फॅशन आणि विद्यार्थी मराठी निबंध | Fashion aani vidyarthi Essay Marathi

 फॅशन आणि विद्यार्थी मराठी निबंध | Fashion aani  vidyarthi Essay Marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण फॅशन आणि विद्यार्थी मराठी निबंध बघणार आहोत. बदलत्या समाजाबरोबरच माणसाचे राहणीमान आणि पोशाख ही बदलत राहिले. आरंभापासूनच सौंदर्य आणि पोशाखाचे जवळचे नाते आहे. यालाच फॅशन म्हणतात. 


मन जगाला जे सांगू इच्छिते ते फॅशन करण्याच्या वृत्तीद्वारे सांगते. फॅशन एक अशी युगप्रवृत्ती आहे जिचा संबंध मनुष्याच्या रुची बोध, कलादृष्टी, सौंदर्य चेतना आणि कामभावनेशी आहे. मनुष्याच्या मूलभूत प्रवृत्तींपैकी ही एक प्रवृत्ती आहे. तहान भुकेप्रमाणे सहज स्वाभाविक प्रवृत्तींबरोबरच मनुष्यामध्ये कामभावनेचाही जन्म व विकास झाला.


त्याची अभिव्यक्ती झाली. स्त्री पुरुषांची ही इच्छा असते की आपण दुसऱ्यांना आकर्षक व सुंदर वाटली पाहिजे. दुसऱ्यांनी आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले पाहिजे. अनेक जणांमधून एखाद्या कामासाठी त्याचीच निवड झाली पाहिजे. 


शारीरिक सौंदर्य हेच या आकर्षणाचे केंद्र असते. परंतु शारीरिक सौंदर्य ही ईश्वराची देणगी असते. शरीराच्या अभावांच्या पूर्तीसाठी, त्याद्वारे नवीन सौंदर्य चमत्कार घडवून आणण्यासाठी जी कृत्रिम साधने वापरली जातात त्यालाच फॅशन हे नाव दिले.


फॅशनकडे कल आहे. सभ्यता आणि संस्कृतीच्या जन्मापासून आजपर्यंत फॅशनचा एक अविछिन्न प्रवाह संस्कृती आणि सभ्यतांच्या सुकलेल्या पदरावर सिंचन करीत आला आहे. सुरवातीला मनुष्य हाडांच्या माळा परिधान करीत होता. नंतर दगडांच्या मण्यांच्या माळा घालू लागला. 


प्राचीन मूर्ती पाहिल्यावर हे कळते की भारतीय स्त्रिया निरनिराळ्या प्रकारच्या केश रचना करून आपल्या पतीला आकर्षित करीत होत्या, स्त्री पुरुष स्वत:ला सुंदर आणि आकर्षक बनविण्यासाठी मोरपंख, फुले, पाने, कवड्या इत्यादीं नी आपले शरीर सजवीत असत. 


त्या काळात भारतात तयार झालेल्या वस्त्रांची विदेशांत निर्यात होत असे. रोमच्या स्त्रियांना भारतीय पोशाखाचा खास मोह होता. फॅशनचा संबंध संस्कृती आणि हवापाण्याशी आहे. फॅशनच्या मागे परिवर्तनशीलता, नावीन्य, सहजता, सुगमता उपयोगिता आणि सौंदर्यबोध इत्यादी अनेक घटक असतात. 


हे खरे आहे की कधी कधी एक दोन घटक विसरले जातात परंतु सामान्यपणे कोणत्याही नव्या फॅशनच्या मागे हेच घटक क्रियाशील असतात. नव्या समाजाच्या नव्या आवश्यकता आणि सौंदर्य चेतनेला अनुरूप असे स्वत:ला बनविण्यासाठी मनुष्य निरंतर प्रयत्नशील असतो. 


त्याचा हा प्रयत्न त्याच्या पहिल्या पिढीला सामान्यपणे आवडत नाही. त्यांना त्यात उच्छृखलता, निर्लज्जपणा, थिल्लरपणा दिसतो. परंतु काही दिवसांनंतर त्यांच्या डोळ्यांना ते सर्व चांगले वाटते. आतापर्यंत जगात फ्रान्सला फॅशन संस्कृतीत एकमेव मानले जात असे परंतु फ्रान्समधील फॅशन आता संपूर्ण जगात प्रचलित झाली आहे.


नव्या फॅशनसाठी विद्यार्थ्यांचे मन आसुसलेले असणे स्वाभाविक आहे. विद्यार्थी जीवन हा असा काळ आहे जेव्हा किशोर-किशोरींचे तन मन आपले रंगीत पंख पसरवून, फडफडवून अनंत आकाशाच्या नीलिमेत जाण्यासाठी उतावीळ होतात. 


त्यांचे मन गुपचुप कुणाच्या कानात काही सांगण्यासाठी आतुर होते आणि डोळ्यांत कुठे तरी जाण्याची चमक असते. विद्यार्थी जीवन हा भविष्याच्या तयारीचा काळ असतो हे जीवन युद्धात यश आणि सार्थकता मिळविण्यासाठी शक्ती वाढविण्याचा काळ आहे. 


हा काळ स्वप्नरंजनात वा हृदयावेध व्यक्त करण्यात विनाकारण घालविता येत नाही. कारण जीवन ही कल्पना नसून एक कठोर सत्य आहे. एक कर्मभूमी आहे. विषम संघर्ष आणि उत्तरदायित्व आहे. ज्याप्रमाणे युद्धात प्रशिक्षित आणि अस्त्र शस्त्र संपन्न सैनिक असतील तरच विजयाची शक्यता जास्त असते. 


त्याचप्रमाणे विद्यार्थी जीवनात ज्या मुलामुलींनी कठोर श्रमाने आपली मन बुद्धी सशक्त केली नाही तर पुढे चालून ते काळाच्या अजस्त्र प्रवाहात वाहून जातात, नष्ट होतात, हाच तो काळ आहे जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये उच्च संस्कार सामाजिक दृष्टिकोन आणि राष्ट्रीय जबाबदारीची जाणीव विकसित होते. 


या निर्मितीच्या काळात ज्या विद्यार्थ्यांनी केवळ फॅशन करण्यात वेळ घालविला त्यांच्याशी काळ खूप कठोरपणे वागतो. फॅशनचा चारित्र्याशी जवळचा संबंध आहे. फॅशनमुळे संस्कारांचा वेळेचा आणि धनाचा अपव्यय होतो. परंतु फॅशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट कळत नाही. आपल्या पॉकेटमनीचा बराचसा पैसा ते फॅशनवर खर्च करतात. शिक्षणावर जितका खर्च होत नाही. 


तितका कपड्यांवर खर्च करतात. आईवडिलांना रोज पैसे मागतात. जर आईवडील त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास असमर्थ असतील तर ते कुसंगतीकडे, चोरीसारख्या वाईट गोष्टीकडे वळतात.आज फॅशनची व्याप्ती खूप वाढली आहे. विद्यार्थ्यांमध्ये धूम्रपान आणि मद्यपान फॅशन म्हणून केले जाते. अशा दूषित फॅशनपासून विद्यार्थ्यांनी स्वत:चा बचाव केला पाहिजे. 


बरेचदा फॅशन हास्यास्पद वाटते. विद्यार्थ्यांनी केवळ अशीच फॅशन केली पाहिजे जी त्यांच्या शरीराच्या विकासासाठी, स्वास्थ्यासाठी आणि स्फूर्तीसाठी आवश्यक असेल. अशा फॅशनमुळे सौंदर्याबरोबरच उपयोगिताही दिसते. ज्या फॅशनमुळे मनात वासना निर्माण होईल. 


जी शारीरिक विकासास बाधक असेल अशा फॅशनचा विद्यार्थ्यांनी त्यागच केला पाहिजे. सुरुचिपूर्ण फॅशन केली तर आणि साधेपणालाही जीवनात स्थान दिले तर अशी संतुलित फॅशन विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व उठून दिसण्यास सहायक ठरेल. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद