मी शिक्षण मंत्री झालो तर मराठी निबंध | Mi Shikshan Mantri Zalo Tar Essay In Marathi

 मी शिक्षण मंत्री झालो तर मराठी निबंध | Mi Shikshan Mantri Zalo Tar Essay In Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  मी शिक्षण मंत्री झालो तर मराठी निबंध बघणार आहोत. मानवी जीवनात शिक्षणाला फार महत्त्व आहे. उत्तम शिक्षणावरच समाज आणि राष्ट्र यांची प्रगती अवलंबून असते. शिक्षणपद्धती कशी असावी, त्यात कोणते व कसे बदल घडवून आणायचे, हे शिक्षणमंत्री ठरवत असतात. 


मला कधी-कधी वाटते, आपण शिक्षणमंत्री व्हावे. खरेच तसे झाले ना, तर मी शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणेन.सगळ्यात प्रथम मी आजची रटाळ शिक्षणपद्धती बदलून टाकेन. शिक्षण हे आनंददायी असले पाहिजे. शिक्षण घेणे गरिबांना परवडत नाही. 


अनेकदा हुशार विद्यार्थी आर्थिक परिस्थितीअभावी उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. कधी-कधी तर कोवळ्या वयातील मुलांना अर्धवेळ काम करून परीक्षेचा अभ्यास करावा लागतो. ज्याच्या जवळ गुणवत्ता आहे; पण पैसा नाही, अशा विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा देईन. 


बऱ्याचदा धनदांडगी मुले गुणवत्ता नसतानाही केवळ पैशाच्या जोरावर शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थीप्रिय कोर्ससाठी नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. पण ते शिकत तर काहीच नाहीत; उलट कॉलेजमध्ये इतरांना त्रास देऊन वेठीला धरतात. अशा वेळी वाटते, काय हा शिक्षणाचा खेळखंडोबा ! तो मी पहिला बंद करीन.


आजकाल प्रत्येकाला एकाच प्रकारचे शिक्षण सक्तीने घ्यावे लागते. बऱ्याचदा नावडत्या विषयांचा अभ्यास करावा लागल्यामुळे शिक्षण कंटाळवाणे वाटते. त्यामुळे अपयश पदरात पडते. मग निराश होऊन मुले शाळा सोडतात. अशा वेळी वाटते, शाळेतील अभ्यासक्रमात आवडीचा विषय शिकण्याची सुविधा का नसावी? 


चित्रकला, शिल्पकला, फोटोग्राफी, संगीत, वाद्यवादन, हस्तकला, लघुउद्योगासाठी विविध वस्तू तयार करणे, बेकरी, बागकाम, शेती, मत्स्य-व्यवसाय, कुक्कुटपालन यासारखे कितीतरी विषय लहानपणापासून शिकविले, तर मुलगा मोठेपणी त्या त्या कलेत पारंगत होईल. 


हे शिकवताशिकवता त्याला अक्षर-ओळख, भाषा, गणित हे विषय शिकवावेत. सध्या कार्यानुभव हा दुय्यम विषय आणि अभ्यासाचे विषय मुख्य आहेत. मी शिक्षणमंत्री झाल्यावर हे चित्र नक्कीच बदलून टाकेन. हो, आणि सर्व शिक्षण संगणकीय पद्धतीने देण्याची सोय करेन.


पूर्वी कुटुंबातील व्यवसायात मुले लहानपणापासूनच तरबेज असायची. आता त्याच पद्धतीने अत्याधुनिक तंत्राचा वापर करून शिक्षण दिल्यास समाजाला त्याचा अधिक लाभ होईल. अशा शिक्षणासाठी खर्च खूप लागतो. त्याची तरतूद करून मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था करेन. त्यात परिस्थितीनुसार योग्य तो बदल करेन.


आजकाल इंग्रजी माध्यमाचे महत्त्व वाढत चालले आहे. त्याऐवजी मातृभाषेतन प्राथमिक शिक्षण अनिवार्य करेन आणि परकीय भाषा ऐच्छिक असतील. उत्तम वाचन करण्यासाठी उत्तम पुस्तके कमी किंमतीत उपलब्ध करून देईन. त्यातून वाचन-संस्कतीचा विकास होईल. 


परीक्षेसाठी पुस्तक-परीक्षण असा एक विषय ठेवेन. ज्याचे वाचन अधिक. त्याला अधिक गुण दिले जातील. प्रशस्तिपत्रके, प्रगती पुस्तके यातील गुण केवळ लेखी परीक्षेतील नसतील; तर त्यात आरोग्य, चारित्र्य, कला, मूल्ये, सामान्यज्ञान यांचाही विचार केलेला असेल. 


कामचुकार किंवा गुणवत्ता नसलेले शिक्षक नोकरी करण्यास अपात्र ठरविले जातील. या क्षेत्रात येणारा प्रत्येक शिक्षक सक्षमच असला पाहिजे, असा आग्रह धरेन.विद्यार्थ्यांना कसलेही, वाटेल ती फॅशन असलेले कपडे घालण्यास बंदी असेल. 


गणवेशामुळे समता निर्माण होते, त्यातून एकतेचे दर्शन होते, हा विचार मी विद्यार्थ्यांना पटवून देईन. पण त्याबरोबर गणवेश-खरेदीतून संस्था फायदा उठवतात, त्यावर मात्रअंकुश ठेवला जाईल. मुलींसाठी व मुलांसाठी योग्य असाच गणवेश असला पाहिजे, असा माझा आग्रह नक्कीच असेल.


सर्वात प्रथम मुलांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे उतरवून त्याजागी आवडीचे ओझे येईल, याची व्यवस्था करीन. केवळ चार भिंतींतील बंदिस्त शिक्षण, घोकंपट्टी व स्मरणशक्तीवर आधारित शिक्षण बंद होईल. मुलांच्या कलागुणांना व अभिरुचीला वाव मिळेल, याची दक्षता घेईन. 


मनोरंजनातून शिक्षण, आनंदासाठी शिक्षण, जीवनोपयोगी शिक्षण, अशी त्रिसूत्री असेल. अरे हो, हे सगळे केव्हा? जर मी शिक्षणमंत्री झालो तर....मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद