मानवता हाच खरा धर्म मराठी निबंध | Manavta Hach Khara Dharma Nibandh in Marathi

 मानवता हाच खरा धर्म मराठी निबंध | Manavta Hach Khara Dharma Nibandh in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मानवता हाच खरा धर्म मराठी निबंध बघणार आहोत. सानेगुरुजी म्हणतात, 'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे।'माणसाने माणसाशी माणसारखे वागणे, त्याच्यावर प्रेम करणे हाच मानवाचा खरा धर्म. प्रत्येकाने हा धर्म पाळला पाहिजे. 


आपल्यापुढे अशी अनेक उदाहरणे आहेत, की ज्या महान व्यक्तींनी आपले सारे आयुष्य मानव सेवेसाठी खर्च केले आहे. मदर तेरेसा ह्या युगोस्लोव्हियन असूनही भारतीय अनाथ, अपंग मुलांची माता बनल्या. सारे आयुष्य त्यांनी अशा मुलांसाठी खर्च केले. 


बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन करून त्यांच्यातील जगण्याची जिद्द, ऊर्मी वाढविली. अशा बांधवांसाठी खऱ्या अर्थाने 'आनंदवन' स्थापन करून त्यांच्यातील हरविलेला आनंद त्यांना पुन्हा मिळवून दिला. त्यांच्याच मुलांनी - प्रकाश व विकास यांनी वडिलांचाच वारसा पुढे चालविला. 


त्यांच्या सुनादेखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मानवताधर्म निभावण्यासाठी सिद्ध झाल्या.सारी माणसे एकाच ईश्वराची लेकरे आहेत. सर्वांच्यात एकाच रंगाचे रक्त वाहते आहे, सर्वांची शरीररचना तशीच आहे. असे असताना माणसानेच माणसांच्यात पंथ, धर्म, उच्च-नीचतेच्या भिंती उभ्या केल्या आहेत. त्यावरून भांडणे होताहेत. 


ही गोष्ट म्हणजे मानवताधर्माला ग्लानी आणणाऱ्या आहेत. अशी विषमता मानवी विकासात अडसर ठरत आहे. पूर्वी समाजात कर्मठ माणसे होती. कर्मकांडाच्या नावाखाली आपल्याच समाजबांधवांना ती त्रास देत होती, त्यांना मानवी हक्कांपासून वंचित ठेवले जात होते; वाळीत टाकले जात होते. 


अशाही परिस्थितीत सर्व संतांनी मानवताधर्माची शिकवण दिली आणि स्वत:च्या आचरणातून सर्वांसमोर आदर्श ठेवला. संत एकनाथांनी वाळवंटात पोळत असलेल्या दलित मुलाला उचलून घेतले. संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाची स्थापना करून सर्वांना त्यात सामावून घेतले. 


संत तुकारामांनी भेदाभेदाला अमंगळ म्हटले.शिवाजीमहाराजांनी मानवतावादाचा पुरस्कार केला; म्हणूनच त्यांना जीवाला जीव देणारे मावळे मिळाले. ते त्यांच्या सोबत होते; म्हणूनच ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. त्यांच्या पदरी असलेला एकेक मावळा हा नरदुर्ग होता. 


अशी उदाहरणे डोळ्यांसमोर ठेवून लोक त्याचा आदर्श घेत नाहीत. त्यामुळेच आज भांडणे, मारामाऱ्या, चोऱ्या यांचे प्रमाण वाढत आहे. 'नरेचि केला हीन किती नर' असे म्हणावे लागते. 


अशी काही अधम माणसे पाहिल्यावर बहिणाबाईंनी सवाल केला, "अरे माणसा, माणसा, कधी होशील माणूस तू?" धर्मा-धर्मातील लोक परस्परात भांडताना पाहिले की वाटते, एकाच प्रभूची लेकरे असून त्यांच्यात भेदाभेद का? अशी भेदाभेदाची भावना मानवी शक्ती कमी करते, संघटनशक्ती कमी होते व त्याचा फायदा शत्रूराष्ट्र उठवते.


देशावर कोणतेही संकट आले, की सर्व भारतीय एक होऊन एकमेकांना मदतीचा हात देतात. वर्तमानपत्रातून कोणातरी रुग्णाच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केलेले असते; तर कधी होतकरू अनाथ मुलाला शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा ओघ येतो. 


पूर, भूकंप, वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतीचा हात पुढे येतो. तेव्हा वाटते, खरंच मानवताधर्म अजून जिवंत आहे. रक्तदान, नेत्रदान, देहदान यासारख्या कल्पनांना मूर्त रूप प्राप्त होते, 


सामाजिक संस्था पुढे सरसावतात, तेव्हा पटते, मानवताधर्म हाच खरा धर्म. दु:खद किंवा करुण प्रसंगी"मन असं भरून येतं, डोळ्यांतून झरून येतं, डोळ्यांत जेव्हा आसवं असतात तेव्हाच माणसं, माणसं असतात!" मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद