जेव्हा यंत्रे सजीव होतात मराठी निबंध | jevha yantre sajiv hotat marathi nibandh

 जेव्हा यंत्रे सजीव होतात मराठी निबंध | jevha yantre sajiv hotat marathi nibandh

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  जेव्हा यंत्रे सजीव होतात मराठी निबंध बघणार आहोत. सध्याचे युग हे 'यंत्रयुग' आहे असे म्हणतात. कोणी म्हणते, 'आजचा मानव हा यंत्राचा गुलाम आहे.' असे सुभाषितवजा वाक्य ऐकल्यानंतर डोक्यात विचार येऊन गेला.


'हे यंत्र मानवावर हक्क कसे गाजवते ? खरंच मानवाचे धनी किंवा मालक होण्यास ही यंत्रे सजीव आहेत कां ?' माझ्या मनात असे विचार चालू असतानाच अवतीभवती कसलेतरी आवाज ऐकू येऊ लागले. डोक्यावरचा लाईट लागला, 


भिंतीवरचा फॅन सुरू झाला अन् समोरचा रेडिओही आपोआप सुरू झाला. जरां बारकाईने मी पाहू लागलो तर ही यंत्रे सजीव झाली होती. उठून सारी बटणे बंद करू लागलो तर बंद होईनात. आता तो टेपरेकॉर्डरही जोरजोरात गाऊ लागला. अन् त्यामुळे घरातील सर्व माणसेही जागी झाली.


स्वयंपाकघरात आई जाऊन पाहते तर तिथलीही सर्व यंत्रेही आपल्या आपण कामे करू लागली. केर काढू लागली. त्याबरोबर इतरही वस्तू जाऊ लागल्या.विजेची शेगडी उगाचच पेटून बसली. अहो तो 'मिक्सर' 'गरागरा' फिरू लागला, 


तशी आईसाहेबांची घाबरगुंडी उडाली. 'अरे, सुभाष काय चाललंय रे हे ? मी सर्व बटण बंद करू लागले, तर ती बंद होत नाहीत. काय करायचं रे आता ?' तेवढ्यात रेडिओतून गाणे सुरू झाले. घोषणा सुरू झाल्या."यंत्रे नसती मनुजांसाठी,, मानव आहे यंत्रांसाठी। आम्ही ना कोणाचे गुलाम, हा मानव तर अमुचा गुलाम।।


हो-हो-हो हा मानव तर अमुचा गुलाम।।" आमच्या घरातील ही गंमत दोस्तांना सांगावी म्हणून बाहेर पडलो तर त्यांच्याकडे ही तेच चालू. सगळीकडे ढळढळीत दिवे लागले, कुठे वॉशिंग मशीन तर कुठे ते कॉम्प्युटर्स, छापखान्यातील 'खटक खटक' छपाईच्या कामांनी तर सारी प्रेस हादरून गेली होती. 


चित्रपटगृह मोठमोठे कारखाने त्यातील यंत्रे काही काही थांबायला तयारच नाहीत. सगळे लोक घराघरांतून, कार्यालयांतून-इकडून तिकडून निवांतपणा, शांतपणा शोधायला बाहेर पडली. अगदी वैतागून गेली होती. पिठाच्या गिरणीतून पीठ दळणे चालूच राहिले म्हणून तर रस्त्यावरून वाहने फिरतच राहिली म्हणून, रुग्णालयात तर धमालच उडाली होती. 


शस्त्रक्रियेच्या खोलीतील यंत्रे, 'क्ष' किरणाचे यंत्र सर्वांचे फोटो काढत चाललेच आहे. सर्व माणसे हवालदिल होऊन इकडे तिकडे पळत होती. आता काय करायचे ? आकाशवाणीवरील गाणी अन घोषणा ऐकून म्हणत होती.'खरंच आम्ही गुलाम झालो आहोत या यंत्रांचे !


पहा पहा जरा यंत्रांनी या कसा ताळमेळ सोडलासे।।' या यंत्रांना कसे बरे शांत करावे ? आणि खरेच ही शांत झाली अन् बंद पडली तर आपली अवस्था काय होणार? आपण तर या यंत्रांचे गुलाम झालो आहोत, ही गोष्ट खरी आहे. आज या यंत्रांनी ताळतंत्र सोडला आहे म्हणून आपण वैतागलो आहोत. 


उद्या ही काम करेनाशी झाली, तर आपले हाल कुणी कुत्रं खाणार नाही. या सुधारलेल्या जगात... यंत्र असो अथवा मानव प्रत्येकाने आपल्या मर्यादा राखल्याच पाहिजे. मध्येच एक यंत्र स्पीकरवरून ओरडत होते... समजावत होते, 'अरे मानवा, तूच तर आम्हांला जन्म दिलास ना ! तुझ्या गरजेतून प्रयत्नांतून आम्ही तुमच्यासमोर येऊन पोहोचलो आहोत ना। 


आपल्या दोघांनाही आपापल्या मर्यादा सांभाळायला हव्यातच पण लक्षात ठेव तुझ्या कर्तबगारीचेच हे सर्व परिणाम आहेत.'तेव्हा मी जागा झालो अन लक्षात आले की ही 'यंत्रे' सामुग्री आपणच निर्माण केले. त्याची सुरुवात कधी करायची, कितपत करायची केव्हा करायची हे आपणच ठरवायला पाहिजे ना !


यंत्रे आपली कामे करीत राहणार. पण त्याचे बटण - त्याचा स्विच आपल्या हातातच आपण ठेवायचा. त्यापासून होणारे फायदे-तोटे, कल्याण-अकल्याण मानवानेच लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. मानवनिर्मित यंत्र आहे, गरजेनुसार काळानुसार सुधारणा होत राहणार. 


जग बदलत - नवनवीन यंत्रे येणार आणि ते सर्व हे 'अदभुत मानवांचीच निर्मिलेले असणार. आपण नियंत्रण आपल्याच हातात ठेवले पाहिजे. तरच यंत्र सजीव झाले तरी त्रासदायक होणार नाही.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद