पराधीन आहे जगती मराठी निबंध ।Paradhin Ahe jagati Marathi Nibandh

पराधीन आहे जगती मराठी निबंध। Paradhin Ahe jagati Marathi Nibandh 


 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पराधीन आहे जगती मराठी निबंध बघणार आहोत. महाराष्ट्रातील आधुनिक वाल्मिकी, मराठीचे भाषा प्रभू, एक थोर कवी, साहित्यिक ग. दि. माडगुळकर यांच्या सुविख्यात 'गीत रामायणा'तील हे पद, प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासात जातात, 


त्यांना परत आणण्यासाठी त्यांचे धाकटे बंधू भरत हे वनात पोहोचतात. रामचंद्रांना परत येण्यासाठी विनवितात. अतिशय दुःखी होऊन त्यांच्या वनवासाचे कारण - निमित्त आपण स्वतःच आहोत असे मानतात. स्वतःला-स्वतःच्या आईला - कैकयीला दोषी ठरवतात. त्या प्रसंगी प्रभू रामचंद्रांनी भरताची समजूत वरील काव्यपंक्तीतून केली आहे. हे पद -


दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा।

पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा।। 

या दोन पंक्तींनी सुरू होते. त्यातूनच मानवी जीवनाच्या नश्वरतेचा-क्षणभंगुरतेचा, सर्व काही दैवानेच घडते. त्यापुढे आपले काहीही चालत नाही, असा महान-चिरंतन टिकणारा संदेश दिला आहे. जणू या दोन पंक्ती म्हणजे फक्त गीतरामायणाचाच नाही तर मानवीजीवनाचाच एक महान सिद्धांत ठरला आहे. 


अतिशय समर्पक शब्दात आपले 'मानवी जीवन' किती क्षणभंगुर लवचिक आहे ! कोणत्या क्षणी काय होईल याचा कोणालाही ठावठिकाणा किंवा पत्ता असतो असे नाही, जे घडायचे ते त्या त्या वेळी घडणारच. त्याला आपण मानव काही अडवू शकत नाही किंवा बदलू शकत नाही. 


त्याबाबत आपण खरोखरीच पराधीन आहोत. दुसरा-तिसरा कोणी नाही तर नशिबाच्याच... दैवाच्याच अधीन आपण आहोत. तेव्हा हे भरता, तू दोष स्वतःला का घेतोस ? 'यामध्ये ना तुझा-माझा-कैकयी मातेचा, ना पित्याचा, कोणाचाच दोष नाही. आपण दैवात जे घडत राहणार, त्याला सामोरे जाण्याचे धाडस दाखवायचे हेच खरे,' असा उपदेश केला आहे.


अत्याधुनिक काळातही मानवाने कितीही प्रमाणात आणि कोणत्याही क्षेत्रात निसर्गावर मात केली असे म्हटले तरी आजही मानव हा नशिबाचाच.दैवाचाच गुलाम आहे, यात शंका नाही. प्राचीन काळापासूनची अनेक उदाहरणे आपल्याला हेच पटवून देत असतात.

देह प्रारब्धावर ठेवावा, यत्न अखंड करावा।

सदा आनंद मानावा, चित्त शांत ठेवुनी।। 

पृथ्वीतलावर होऊन गेलेले महापराक्रमी जगज्जेता अलेक्झांडर असो किंवा उन्मत्त, सर्व ग्रहताऱ्यांना, ऋषिमुनींना आपल्या आधिपत्याखाली आणणारा रावण असो, वेळ आल्यावर, दैव फिरल्यावर एक क्षणही या धरतीवर टिकू शकले नाहीत. 


देव असोत किंवा दानव, राम-कृष्ण असोत किंवा महाभयंकर नरकासूर, हिरण्यकशिपू कोणीही असो एका क्षणाच्या फटकाऱ्याने सर्वांचे नशीब फिरते...संकटे येतात.. रावाचा रंक होतो तर कधी वाल्याचा वाल्मिकी होतो. काळ फिरला की फासे फिरतात. जीवनचक्र फिरते... 


निसर्गाने तर आपली ताकद आपल्या हातात ठेवलीच आहे. एका क्षणात त्सुनामीच्या भयंकर लाटा आल्या अन् देशाच्या देश हजारो लोक उद्ध्वस्त झाले. घरातून बाहेर पडताना त्या भागातील लोकांना, पुसटशी तरी कल्पना असते का ? क्षणार्धात दैव फिरते आणि सर्व साधनसंपत्ती - माझी माझी म्हणायची ती मातीमोल होऊन जाते.

दैव जाणिले कुणी, 

जैव जाणिले कुणी।

लवकुशांचा हलवी पाळणा,

 सती जानकी वनी।। 

असे म्हटले जाते. १९६२ साली महाराष्ट्रातील पुण्यात पानशेतचे धरण फुटले अन् काय सांगायचे ? शेकडो वर्षे नदीकिनाऱ्यावर राहणाऱ्या पुणेकरांचे होत्याचे नव्हते, बघता बघता झाले. याला काय म्हणायचे तर 'दैव'च.


पृथ्वीतलावर अशाप्रकारे महापूर-भूकंप, कडक उन्हाळा, अन् कडक थंडी यांच्यामुळे हजारो लोक बळी जातात. मी, मी म्हणणारे काही काही करू शकत नाहीत. त्याचीही पर्यावरणाची काही कारणे आधुनिक शास्त्रज्ञांनी शोधली आहेत. त्यामुळे त्या वेळेला जे घडणार त्याला थोड्याफार प्रमाणात आपण अटकाव करू शकू, परंतु तेही 'देव' चांगले असेल तरच.


अवकाश यानांतून भ्रमण करणारी 'कल्पना चावला', अखेरीस दुर्दैवीच ठरली ना ! अस्मानी असो किंवा सुलतानी सकट असो ज्याचा नशिबाचा भाग चांगला तो वाचतोच. एवढ्या मोठ्या महापुरातही झाडावर अडकलेल्या एका झोपाळ्यात


छोटेसे बालक दोन दिवसांनीही जिवंत सापडते. क्षणासाठी सामान आणण्यासाठी बाहेर पडलेला घरातला एक बारा व मुलगा फक्त वाचतो, बाकी सर्व लाटेच्या तडाख्यात नाहीसे होतात.


परंतु तरीही... मित्रहो, 'असेल हरी... तर वाचवेल घरच्या घरी' असे म्हणून हातावर हात ठेवून बसू नये. बदलत्या काळात या विज्ञान युगात - भूकंपाची कारणे, महापुरापासून संरक्षण करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान, युद्धापासून वाचण्यासाठी जय्यत तयारीची अत्याधुनिक शस्त्रास्त्रे-साधने यांचा उपयोग तारतम्याने करायचाच. 


कल्याणकारी योजना राबवायच्याच, मानवी जातीचे कल्याण सर्व प्राणिमात्रांचे हित लक्षात ठेवून केवळ दैवावर हवाला ठेवून चालणार नाही. 'प्रयत्न' हे चालू ठेवायचेच.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद