पुस्तके-आपले मार्गदर्शक मराठी निबंध | PUSTAKE AAPLE MARGDARSHK ESSAY MARATHI

 पुस्तके-आपले मार्गदर्शक मराठी निबंध | PUSTAKE AAPLE MARGDARSHK ESSAY MARATHI

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पुस्तके-आपले मार्गदर्शक मराठी निबंध बघणार आहोत. "They are never alone, who are accompanied by noble thoughts" ज्यांना श्रेष्ठ विचारांची साथ असते ते कधीच एकटे नसतात.' सर फिलीप सिडनी. श्रेष्ठ विचारांचे दोन मुख्य स्त्रोत असतात. 


पुस्तके आणि सत्संगती. सत्संगाचा फायदा घेण्यासाठी पुस्तकी ज्ञान आवश्यक असते. पुस्तकांचे अध्ययन आणि वाचलेल्या गोष्टींवर मनन, चिंतन केल्यानंतर श्रेष्ठ विचारांचा उदय मनांत होत असतो. असे म्हटले जाते की जो वाचन करतो पण चिंतन करीत नाही त्याला कोणतेही भविष्य नसते, जो केवळ चिंतन करतो पण वाचन करीत नाही तो कायम संकटग्रस्त असतो.


खरा मित्र तोच असतो ज्याच्यावर आपण संपूर्ण विश्वास टाकू शकतो. कोणत्याही परिस्थितीत तो आपल्या मदतीसाठी हजर असतो. पुष्कळसे मित्र स्वार्थी आणि संधीचा फायदा घेणारे असतात. म्हणून केव्हाही ते आपणास त्यांच्या मदतीपासून व सल्ल्यापासून वंचित करतात. 


पुस्तकांच्या बाबतीत असे नसते कारण त्यात उपलब्ध असलेले ज्ञान सार्वत्रिक व सार्वकालिक असते. पुस्तके आपल्या खऱ्या मित्रासारखी सदैव आपल्या मदतीस तयार असतात. महाभारत, गीता, रामचरित मानस, गुरूग्रंथसाहेब इ. ग्रंथ असे आहेत की जे प्रत्येक संकटाच्या वेळी आपले मनोबल वाढवितात. 


शिवाय ते क्षणार्धात उपलब्ध होतात. दुसऱ्या महायुद्धातील कित्येक युद्धकैद्यांनी पुस्तकांच्या आधारे आपले तुरुंगातील जीवन धैर्याने घालविले. आफ्रिकेतील निग्रो नेते डॉ. नेल्सन मंडेला यांनी आपले २७ वर्षांचे बंदी जीवन पुस्तकांच्या आधारेच घालविले होते. 


इतकेच नव्हे तर स्वातंत्र्याचे वेडे पुस्तकातून ज्ञान प्राप्ती झाल्यामुळेच हसत हसत फाशीवर गेले. पुस्तके अनेक प्रकारे आपल्याशी मित्रवत व्यवहार करतात. काही पुस्तके आपणास जिवंत राहण्यास शिकवितात; काही पुस्तके आपणास कष्ट सहन करण्यास शिकवितात, तर काही पुस्तके मृत्यूला कशा प्रकारे सामोरे जावे ते शिकवितात.


जगातील सर्व ज्ञान पुस्तकांमध्येच आहे व त्यांच्याद्वारेच ते जगासमोर येते. पुस्तकांच्या अध्ययनाद्वारे आपण ऋषींचे ऋण फेडू शकतो. ऋषींचे ऋण फेडण्यासाठी श्रेष्ठ ग्रंथांचे अध्ययन करून ते ज्ञान इतरांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असते.


पुस्तके आपले असे मित्र आहेत ज्यांची आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते. त्यांची आपल्याबद्दल एवढीच आशा असते की आपण त्यांना नीट सांभाळून ठेवावे म्हणजे ते गरजेनुसार आपणास मदत करतील. पुस्तके आपणास लोक परलोकाच्या निर्मितीचे शिक्षण देतात. हे आपणा सर्वांना माहीत आहे. 


त्यांच्याद्वारे आपण जगातील प्रत्येक पदार्थ, विषय व त्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टींचे ज्ञान प्राप्त करू शकतो. पुस्तके आपणास किती उपयोगी पडतात हे सांगताना रवींद्र म्हणतात "डोळ्यांसमोर जी वस्तू पडलेली असते तिच्याबद्दलची माहिती मिळविण्यासाठी पुस्तकांचेच तोंडपाहावे लागते" ज्ञान देण्याव्यतिरिक्त एका खऱ्या हितचिंतकाप्रमाणे आपले धैर्य वाढवितात, साहस, आशा, प्रेरणा देतात.


“A wise men's day is worth of fool's live" अशी एक म्हण आहे. म्हणजे एका ज्ञानी माणसाचा एक दिवस एका मूर्खाच्या संपूर्ण जीवनाबरोबर असतो. ज्ञानाची प्राप्ती पुस्तकांच्या माध्यमातूनच होऊ शकते हे आपण समजू शकतो. अनेक इतिहास प्रसिद्ध व्यक्ती अशा आहेत ज्यांनी संपत्ती सुखोपभोगापेक्षा चांगल्या ग्रंथालयाला जास्त महत्त्व दिले.


कारण त्यांच्यासाठी पुस्तके तात्काळ उपलब्ध होणारा सेवक, सहायक, मित्र, मंत्री, गुरू सर्व काही होते. प्रसिद्ध विचारवंत प्रोक्टरच्या मते, "माझ्या ग्रंथालयात माझे मौन सेवक चौफेर माझी वाट पाहत राहतात. तिथे प्रत्येक वेळी माझे मित्र असतात आणि देवदूतांचेही दर्शन मला होत राहते."


पुस्तक वाचताना माणूस स्वत:ला विसरून जातो. पुस्तकातील पात्रांशी तो तादात्म्य पावतो. म्हणून पुस्तके वाचल्यामुळे ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. आनंदाच्या या अवस्थेत आपल्या सर्व मनोविकारांचा आपणास विसर पडतो व त्यातील सृष्टीशी आपला संबंध प्रस्थापित होतो.


भारतीय विचारवतांनी ज्ञानार्जनाला ईश्वर, स्मरणाच्या बरोबरचा दर्जा दिला आहे. पुस्तकांनी अनेक व्यक्तींचे जीवन घडविले आहे. असंख्य वाचकांचे मनोरंजन केले आहे. पुस्तकांचे अध्ययन, पारायण,आत्मिक विकास व मनोरंजनाचे साधन आहे. पुस्तकांसारख्या मित्रांच्या सहवासात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा व चारित्र्याचा विकास होतो.


पुस्तकांच्या सतत सहवासामुळे मिळणारा आनंद अनिर्वचनीय असतो. त्यामुळे जगातील इतर सुखांचा विसर पडतो' स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे" असे म्हणणारे लो. टिळक म्हणत' मी नरकातही चांगल्या पुस्तकांचे स्वागतच करीन कारण त्यांच्यात ते जिथे असतील तिथे स्वर्ग निर्माण करण्याची शक्ती असते."


गांधीजीच्या मते, "पुस्तकांचे मूल्य हियांपेक्षा जास्त आहे. कारण हिऱ्यांची चमक बाहेर दिसते तर पुस्तकांची चमक अंत:करणाला उजळून टाकते. चांगली पुस्तके आपल्याजवळ असल्यावर चांगले मित्र आपल्याबरोबर नसल्याची खंत वाटत नाही. जसजसे मी पुस्तकांचे अध्ययन करीत गेलो तितकी त्यांची वैशिष्ट्ये मला समजत गेली". 


एका अरबी विचारवंताच्या मते, पुस्तके ही खिशात ठेवलेली बाग आहे जी आपल्या मनाला सदैव सुवासित व प्रसन्न ठेवते." पुस्तके आणि ग्रंथालये ही कोणत्याही राष्ट्राच्या सांस्कृतिक विकासाचा दर्जा दर्शवितात. 


प्रसिद्ध विचारवंत वॉल्टेअरच्या मते 'असभ्य राष्ट्रे सोडून संपूर्ण जगावर पुस्तकांचेच राज्य आहे.' म्हणून पुस्तकांनाच आपले मार्गदर्शक बनवा आणि सर्व समस्यांवरील अमोध अस्त्र मिळवा. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद