विश्वामित्र हे राम-लक्ष्मणांचे गुरू, आरूणि धौम्य ऋषींचा शिष्य, तर कर्ण परशुरामांचा शिष्य होय. शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या मिळविण्यासाठी कचाने दाखवलेली गुरुनिष्ठा आपण आजही धन्य मानतो. पाश्चात्य राष्ट्रातही सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो व प्लेटोचा शिष्य अॅरिस्टॉटल अशी गुरुपरंपरा आहे.


भारतीय संस्कृतीने गुरुपूजनाचे महत्त्व जाणलेले आहे. गुरू हाच परमेश्वर आहे, गुरुमाऊली आपल्या शिष्यांसाठी सदैव कृपेची सावली देत असते. गुरू हा त्रैलोक्याचा आधार असतो. हा भवसागर तरून जाण्यासाठी गुरुशिवाय दुसरा त्राता नाही. 'गुरू तोचि देव, ऐसा ठेवी भाव' असे संतांनी सांगितले आहे. 


भक्तीभावाने गुरूला शरण गेले असता शिष्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. सद्गुरूची पावले मनोभावे वंदिली असता परब्रह्माचा साक्षात्कार होतो, स्व-रूपाची ओळख पटते. सद्गुरुकृपा झाली असता मोक्षपदाची प्राप्ती होते. परिसाच्या स्पर्शाने जसे लोहाचे सोने बनते, त्याप्रमाणे गुरूच्या कृपाप्रसादाने शिष्याच्या आयुष्याचे सोने होते. असा सद्गुरूचा महिमा अगाध आहे.


चिदाकार गुरू चित्स्वरूप गुरू। 

चिन्मय सद्गुरू तव चरणम् ॥ 


असे गुरूचे यथार्थ वर्णन केलेले आहे. पंतमहाराज बाळेकुंद्री म्हणतात - 


"तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे।

विषयचिंतना टाकुनी हे मन सद्गुरुभजनी लागो रे ॥ 


या गुरूची व्यासपौर्णिमेला अथवा गुरुपौर्णिमेला पूजा केली जाते. महर्षी व्यासांना हिंदू धर्माचे पिता मानले जाते. ते जीवनाचे खरे भाष्यकार होते. ते समाजाचे खरे गुरू होते. म्हणूनच परंपरागत व्यासपूजा ही गुरुपूजा मानली गेली आणि व्यासपौर्णिमा ही गुरुपौर्णिमा मानली जाते. गुरू हा साक्षात परब्रहा. असल्याने गुरूचे पूजन हे भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. ज्ञानदानाचे पवित्र कर्तव्य करणाऱ्या गुरूला देऊ शकू अशी उपमाच त्रिभुवनात नाही. 


शिष्याला स्वत:च्या प्रतिमूर्तिरुपात तयार करणारा गुरू निरूपम आहे. गुरूची कृपादृष्टी लाभली की 'गुरुकृपांजन पायो मेरे भाई' असा आनंदाचा अनुपम ठेवा आपल्या हाती येतो आणि गुरूचा महिमा सांगताना आपले शब्द अपुरे पडतात. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद