माझ्या आजोबांचा मित्रपरिवार मराठी निबंध | MAZYA AAJOBANCHA MITRHPARIVAR ESSAY IN MARATHI

माझ्या आजोबांचा मित्रपरिवार मराठी निबंध | MAZYA AAJOBANCHA MITRHPARIVAR ESSAY IN MARATHI

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझ्या आजोबांचा मित्रपरिवार निबंध बघणार आहोत. माझे आजोबा हायकोर्टात जज होते. निवृत्त झाल्यावर त्यांचा वेळ कसा जाणार, अशी घरातल्या सगळ्यांनाच चिंता वाटत होती. एवढे वक्तशीर आजोबा; पण आता ते खूप बदलले आहेत. 


कोणतीही गोष्ट त्याच वेळेत झाली पाहिजे, हा त्यांचा आग्रह आता ढिला पडला आहे. परिस्थितीनुसार बदलेले पाहिजे, असे म्हणत कोणालाही आपला त्रास नको; म्हणून स्वत:ची कामे ते स्वत:च करतात. आजोबांच्या मित्रपरिवारावर ते अगदी बेहद खुश असतात. 


सगळे आमच्याच सोसायटीतले. एक आहेत दिघेकाका. ते आजोबांचे खास दोस्त. दोघे सतत एकमेकांच्या संपर्कात असतात. दोघेही एकमेकांसाठी केव्हाही उपलब्ध असतात. दिघेकाका बँकेत मॅनेजर होते. दोघांचा पेशा भिन्न असला, तरी त्यांच्यात खूप घट्ट मैत्री आहे. 


दिघेकाका घरात आले, की घर नुसते चैतन्याने भरून जाते. त्यांचा दिलखुलास स्वभाव, खळखळून हसणे, सर्वांच्यात मिळून-मिसळून वागणे, सगळ्यांनाच खूप आवडते. दोघेही दररोज पहाटे भ्रमंतीसाठी बाहेर पडतात आणि लांब फेरफटका मारून मग बागेत येतात. 


बागेत त्यांचे इतर मित्र त्यांना भेटतात. सगळे मिळून बागेत व्यायाम करतात आणि नव्या-नव्या योजना आखतात. त्यांचे दुसरे मित्र म्हणजे मेजरकाका. मेजरकाकादेखील खूप गप्पीष्ट. युद्धभूमीवरच्या कथा रंगवून सांगाव्यात, त्या मेजरकाकांनीच. त्यांच्या तोंडून त्या कथा ऐकल्यावर त्यांच्याबद्दलचा अभिमान खूप वाढतो. 


एवढे सैन्यदलात असूनही त्यांना कसलेही व्यसन नाही; कसलाही गर्व नाही. आजोबांचे तिसरे मित्र म्हणजे गोखलेकाका. गोखलेकाका विद्यापीठात प्राध्यापक होते. तत्त्वज्ञान हा त्यांचा विषय. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारायच्या म्हणजे खूप माहितीचा संग्रह गोळा केल्यासारखे असते.

 

त्यांच्या बोलण्याची तहा खूप वेगळी आहे. समोरच्याचा प्रतिसाद घेतल्याशिवाय ते पुढे बोलत नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना नीट कान ऐकावेच लागते; नाहीतर उपटलेच त्यांनी कान ! त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती वाटते.


अशाप्रकारे दिघेकाका, मेजरकाका, गोखलेकाका आणि माझे आजोबा अगदी एकमेकांचे चांगले मित्र आहेत. कोणत्याही वयात मित्रपरिवार असावाच लागतो. चांगले मित्र असणे, हे खरेच खूप भाग्याचे असते. या मित्रांमुळे आजोबांना एकटेपणा कधीच जाणवत नाही. 


ते चौघे एकत्र येऊन कधी छोट्या सहलींचे आयोजन करतात, कधी कॅरम खेळतात, बुद्धिबळ खेळतात आणि एखादा उत्तम चित्रपट बघतात. नियमित गाठीभेटी, गप्पाटप्पा, व्यायाम, भ्रमंती यातून हा मित्रपरिवार खूप आनंद मिळवतो. अधून-मधून त्यांची चहापार्टी असते.


एकमेकांच्या सहवासात हे सारेच आयुष्याची संध्याकाळ मजेत घालवतील. स्वतः आनंदी राहून इतरांनाही आनंद देतील. अशी मित्रमंडळी तुम्हा-आम्हा सर्वांना मिळो आणि मैत्रीची होडी लीलया पैलतीर गाठो, हीच प्रार्थना! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद