आमचे घरमालक मराठी निबंध | Aamche Gharmalak Essay IN Marathi

  आमचे घरमालक मराठी निबंध | Aamche Gharmalak Essay IN Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आमचे घरमालक मराठी निबंध बघणार आहोत.  'वेडी माणसं घर बांधतात आणि शहाणी माणसं त्यात राहतात. असे पूर्वी मानले जात असे. आम्ही एका वाड्यात राहतो. वाडा तसा जुनाच. त्यामुळे वाड्याची रचनादेखील पूर्वीसारखीच. 


आमच्या वाड्याचे घरमालकदेखील आमच्याच नव्हे आम्ही त्यांच्या वाड्यात राहतो. घरमालक मोठे कर्मठ आहेत. त्यांचे सोवळे-ओवळे खूप असते. देवधर्म, पूजाअर्चा, कुळधर्म, कुळाचार हे सगळे त्यांच्या घरी असते. अमोहोत्रदेखील!


आमच्या घरमालकांना सगळे 'अण्णा' म्हणतात. अण्णा म्हणजे जुन्या वळणाचे. धोतर, कोट, टोपी हा त्यांचा पेहराव. कानांत भिकबाळी, शेंडी राखलेली, चेहरा उग्र आणि आवाज पहाडी. त्यामुळे वाड्यात ते आहेत किंवा नाहीत, हे लगेचच समजते. त्यांचे बोलणे फार फटकळ, सडेतोड. भाडे देण्यासाठी जावे लागते, तेवढाच त्यांच्याघरात इतरांना प्रवेश. 


घरात त्यांचा दरारा. ते म्हणतील, तसेच घरातील सदस्यांनी वागले पाहिजे, असा त्यांचा हुकूम.वाड्यातील सर्वच जण त्याना वचकून असतात. रात्री उशिरा कोणी वाड्यात आलेले त्यांना बिल्कुल खपत नाही. दिंडी-दरवाज्याला रात्री कुलूप. ११ नंतर कोणीही यायचे नाही, हा त्यांचा नियम. कधी कोणाला उशीर होणार असेल, 


तर त्यांनी आधी अण्णांच्या कानावर घातले, तरच किल्ली मिळणार. त्यांच्या भीतीने आमच्या घरातील सर्वच सदस्य घरी लवकर परततात. कोणाच्या घरी कोण येते, कोण जाते, याची त्यांना वित्तंबातमी असते. कोणाच्या घरात भांडण झाले, तर त्यांची काही खैर नाही. अण्णांचा नुसते काय?' एवढाच शब्द पुरेसा असतो. 


त्यामुळे घरातील कर्त्या पुरुषाचा धाक असेल, तर कोणाची वावगे वागायची हिंमत होत नाही. तशीच वाड्यातील समस्त लोकांची मानसिकता असल्याने सर्वांना एक प्रकारची शिस्त आहे; एक प्रकारचे वळण आहे.


दिवाळीत पहाटे वाड्यात सनई वाजणार. त्यानंतर भूपाळ्या. सर्वांच्या आंघोळी अगदी पहाटे होणारच. दिवाळीच्या पहिल्या दिवशी मात्र सकाळीच अण्णा वाड्याच्या चौकात सर्वांसाठी फराळाची व्यवस्था त्यांच्या खर्चाने करणार. नंतर धुंधुरमासात एकदा पहाटे सर्वांना भोजन असे. गरम मऊ-मऊ खिचडी ते स्वत: सगळ्यांना वाढत.


 कोणाच्याकडे काही अडचण असली, तर ते धावून येणार. त्यांच्या ओळखी तर अफाट ! त्यांच्या ओळखीचा फायदा सगळ्यांना होणार. त्यांना जडीबुटीच्या औषधांची माहिती; त्यामुळे सहसा वाड्यात कोणाकडे डॉक्टरांचा वावर नाही. किरकोळ दुखणे तर चुटकीसरशी गायब!


असे अण्णा पाहताक्षणी रागीट वाटतात. सुरुवातीला तर आम्ही त्यांना 'हिटलर अण्णा'च म्हणायचो. पण वरून फणसासारखे काटेरी वाटले, तरी आतून गोड गऱ्यासारखे त्यांचे अंत:करण आहे. ते कोणाशी विशेष सलगी करत नाहीत,


प्रेमाचे नाटक करत नाहीत, कसलाही आव आणत नाहीत; पण माणूस म्हणून ते खूपच चांगले आहेत. खरेच ते आम्हा सर्वांच्या घराचे मालक आहेत. आता वाटते, ह्या वाड्यात राहायला आलो, हे पूर्वसंचितच. ही वास्तू पवित्र बनलीय अण्णांमुळेच. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद