चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध | Chandani Ratarichi Sahal essay marathi

चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध  | Chandani Ratarichi Sahal essay marathi

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध बघणार आहोत.या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. भारतीय लोक मराठी कालगणनेनुसार सहा ऋतू मानतात. ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर आणि वसंत. परंतु शरद ऋतूतील निसर्ग खूप सुंदर दिसतो. वर्षा ऋतुराणीची पाठवणी करून शरद ऋतूची डोली धरतीच्या अंगणात येते. 


वर्षा ऋतूमध्ये श्यामल वर्णाचे ढग दिसतात. त्याच ढगांचा रंग शरद ऋतूत अगदी गोरा बनतो. शरदातील आकाशाची शोभा काही निराळीच. आकाशात रंगीबेरंगी ढग जमतात. रात्रीचे आकाशदर्शन विलक्षण रूप घेऊन येते. पौर्णिमेच्या दिवशी तर पूर्णचंद्र आपल्या सख्यांसह आकाशमंडपात विराजमान होतात.


आम्ही मित्रांनी ठरवले की, शरदपौर्णिमेला रात्री पदभ्रमण करायचे. आम्ही सूर्यास्तानंतर निघालो. नदीच्या काठाने चालत जायचे निश्चित केले. पदभ्रमण करताकरता पाण्यात पडलेले चंद्र व चंद्रिकांचे प्रतिबिंब बघायचे. पाण्यात पाहिले, तरी चंद्रदर्शन आणि आकाशात पाहिले तरी चंद्रदर्शन. 


चालताना आमच्यातील उत्साह अधिक वाढला. वाऱ्याची मंद, झुळूक सुखद वाटत होती. हवेत मस्त गारवा पसरलेला होता. मंद प्रकाशात हळुवार संगीत ऐकल्यावर किती मस्त वाटते, ना तसेच आत्ता आम्हाला वाटत होते.


पाण्यावर तरंगणाऱ्या लाटा पाहून, तार छेडल्यावर त्यातून सुंदर लकेर बाहेर पडल्यावर जसा आनंद होतो ना, तसा आनंद होत होता. लाटांवर चंद्र हेलकावे खात आहे आणि त्याच्या अवतीभवतीच्या तारका त्याला सांभाळण्यासाठी आल्या आहेत, असे वाटत होते. त्याच वेळी मला हिंदी कवितेच्या ओळी आठवल्या -


“चारुचंद्र की चंचल किरणें खेल रही थीं जलथल में" आणि नवरंगमधील गाणे - “आधा है चंद्रमा, रात आधी ...." हळूहळू आम्ही त्या निसर्गनाट्यात रममाण झालो.


रोज उगवणारा चंद्र आज मात्र खूपच वेगळा भासत होता. ह्या चंद्राकडे बघूनच कवींना स्फूर्ती आली असावी. आम्हाला खूप-खूप चंद्राची गाणी आठवायला लागली. भेड्या लावाव्यात, तशी आम्ही एकामागोमाग एक गाणी म्हणत होतो. केवढे तरी अंतर कापले होते; पण कळलेच नाही. 


थकवा तर अजिबात जाणवला नाही. वाटत होते, ही चांदणी रात्र संपूच नये. मनात अनेक विचार सुरू होते. रोजच चंद्र पूर्ण रूपात उगवला तर... कशाला हव्यात त्याला कला? कलेकलेने वाढायचे नि कलेकलेनेच कमी व्हायचे. काय असावा यामागे हेतू? आकाशात चंद्र हसत होता. 


जणू काही म्हणत होता, "बाळांनो, माझ्याकडे विविधता आहे ना; म्हणूनच तुम्ही माझ्याकडे लक्ष देता. रोजच टिप्पूर चांदणे पसरवले ना, तर त्याची तुम्हाला किंमतच नाही वाटणार. रोज पौर्णिमा, रोज माझी पूर्णाकृती. रोज रजत प्रकाश असे असेल, तर ठेवाल माझी किंमत? कराल रोज रात्री असेच पदभ्रमण?मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


 निबंध 2
चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध  | Chandani Ratarichi Sahal essay marathi

'आकाशा, चांदण्यांचे देण तुझे, घेता मी धन्य झाले

आनंदाच्या तुषारात आज मी चिंब झाले... रित्या झाल्या निराशा


आशेचे कलश भरले, अंधारावर राज्य करण्या चांदण्यांचे गाव वसले...." चांदण्या रात्रीची सहल आठवताच माझ्या शब्दांची नकळत गुंफण सुरू होते. अंतर्मनात दडलेली ती चांदण्या रात्रीची सहल आठवते अन् स्मृतींचा गुंजारव भर उन्हातही परत चांदणे फुलवून जातो.


कविमन आणि चंद्र-चांदणे यांचे जन्मजन्मांतरीचे अतुट नाते आहे. या विश्वाच्या पलीकडे जाऊन जगण्याचे हे माध्यम कविमनच जाणू शकते. नुकतीच कोजागीरी पौणिमा जवळ आली होती. दरवर्षी घरच्या गच्चीवर आम्ही सर्व मैत्रिणी कोजागिरी साजरी करीत असू त्यावर्षी मात्र आम्ही शिवमंदिराजवळच्या टेकडीवर कोजागिरी साजरी करण्याची योजना आखली होती.


ते टिपूर चांदणं जणू अजून वर जाऊन दोन्ही हातांच्या ओंजळीत भरून घेता येईल असा बालीश विचारही मनात चमकून गेला . नुसत्या योजनेनेच मनात कोजागिरी पौर्णिमा फुलली होती. .. 


पौर्णिमेचा धवल पूर्ण चंद्र, सारा निसर्गसौंदर्याचा उपहार घेऊन सज्ज , तारकांचे सडे, मंद शीतल वायू, सळाळती पाने , अथांग आकाश, दूरवरच्या सागराची गाज, सुदंर कुसुमांचा परिमल , शांत वातावरणातही उमटणारे नाद, मुकी झोपलेली पृथ्वीची शांतता , न बोलताही बडबडणारी ... छेडणारी .... चंद्राच्या प्रकाशफेकीत न्हाऊन निघणारी धरती... 


यासोबत मैत्रिणींच्या गप्पा, पालकांचा सहभाग, उड्या, गाणी, बासुंदी, भजे , समोसे यांचा आस्वाद.....या सर्वांनी ती सहल रंगली होती. कृष्णधवल आकाशही रंगीत भासले होते. त्या चांदण्या रात्रीची गोडी अद्वितीय ठरली होती.


टिपऱ्या नाचल्या होत्या , गाणी झंकारली होती . तने पुलकित झाली होती, मने तृप्त झाली होती. नृत्याच्या तालावर ती टेकडी , तेथील मनोहारी बाग , सारा आसमंत , सारे लहान थोर आनंदाच्या चांदण्यात डोलत होते. आज ते सारे शब्दात बांधणे म्हणजे अशक्यच! तरीही


"आनंदाला आले उधाण चांदण्याची छेडीता तान

सौंदर्य पृथ्वीवर बरसले देऊनि मखमली प्रकाशाचे दान....

रंग स्नेहाचे आभाळी उधळलेले पूर्णमासीच्या धवल चंद्रासारखे


परिपूर्ण जीवन सजलेले....." साऱ्या चिंता, सारे दुःख विसरून प्रत्येक जण असा काही रंगला होता की, हृदयात आनंद मावेनासा झाला होता . निसर्गाच्या सहवासातील माधुरी प्रत्येकाला चटक लावून गेली. सारी दुनिया पाठलागी असली तरीही न सापडणारे असे मन त्या रात्रीच्या सहलीत चंद्र व चांदण्यांबरोबर अदृश्य झाले होते. 


सौंदर्य फुललेल्या या विश्वात ते रममाण झाले होते. बरीच रात्र उलटूनही तन-मन जागेच होते. आज स्वप्नांची रात्र नव्हती. सत्य मुठीत होते. निसर्गप्रेमींना निसर्गाचे वेड स्वस्थ बसू देत नाही. 


आम्हां मुलींना मात्र ‘रात्री बाहेर पडणे' ही कल्पनाही मनात कोणी आणू देत नाही पण त्या दिवशी आई, बाबा, स्नेही, मैत्रिणी यांच्याबरोबर किती तरी वेळ निसर्गाची मुक्त साथ मिळाली. ती चांदणी रात्र मनात चिरंजीव झाली.


"चंद्र नभीचा हाती होता,

चांदणेही मांडीवरी कार्य वर्ण आनंद मनीचा आज पौर्णिमा मनात सारी...

आनंदाचि आनंद जन्मला, दिशा हसल्या, ऋतू लाजला...

चांदणी हसली, चंद्र लाजला अन् आनंदाचा जन्म जाहला......"

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .