फोन बंद झाले तर.मराठी निबंध | Phone Band Zale Tar Essay In Marathi

 फोन बंद झाले तर.मराठी निबंध | Phone Band Zale Tar Essay In Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण फोन बंद झाले तर मराठी निबंध बघणार आहोत. 'गरज ही शोधाची जननी!' असे म्हणतात. खरंय ! जीवन आहे, गती आहे आणि गतीच्या बरोबर योग्य दिशेने प्रगती करतो, तो मानव. माणसाने स्वत:च्या सुखासाठी अनेक शोध लावले. 


अलेक्झांडर ग्रॅहम बेल याने टेलिफोनचा शोध लावला. आज सर्व जगभर टेलिफोनचे जाळे पसरले आहे. त्यामुळे आपण जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यांतील व्यक्तीशी काही सेकंदांत संपर्क साधू शकतो. आंतरराष्ट्रीय संपर्कसेवा हा देशाच्या, राज्याच्या संपर्क-यंत्रणेतील एक महत्त्वाचा भाग आहे. या सेवेचे प्रमुख केंद्र मुंबई येथे आहे.


या कामासाठी विदेश संचार निगम लि. ची स्थापना करण्यात आली. बाहेरील देशांशी तार, दूरवाणी, टेलेक्स, रेडिओ-फोटो, आंतरराष्ट्रीय दूरदर्शन, रेडिओकार्यक्रमांची देवाण-घेवाण या सेवा उपग्रहांमार्फत दिल्या जातात.


आज टेलिफोन नित्य गरजेची बाब बनलेली आहे. आपल्या आयुष्याचा तो आता अविभाज्य घटक आहे. जग विस्तारत आहे; पण तरीही या टेलिफोनमुळे जग अधिक जवळ आले आहे. डाक विभागातर्फे पाठविलेला निरोप पोहोचायला वेळ लागतो. पण टेलिफोनवरून मात्र लगेच संपर्क साधून महत्त्वाचा निरोप त्वरित दिला जातो. 


आता भ्रमणध्वनी म्हणजे सहज उपलब्ध असलेली गोष्ट. प्रत्येकाच्या खिशात मोबाइल फोन हा असतोच. क्षणात संपर्क साधणे आता सहजशक्य झाले आहे. आता सांगा, इतका सवयीचा झालेला टेलिफोन जर बंद झाला तर! वाटले ना किंचाळावेसे? टेलिफोन म्हणजे आपल्या श्वास घेण्याइतका आवश्यक बनला आहे. 


एखाद्याला सांगितले की, तू तुझा श्वास बंद ठेव, तर काय होईल? होईल ते शक्य ? श्वास बंद म्हणजे जीवनसमाप्तीच! आज या फोनची इतकी सवय झालीय, की बस! फोन बंद म्हणजे गोंधळाची अवस्था. आजकाल दूरदूरची अंतरे लक्षात घेता कोणाकडेही जाताना प्रथम फोनवरून संपर्क साधला जातो. 


पूर्वसूचनेशिवाय कोणाकडेही जाणे फारच कठीण. आजकाल रिक्षा किंवा अन्य वाहनातून प्रवास करणे देखील फारसे सोईचे राहिलेले नाही. रस्त्यातील वाढती गर्दी, वाढते प्रदूषण यामुळे लागणारा वेळ अधिकच वाढेल. बऱ्याच वेळा वयस्कर लोकांना आप्त-स्वकीयांकडे जाता येत नाही. अशा वेळी ते फोनवरून त्यांच्याशी बोलून समाधान मानतात. 


दुधाची तहान ताकावर भागवल्यासारखे आहे; पण अजिबात भेट न होण्यापेक्षा बरे! बऱ्याच वेळा कोणतीही तात्काळ सेवा घेण्याची वेळ येते. उदाहरणार्थ, डॉक्टरांची पूर्वसूचना देऊन घेतलेली भेट. त्यासाठी फोन खूप उपयुक्त ठरतो. 


पण फोन बंद झाला 'तर... डॉक्टरांकडे खूप प्रमाणात रुग्ण आले तर... किती गोंधळ होईल? कोणालाच योग्य उपचार मिळणार नाहीत. तसेच, आज आपण गॅसची नोंदणीदेखील फोनवरून करतो. घरात बसल्या-बसल्या कितीतरी गोष्टींची नोंदणी करू शकतो. त्यामुळे वेळ वाचतो, श्रम वाचतात आणि पैसे वाचतात. हो, आणि रस्त्यातील गर्दी? तीदेखील कमी होते.


टेलिफोन बंद झाले, तर नित्याने वाजणारी ती रिंगटोन ऐकायला न मिळाल्याने कसे चुकल्या-चुकल्यासारखे वाटेल. प्रगती हे माणसाचे खरे लक्षण. असे असताना तो फोन बंद पडू देईलच कसा? सुखाची सवय झाल्यावर, त्यापासून दूर जाणे म्हणजे शिक्षाच ना? 


पुढे टाकलेले पाऊल पुढेच जाण्यासाठी असते. आता मागे फिरणे नाही. फोन बंद झाले तर... ही कल्पनादेखील नको. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद