राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध | Rashtriya Ekatmata Marathi Nibandh

 राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध | Rashtriya Ekatmata Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध बघणार आहोत. "भिन्न वेष, भिन्न भाषा, भिन्न धर्मरीती भिन्न पथ, भिन्न पंथ, तरीही एक संस्कृती।" भारत एक खंडप्राय देश आहे. येथे निसर्गाची विविधता आहे. माणसांच्या जीवनपद्धतीतही विविधता आढळून येते. 


भाषा, पंथ, वेशभूषा, रीति-रिवाज, आहारविहार, आचार-विचार यांतही भिन्नता आढळून येते. असे असले, तरी इथल्या संस्कृतीचे वस्त्र मानवतेच्या धाग्यांनी विणलेले आहे. आमच्या संस्कृतीची शिकवण सहिष्णुतेच्या पायावर आधारलेली आहे. 


इथला इतिहास, सांस्कृतिक वारसा राष्ट्राला एकात्मता प्रदान करणारा आहे. कारण, राष्ट्रातील विविधतेतूनही एकात्मतेचे दर्शन घडते. धर्मांनीही पवित्र मानलेल्या नद्या, पर्वत, नगरे, तीर्थक्षेत्रे भारताच्या एकाच भागात नसून सवत्र विखुरलेली आहेत. 


त्यामुळे अनेक प्रकारचे भेद असूनही भारतीयत्वाची कल्पना प्राचीन आहे. भारताची एकात्म संस्कृती हाच एकात्मतेचा पाया आहे.अशा ह्या प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या देशावर इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले. त्या काळात देशाची जास्तीत जास्त पिळवणूक, शोषण केले. 


'फोडा आणि झोडा' या नीतीचा त्यांनी अवलंब केला. लोकां-लोकात फूट पाडली. धर्मा-धर्मात झुंज लावली. त्यामुळे फुटीरता निर्माण करून भारताची फाळणी केली. भिन्नत्वाची ही भावना भारतीय एकात्मतेस अडथळा ठरू लागली.  राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी राष्ट्रीय वृत्तीची जोपासना करणे गरजेचे होते. 


त्याशिवाय राष्ट्राचे सामर्थ्य वाढणार नाही. जोपर्यंत सामर्थ्य वाढणार नाही, तोपर्यंत राष्ट्रीय एकात्मता साधणार नाही. यासाठी समाजात प्रबोधन घडवून आणण्याची गरज होती. अनेक भारतमातेच्या तेजस्वी पुत्रांनी हे काम केले व देशातील एकात्मतेला बळ दिले त्यामुळे भारतमातेच्या पायातील शृंखला गळून पडल्या व भारत स्वतंत्र झाला. 


आज भारत स्वतंत्र होऊन साठ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आजही शत्रूच्या कारवाया चालूच आहेत. शत्रू अधून-मधून डोके वर काढत आहे. घरभेदीही आहेतच. दहशतवादाच्या भोवऱ्यात देश फिरत आहे. अशा वेळी भारतातील सर्व नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. 


दरवर्षी केवळ राष्ट्रीय सण साजरे करून भागणार नाही; तर सामाजिक परिवर्तन, आर्थिक प्रगती, शांततामय जीवन, जगात देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. 'आम्ही सारे भारतीय आहोत', अशी केवळ प्रतिज्ञा करून चालणार नाही; तर अंत:करणापासून तसे वाटले पाहिजे. 


तेव्हाच 'बलशाली भारत होवो, विश्वात शोभूनी राहो' या ध्येयाकडे वाटचाल करता येईल.जेव्हा भारतावर परचक्र येते, तेव्हा सारा भारत सर्व भेदभाव विसरून एक होतो. आमचे सैनिक देशासाठी अगदी प्राणपणे लढतात. 


तसेच, प्रत्येक भारतीय भ्रष्टाचार, चोरटी आयात, निर्यात, देशद्रोह यासारख्या गोष्टींपासून दूर राहील नि 'देश माझा, मी देशाचा' ही भावना अंगी बाणवेल, तेव्हा भारत जगात श्रेष्ठ देश ठरेल. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद