पर्यटनाचे फायदे मराठी निबंध | Tourism Advantages Essay In Marathi

  पर्यटनाचे फायदे मराठी निबंध | Tourism Advantages Essay In Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पर्यटनाचे फायदे मराठी निबंध बघणार आहोत. पर्यटन म्हणजे प्रवास. आधुनिक काळात पर्यटन हा एक स्वतंत्र राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योग म्हणून विकसित झाल्याने पर्यटन करणाऱ्याची संख्या वाढली. 


देशाटन करून पुराणवस्तू, इतिहासप्रसिद्ध व निसर्गरम्य स्थळे, प्राचीन कला-निर्मितीची केंद्रे, पवित्र तीर्थक्षेत्रे, प्रचंड औद्योगिक व इतर प्रकल्पांचे आकर्षण, ही पर्यटनामागील मुख्य प्रेरणा होय. 


निसर्गनिर्मित व मानवनिर्मित रम्य, भव्य असे इहलोकीचे सौंदर्य सर्वांसाठी आहे. 'केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार पंडित मैत्री, सभेत संचार' याची संधी मिळते. आजकाल पर्यटन करण्यामागे विविध उद्देश असतात.


पर्यटनकाळ हा मर्यादित असतो.नियोजित कालावधीत पर्यटन केले जाते. प्रेक्षणीय स्थळे पाहणे, आरोग्यधामात विश्राम, अभ्यास व संशोधन करणे, सदिच्छा भेटी देणे, इ. उद्देश असतात.आता पूर्वीसारखे पर्यटन करणे कठीण राहिलेले नाही. प्रवास करण्यापूर्वी आपण उत्तम नियोजन करण्यास शिकतो. 


तरीही काही अडचणी आल्यास त्यातून मार्ग कसा काढायचा, हेदेखील शिकतो. अशा अडचणीच्या वेळी सहकार्याची भावना वाढीस लागते. बराच वेळ एकमेकांच्या सहवासात राहिल्याने एकमेकांचे स्वभाव कळतात.


गप्पा मारताना एकमेकांशी ओळख आपोआप होते व त्यातून एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण होते. त्यातून समविचारी लोकांशी मैत्री होते.प्रवासात आपल्याला अनेक सवयींना मुरड घालावी लागते. कोठेही राहण्याची, झोपण्याची, मिळेल ते खाण्याची सवय होते. 


त्यामुळे आवडी-निवडींवर बंधने येतात. तडजोड करण्याची सवय लागते. प्रवासामुळे अनुभवसमृद्धता येते. नवनवीन गोष्टी, नवनवीन प्रदेश पाहायला मिळतात. त्यामुळे एक प्रकारची सौंदर्याची नवी दृष्टी मिळते. 


विविध प्रकारची भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक स्थळे पाहिल्याने माहितीसंग्रह वाढून ज्ञानात भर पडते. शिवाय, विरंगुळा मिळून आपण ताजेतवाने होतो.ठिकठिकाणी असलेले लोकजीवन, तेथील उद्योगधंदे, तेथील जीवनशैली यांची ओळख होते. प्रत्येक ठिकाणच्या खाद्यपदार्थांची खासियत असते. 


त्यांचा आस्वाद घेता येतो. पर्यटनाच्या निमित्ताने विविध देशांतील लोक एकत्र येऊ शकतात. त्यातून आंतरराष्ट्रीय सदिच्छा व सामंजस्य यांची वाढ होते आणि राष्ट्रीय एकात्मता साधण्यास मदत होते. असे अनेक पातळ्यांवरील आनंद वाढविणारे पर्यटन मानवी जीवनात खूप फायदेशीर टरते. म्हणूनच म्हणतात -


'सैर कर दुनिया की गाफील, जिंदगानी फिर कहाँ? 

जिंदगानी गर बचे, तो नौजवानी फिर कहाँ ?

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद