भारतीय लोकशाही समोरील आव्हाने मराठी निबंध | Bhartiy Lokshahi Samoril Prashn Marathi Nibandh

 भारतीय लोकशाही समोरील आव्हाने मराठी निबंध |  Bhartiy Lokshahi Samoril Prashn Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भारतीय लोकशाही समोरील आव्हाने मराठी निबंध बघणार आहोत. आधुनिक युगात लोकशाहीला सर्वोत्तम शासनप्रणाली मानण्यात येते. या शासनप्रणालीमुळेचे सामान्य जनतेचे कल्याण आणि विकास होणे शक्य आहे. 


मनुष्य स्वतंत्र राहूनच प्रगती करू शकतो. लोकशाहीला इंग्रजीत डेमॉक्रसी म्हणतात. ग्रीक शब्द डिमास + क्रेटोस मिळून 'डेमॉक्रसी' हा शब्द बनला आहे. अनेक विचारवंतांनी लोकशाहीची व्याख्या केली आहे. १) अब्राहम लिंकन-“लोकांचे, लोकांसाठी, लोकांनी चालविलेले शासन म्हणजे लोकशाही."


 २) सीले-"लोकशाही असे शासन आहे ज्यावर जनतेचे नियंत्रण असते."३) गटेल-"लोकशाही म्हणजे एक असे सरकार ज्यात सर्वोच्च सत्ता प्राप्त करण्याचा अधिकार केवळ जनतेला असतो."वरील व्याख्यांवरून हे कळते की, लोकशाहीत जनता ही सर्वोच्च असते. जनता आपल्या मताधिकाराद्वारे आपले प्रतिनिधी निवडून त्यांना लोककल्याणासाठी शासन चालविण्याचा अधिकार देते.


आपल्या लोकशाहीची सर्वात मोठी समस्या ही आहे की लोकशाहीत राजकारणाला व्यावसायिक रूप दिले जाते. ती अनैतिक बनते म्हणूनच तिचा कोणताही धर्म नाही. जनतेला भुलविण्यासाठी आपले राजकारणी लोक धर्मविहीनतेला धर्मनिरपेक्षता म्हणतात. 


ते संयमाच्या ठिकाणी नियंत्रणाला कर्तव्यपालनाच्या ठिकाणी अधिकारप्राप्तीच्या स्पर्धेला उत्तेजन देतात. लोकशाहीत लोकांचा पक्ष पंगू झाला असून तो संख्या व स्वार्थाच्या कुबड्यांवर चालत आहे. यात लोकप्रतिनिधी योग्यतेच्या आधारावर निवडून येत नसून मतांवर निवडून येतात. 


लोकप्रियतेचा एक प्रकारे लिलावच होतो. म्हणून लोकशाही म्हणजे झुंडशाही असे म्हणतात. लोकशाहीचे जे रूप आज आपणास पाहावयास मिळते ते अत्यंत निराशाजनक आहे. आज नेते स्वत:च लोकशाहीला वाचविण्यासाठी मोठमोठ्या गोष्टी करतात. पण काम मात्र


राजेशाहीप्रमाणे करतात. हा माझा पक्ष आहे हा 'मी' या अहंकाराने लोकशाहीची मुळे खिळखिळी करून टाकली आहेत. अशा परिस्थितीत लोकशाही जास्त काळ टिकू शकत नाही. लोकशाहीची सर्वात मोठी समस्या ही आहे की, प्रचंड बहुमताच्या आधारावर लोकप्रतिनिधी संसदेत विधेयक दुरुस्त करून आपल्या इच्छेनुसार घटनेत बदल करतात. 


अल्पमतात असलेले सरकार फक्त विरोधच करीत बसते. ही केवळ समस्या नसून लोकशाहीला मिळालेला शाप आहे. आपल्या लोकशाही घटनेने अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींना विशेष सवलती दिल्या आहेत. नोकऱ्यांमध्ये काही जागा त्यांच्यासाठी राखीव ठेवल्या आहेत. 


त्या जर न भरल्या तर रिकाम्या राहतात व त्याचा परिणाम शासनाच्या कामावर होतो. त्या जागेवर खुल्या वर्गातील उमेदवार न नियुक्त केल्यामुळे बेरोजगारी वाढते. अनेक ठिकाणी शिक्षक, कारकून इ. पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. परंतु घटनेनुसार ती भरता येत नाहीत. ही समस्या दिवसें-दिवस गंभीर होत आहे. परंतु अधिकारी वर्ग इकडे लक्ष देत नाही.


निवडणूक ही लोकशाहीसमोरील आणखी एक समस्या आहे. भारतातील बहुतांश जनता अशिक्षित आहे म्हणून आपल्या बहुमूल्य मताचे महत्त्वही त्यांना समजू शकत नाही. थोड्या पैशाच्या मोबदल्यात ते आपले किमती मत विकून टाकतात. 


नेते निवडणुकीच्या वेळी जनतेच्या भावना उत्तेजित करतात. जनतेला अनेक वचने देतात पण ती पुरी करीत नाहीत. त्यामुळे लोकशाहीचे भविष्य अंध:कारमय होते. आज आपल्या लोकशाहीसमोर दहशतवादाचा फार मोठा धोका उभा राहिला आहे. आज संपूर्ण भारत दहशतवादाच्या विळख्यात सापडला आहे. 


दहशतवादी रोज हत्या करतात. आपल्या बेकायदेशीर मागण्या मान्य करून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी, परकीय नागरिकाचे अपहरण करतात. त्यामुळे लोक घाबरतात व परदेशांत भारताची प्रतिमा खराब होते. सुरक्षा व्यवस्था असूनही एखाद्या विशिष्ट व्यक्तीची गोळी मारून हत्या करतात. 


ही गोष्ट आपल्या सुरक्षा व्यवस्थेतील उणीवांकडे बोट दाखविते. अशा परिस्थितीत कुणीही स्वतःला सुरक्षित समजू शकत नाही. आज देश ऐक्य व अखंडतेचा समस्येशी झगडत आहे. देशात अनेक धार्मिक शक्ती डोके वर काढत आहेत. जातीय दंगलीत लोक विनाकारण मरत आहेत. त्यामुळे ऐक्याला तडे जातात. 


प्रादेशिक राजकारणामुळे देशाच्या अखंडतेचे नुकसान होते. असे लोक वेगळ्या वेगळ्या राज्यांची मागणी करतात. त्यासाठी कायदेशीर-बेकायदेशीर सगळे मार्ग अवलंबितात परंतु आपण हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की देशाचे ऐक्य आणि अखंडता यावर लोकशाहीचे यश अवलंबून असते.


लोकशाही यशस्वी होण्यात बेकारीची समस्या अडथळा ठरते, ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. शिकलेले बेकार आपला आत्मविश्वास गमावतात. हीच बेकारी समाजात अराजकतेला जन्म देते. म्हणून ही समस्या लवकरात लवकर सुटली पाहिजे. लोकशाहीची आखणी एक समस्या आहे ती म्हणजे निरक्षरता. सर्व वाईटाचे हे मूळ आहे. आज सरकार सर्व योग्य विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास असमर्थ आहे. 


सरकारने घोषणा केली १४ वर्षांपर्यंतच्या सर्व मुलामुलींना मोफत शिक्षण दिले जाईल. परंतु ही घोषणा पूर्ण झालीच नाही. गरिबी ही आपल्या लोकशाहीची सर्वात जुनी व गुंतागुंतीची समस्या आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत याच्याशी झुंजत आहे. सरकारने यासाठी अनेक कार्यक्रम राबविले पण उपयोग झाला नाही. 


जोपर्यंत गरिबी हटणार नाही तोपर्यंत लोकशाही यशस्वी होणार नाही. लोकसंख्येत होणारी भरमसाट वाढ ही लोकशाहीची आणखी एक गंभीर समस्या आहे. दरवर्षी ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्येइतकी भारताच्या लोकसंख्येत वाढ होते यामुळे सर्व विकास योजना धुळीस मिळतात. जर यावर लवकर नियंत्रण मिळविले नाही तर भविष्यातही असेच धडेल.


जेव्हा आपण आपल्या देशातील लोकशाहीकडे पाहतो तेव्हा समस्याच समस्या दिसतात. त्याच्यासमोर लोकशाही किती दिवस टिकेल, सरकार चालविणाऱ्या नेत्यांनी यावर गंभीरपणे विचार करावा आणि काही तरी कायमचा उपाय करावा म्हणजे देश एकतेच्या सूत्रात बांधलेला राहील. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद